Shetkari Sahitya Sammelan : सरकारकडे मागू नका, कुठलं सरकार आणायचं ते ठरवा

Nana Patekar : आई सांगायची सोने १६ रुपये तोळा होते. आता ते ५० हजार रुपयांवर पोहोचले. सोन्याचा भाव वाढला मग आमच्या गहू-तांदळाचा भाव का वाढत नाही.
Nana Patekar
Nana PatekarAgrowon

Nashik News : ‘‘आई सांगायची सोने १६ रुपये तोळा होते. आता ते ५० हजार रुपयांवर पोहोचले. सोन्याचा भाव वाढला मग आमच्या गहू-तांदळाचा भाव का वाढत नाही. शेतीमालाला रास्तभाव हवा. पण प्रत्येक गोष्ट सरकारकडे मागून मिळत नाही. त्यामुळे सरकारकडे मागू नका. कुठलं सरकार आणायचं ते ठरवा,’’ अशी रोखठोक भूमिका सिनेअभिनेते व नाम फाउंडेशनचे प्रमुख नाना पाटेकर यांनी मांडली.

शेती अर्थ प्रबोधिनीद्वारा आयोजित ११ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन ४ व ५ मे रोजी मोहाडी (ता.दिंडोरी) येथील सह्याद्री फार्म परिसरात युगात्मा शरद जोशी विद्यानगरी येथे करण्यात आले आहे. संमेलनाच्या उद्घाटन सत्रात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष भानू काळे, म. रा. साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, ज्येष्ठ शेतकरी नेत्या सरोज काशीकर, ज्येष्ठ शेतकरी नेते अ‍ॅड.वामनराव चटप, रामचंद्रबापू पाटील, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष व सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, संयोजक सतीश बोरुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Nana Patekar
Shetkari Sahitya Sammelan : शेतकरी साहित्य संमेलन आजपासून होणार सुरू

पुढे बोलताना पाटेकर म्हणाले, ‘‘रोज अन्न देणाऱ्याची पत्रास तुम्ही का ठेवत नाही. आम्ही फक्त नावापुरते स्वतंत्र झालो आहोत. शेतकऱ्याची गुलामी संपायला तयार नाही. त्या गुलामगिरीच्या विरोधात लिहा. शेतकरी कधीही कुणाची अडवणूक करत नाही. त्यास जनावरांची भाषा कळते.

मात्र सरकारला शेतकऱ्यांची भाषा कळत नाही. त्याविरोधात लिहता यायला हवे. गोंजारणारे दुःख मांडू नका. आपल्या धमन्यात वाहणारी वेदना रसरशीतपणे मांडा,’’ असे आवाहन त्यांनी साहित्यकांना केले. ‘‘जगावं की मरावं हा एकच प्रश्‍न आहे. मरू नये तर जगलेच पाहिजे. चांगले दिवस येतील, अन्यथा आपण ते आणू,’’असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

विलास शिंदे म्हणाले, ‘‘शरद जोशी यांनी मांडलेल्या चतुरंग शेतीच्या कल्पना या केवळ पुस्तकी नाहीत. त्याचा आधार घेऊन आम्ही चालण्याचा प्रयत्न करीत आहेत. शरद जोशींची ही संकल्पना भारतीय शेतीचे भवितव्य उजळवणारे आहे.’’

मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले, शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मराठी मायभाषा गौरवगीत व शेतकरी गीत सादर केले. प्रास्तविक गंगाधर मुटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद राजेभोसले यांनी केले.

Nana Patekar
Shetkari Sahitya Sammelan : नाशिकमध्ये होणार ११ वे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन

‘साहित्य म्हणजे फक्त कथा, कविता नव्हेत’

केवळ आंदोलनाने शेतीप्रश्न सुटणार नाहीत याची जाणीव शरद जोशींना (Sharad Joshi) होती. एका मर्यादेपर्यंत ठिणगी गरजेची असते पुढे दीर्घकाळ ज्योतीचीच गरज असते. स्वित्झर्लंडमधील शेतकरी संघटना आणि तंत्रज्ञान याचा प्रभाव त्यांच्यावर होता. चतुरंग शेतीची संकल्पना यामागे महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रेरणा होती.

साहित्य म्हणजे फक्त कथा, कविता नव्हे. विचारप्रधान साहित्य हा देखील साहित्याचा महत्त्वाचा भाग आहे. कल्पित साहित्यापेक्षा वास्तव साहित्य हे अधिक महत्त्वाचे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या साहित्याकडे सन्मानाने पाहावे. अनुदान संस्कृतीवर त्यांनी कधीच भर दिला नाही,’’ असे प्रतिपादन भानू काळे यांनी अध्यक्षीय भाषणात केले.

मान्यवरांच्या भाषणातील मुद्दे:

पुष्पराज गावंडे : शेतकऱ्यांच्या जीवनावर साहित्य लिहिणारे मोठे होतात; मात्र त्यामुळे शेतकऱ्याचे आयुष्य बदलत नाही. साहित्यिक आणि शेतकरी दोघेही मोठे व्हावेत.

सरोजताई काशीकर : शेतकऱ्यांसोबत रडणे एवढ्यापुरतेच शेतकरी साहित्य मर्यादित नाहीत. शेतकऱ्याला खंबीरपणे या दुःखातून बाहेर आणणारे साहित्य निर्माण करण्यावर साहित्यिकांनी भर द्यावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com