
ॲग्रोवन वृत्तसेवा
Shivsena Shende Faction : मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी म्हणणे मांडण्यासंदर्भात नोटीस बजावली असल्याची माहिती पुढे आली आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ११ ऑगस्टपूर्वी शिंदे गटाचा (Shivsena Shende Faction) निकाल लागेल, असे भाकित वर्तविले होते. त्यादृष्टीने विधानसभा अध्यक्षांनी उचललेले पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या सर्वच आमदारांना नोटीस बजावली असल्याचे सांगण्यात येत असले तरी ठाकरे गटाच्या आमदारांना नोटिशीची प्रत प्रत्यक्ष किंवा ई-मेल द्वारे मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ज्या १६ आमदारांविरोधात (शिंदे गट) पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी अविश्वास ठराव आणला होता, त्यांनाच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत का, याबाबत गोपनीयता पाळण्यात आली आहे.
मागील वर्षी जून महिन्यांत शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांविरोधात तेव्हाचे पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी अपात्रतेबाबत याचिका दाखल केली होती. मात्र, पुढील घडामोडीवेळी प्रतोद म्हणून शिंदे गटाच्या भरत गोगवले यांना विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली होती. पुढे सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने दिलेल्या निर्णयात गोगवले यांची नियुक्ती अमान्य करण्यात आली होती.
त्यामुळे ठाकरे गटाचे पारडे जड मानले जात आहे. घटनापीठाने विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यास सांगितले असले तरी, तो तीन महिन्यांच्या आत घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, पुढील महिन्याच्या ११ तारखेपर्यंत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेणे बंधनकारक आहे.
सुप्रीम कोर्टाने शेवटचा जो निर्णय दिलेला असतो तो प्रमाण मानून पुढील निर्णय घेणे बंधनकारक असते. हे बंधन विधानसभा अध्यक्षांवर असल्याने त्यांना निर्णय घ्यावाच लागेल, असेही ते म्हणाले होते. त्यामुळे सध्या बजावण्यात आलेल्या नोटिसा त्या प्रक्रियेचाच भाग मानला जात आहेत. तसेच या आमदारांना सात दिवसांच्या आत म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे, अशीही चर्चा आहे.
ठाकरे गटाच्या आमदारांना अजून नोटिसा नाहीत
शिवसेनेच्या दोन्ही बाजूच्या आमदारांना नोटिसा बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी ठाकरे गटाच्या काही आमदारांशी संपर्क साधला असता अशा प्रकारची नोटीस आली नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष किंवा ई-मेल द्वारेही अशी नोटीस आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.