National Seed Council 2023 : कृषी संशोधनावरील नगण्य खर्च चिंतनीय बाब

Agricultural Research : डॉ. मंगला राय : राष्ट्रीय बियाणे परिषदेला प्रारंभ
National Seed Council 2023
National Seed Council 2023Agrowon

संतोष मुंढे /ॲग्रोवन वृत्तसेवा
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर : देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत अन्नधान्य उत्पादनाचा ताण पाच ते सहा पटीने वाढला आहे. हवामानाचे बदल आणि उत्पादन वाढीसाठीची प्रतिकूलता लक्षात घेता कृषी संशोधनावर भर देणे गरजेचे आहे.

परंतु कृषी संशोधनावर होणारा नगण्य खर्च चिंतेची बाब असल्याचे परखड मत भारतीय कृषी संशोधन व शिक्षण विभाग माजी सचिव व महासंचालक, भारतीय कृषी संशोधन परिषद डॉ. मंगला राय यांनी व्यक्त केले.

भारतीय बियाणे तंत्रज्ञान संस्था, नवी दिल्ली, राष्ट्रीय बियाणे संशोधन संस्था, वाराणसी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी यांच्यातर्फे आयोजित १२ व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेला (नॅशनल सीड काँग्रेस) छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल ताज विवांता येथे सोमवारी (ता.११) प्रारंभ झाला. दै.सकाळ- ‘ॲग्रोवन’ या कार्यक्रमाचा माध्यम प्रायोजक आहे.


या परिषदेचे उद्घाटक म्हणून डॉ. राय बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा होते. या वेळी बीजमाता राहीबाई पोपरे, केंद्रीय कृषी आयुक्त डॉ. पी. के. सिंग, कंवलसिंह चौहान, कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे अध्यक्ष अजय राणा, भारतीय कृषी संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. एस. ए. पाटील, महिको ग्रुपचे अध्यक्ष राजू बारवाले, भारतीय बीज तंत्रज्ञान संस्था व एएसी अध्यक्ष डॉ. एच. एस. गुप्ता, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर आदी मान्यवर उपस्थित होते.

National Seed Council 2023
National Seed Conference : छत्रपती संभाजीनगरला आजपासून १२ वी राष्ट्रीय बियाणे परिषद

बदलत्या हवामान स्थितीत नवीन संशोधन व दर्जेदार बियाणे उपलब्धतेसाठी निर्माण झालेली आव्हाने ही परिषदेची संकल्पना आहे. परिषदेच्या प्रस्ताविकातून कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा यांनी परिषद आयोजनामागील भूमिका, महत्त्व याचे विवेचन केले. डॉ. राय म्हणाले, ‘‘प्रगत देशांमध्ये बिजोत्पादन आणि बीज प्रमाणीकरणामध्ये अतिशय काटेकोर अशा पद्धतीचा अवलंब केला जातो. प्रगत देशांमध्ये १०० टक्के बियाणे शुद्ध असावे अशी पद्धत आहे.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने शुद्ध दर्जेदार बियाणे मिळण्यासाठी आपल्याला बीज प्रमाणीकरण कार्यक्रम अतिशय काटेकोर पद्धतीने राबविण्याचा विचार करण्याची गरज आहे.

पुढील ५० वर्षे जर आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये शेतकरी आणि उद्योजक यांना जर काही चांगले द्यायचे असेल तर आपल्याला संशोधनावर लक्ष देणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी चार ते पाच टक्के आपण संशोधनावर खर्च करायचो. २०२२ चा विचार केला तर अडीच टक्क्यांपेक्षा कमी निधी हा संशोधनासाठी खर्च झाला. प्रशासकीय बाबींवर मात्र आपला ७० ते ८० टक्के खर्च होतो आहे. देशाच्या एकूण अर्थसंकल्पात कृषी संशोधनावरील खर्चाचा वाटा प्रगत देशात एक, दोन टक्क्यांपुढे नाही. तर भारत आणि चीनसांरख्या देशात ०.३ ते ०.६ टक्क्यांच्या पुढे नाही. मग विश्व गुरू होण्याच्या दिशेने आपली वाटचाल सक्षम कशी होईल,’’ असेही ते म्हणाले.

डॉ. राणा म्हणाले, ‘‘विविध अन्नधान्याच्या निर्यातीवर आलेली बंदी पाहता दुसऱ्या हरितक्रांतीची गरज आहे. हवामान बदलाचे प्रमाण बघता प्रतिकूल हवामानात येणारी वाण विकसित करावे लागेल. अनेक वर्षांपासून मजुरांची असलेली समस्या आजही कायम आहे.

बियाणे उत्पादक वाढविण्यासाठी सर्वांना सामूहिक प्रयत्न करावे लागतील.’’ केंद्रीय कृषी आयुक्त डॉ. सिंग म्हणाले, ‘‘२०४७ पर्यंत बियाण्यात विश्वगुरू होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे.’’ डॉ. पाटील म्हणाले, ‘‘बियाणे समृद्धतेसाठी वेगळा निधी ठेवून काम करावे लागेल. त्यासाठी धोरणही आखावे लागेल.’’
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी उद्घाटन सत्राचे आभार मानले.हरित क्रांतीमुळे आपण अन्नधान्यात समृद्ध झालो त्यात शास्त्रज्ञ तंत्रज्ञान व बियाण्यांचा वाटा मोठा आहे. परंतु आताच्या स्थितीत असंतुलित रसायनांचा वापर व त्यामुळे भोगावे लागत असलेले परिणाम पाहता रसायनांना पर्याय शोधावा लागेल.
कंवलसिंह चौहान, पद्मश्री


गावठी कसदार बेण जपा : राहीबाई पोपरे
‘‘संकटात आल्यावरही मी मातीशी नाते तुटू दिले नाही. गावठी कसदार बेण किती फायद्याचे असते हे बांधावर बसून जाणून घेतले. आता १५० गावे आणि ३५०० महिलांबरोबर त्याच विषयावर काम करते आहे. निसर्गाला सोबत घेऊन चालावे लागेल. आपण बदललो म्हणून निसर्ग बदलला. प्रत्येक गावात गावठी बेण्यांच्या बँका व्हायला हव्यात. त्यासाठी विद्यापीठांनी सहकार्य करावे,’’ असे मत बीजमाता राहीबाई पोपरे यांनी व्यक्त केले.


कापसाच्या उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानात स्वीकारलेले बदल थांबले. त्यामुळे उत्पादनात स्थिरता आली. उत्पादन वाढण्याऐवजी स्थिर झाले. उलट अडचणी वाढल्या. त्यामुळे नवतंत्रज्ञानाचा स्वीकार कापसासारख्या महत्त्वाच्या पिकात क्रमप्राप्त आहे.
- डॉ. सी. डी. मायी,
माजी अध्यक्ष, कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com