Nagaland Culture : नागालँड : शेती, माती, संस्कृतीचा समृद्ध ठेवा

Nagas from Sahyadri : झुकू व्हॅलीच्या पूर्वेला आजही सदाहरित जंगल आणि तेथील झूम शेती पाहायला मिळते. असचं चंदगडकडच्या काही भातरानात पहिलेला आणि म्हणूनच इथल्या कॅम्पसाइटच्या नागा मित्रांना आम्ही म्हणायचो- ‘वुई आर नागास फ्रॉम सह्याद्री.’
Nagaland
Nagaland Agrowon

Agriculture Culture of Nagaland : माझ्या देशात खऱ्या अर्थानं सर्वांत प्रगत राज्य कोणतं, असा प्रश्‍न मला आज विचारल्यास माझं उत्तर असेल नागालॅंड! मी नुकताच नागालॅंडचा एक छोटेखानी दौरा केला. या दौऱ्यात नागालॅंडची वैशिष्‍ट्यं अनुभवायला मिळाली. तिथली माती, माणसं आणि मानस अनोखं आहे.

अनेक परंपरा, कैक खाद्यसंस्कृत्या, शेती, माती आणि निसर्ग यांची गोळाबेरीज करून सर्व जगाला ‘विविधतेत एकता’ असा दिमाखात सांगावा देणारी इथल्या मातीतली संयमी माणसं पहिली की आजही त्यांचा हेवा वाटतो. निसर्गाशी एकरूप असलेल्या इथली छोटी छोटी गावं बघून मन हरखून जातं. गाव कसली ते छोटे छोटे देशच म्हणावे लागतील, पिढ्यान् पिढ्यांपासून पूर्णपणे आत्मनिर्भर असलेले.

धकाधकीच्या आणि धावपळीच्या या आभासी चलनी युगात आपण मात्र जे लोक स्वतःच्या, समाजाच्या गरजा स्वतःच तरतूद करून, निसर्गाशी एकरूप होऊन पूर्ण करत आनंदाने जगत असतात त्यांना गरीब आणि मागास अशी लेबलं लावून मोकळं होतो.

ते वास्तवाला अजिबात धरून नाही. आता काळ बदलला असला तरी आपल्या परंपरा आजही बाळगून, सणवार दिमाखात साजरे झाल्यावर इथले नागरिक आधुनिक जगाचे अगदी सहज भाग होऊन मनमुराद जगतात, हे देखील विशेष.

नागालँडच्या वेगवेगळ्या जमातीतील वेगवेगळ्या प्रथा, सणासुदीची, लोक जीवनाविषयी माहिती इथल्या छोट्या गावातली जुनीजाणती मंडळी तुमच्यावर विश्‍वास ठेवल्यानंतर सांगू लागतात. आम्ही या लोकांशी बोलायला सुरुवात केली, त्या वेळी आम्ही त्यांना आमच्याबद्दल सांगताना ‘सह्याद्रीतली पार कोकणातल्या घाटमाथ्यावरची शेतकऱ्याचीच मुलं आहोत.

आमच्याकडं पार जन्मानंतर बारशापासून मग लग्नात आणि मेल्यावर पण बाराव्याला मटणच’ असं बोलून गेलो. त्यामुळे खुश झालेल्या सिबा नामक रेझमिया या गावाच्या अंगामी गावबुरान (गावाचा चेअरमन / अध्यक्ष) आम्हाला ‘घालो’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक मटण- लाल भाताची डिश खिलवत दिलखुलासपणे गप्पा मारायला सुरुवात केली.

Nagaland
Agrowon Agriculture Exhibition 2024 : चार दिवसांत कोट्यवधींची उलाढाल

‘तुम्ही तुमच्या या परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशा सोपवता?’ या माझ्या प्रश्‍नावर त्यांचं उत्तर आलं- ‘आम्ही ठरावीक असं काही शिकवत नाही. हेच कर, तेच कर असं काही सांगत बसत नाही. आम्ही जे करतोय ते पाहून, आमची पोरंबाळं हे सगळं आपसूक शिकू लागतात.

त्याउपर आनंदाने जगायचं असेल तर तुम्ही खूप चलाख असायला हवं.’ सर्व वयोगटाला, कुटुंबकबिल्याला सामावून घेऊन शेतीत पेरणी, लागण, पीक संरक्षण ते कापणी, सुगीपर्यंतच्या कृषी वर्षात असणारे वर्षभर चालणारे सणवार आणि नाचगाणी हे इथल्या रोमारोमांत वेगवेगळ्या जमातीत आजही जिवंत आहे.

‘‘तुम्ही नागालॅंडमध्ये कुठे कुठे फिरलात? झुकू व्हॅली पाहिलात का? ती तुम्ही पावसाळ्यात नक्की पाहा,’’ असं त्यांनी आग्रहीपणानं सांगितलं. त्यावर आम्ही दोन दिवसांपूर्वीच तिथं मुक्काम करून आलोय आणि नजारा उरात भरून आलोय हे सांगितल्यावर त्यांनी त्याविषयीची अधिक माहिती सांगायला सुरुवात केली.

इथली भौगोलिक परिस्थिती अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. हवामान बिकट आहे. पाऊसपाणी मुबलक आहे. इथं पारंपरिक झूम अर्थात जंगल शेती केली जाते. तिला स्थलांतरित शेती म्हणतात. म्हणजेच गावाच्या गरजेपुरती जंगलातील जमीन शेतीयोग्य करायची. त्यात तीन-चार वर्षे पारंपरिक पिके काढल्यानंतर ती तशीच सोडून जंगलाचा भाग शोधून तिथे पुन्हा अशीच शेती करायची.

अशा प्रकारच्या झूम शेती पद्धतीमुळे तसेच वाढत्या कबिल्यामुळे नागा लोक स्थिरावल्यानंतरही विस्थापित होत गेले. इथल्या वेगवेगळ्या भागांत नागा समूहांच्या प्रमुख १६ जमाती आहेत. त्यातली सर्वांत मोठी म्हणजे अंगामी. अलीकडे यात नवीन दोन जमातींचा समावेश केला गेलाय. प्रत्येक जण शेतीवरच अवलंबून. अशात झूम शेती करणारे आजही ज्ञानाचे भांडार आहेत.

झूम शेती ही आजही पूर्णपणे सेंद्रिय आणि संमिश्र पीक उत्पादन प्रणाली आहे. टेकडीवरील उतारावर जमीन सपाट न करताच घेतली जाणारी स्थिर पिके मी यापूर्वी जर्मनीत पाहिलेली. यात प्रामुख्याने वेगवेगळ्या वाणाचा भात आणि भाजीपाल्याचा समावेश आहे.

जुन्यापुराण्या वाणांच्या लागवडीद्वारे पोषण सुरक्षेचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. त्यातून अशा वाणांचे आपसूक संवर्धन होत आहे. व्यवस्थापनाच्या दृष्टीने आजही हे चांगलं उदाहरण आहे. तिथं पोहोचायला एकतर तुम्ही हाडाचे ट्रेकर असला पाहिजे किंवा इथले पारंपरिक झुमीया शेतकरी!

Nagaland
Agrowon Agriculture Exhibition 2024 : ज्ञानाची शिदोरी गाठीशी बांधत शेतकरी परतले

अशा भागात आधुनिक शेती अवजारे आणि यंत्रसामग्रीचा वापर तितकासा अनुकूल नाहीये. इथल्या पारंपरिक शेतीसाठी आजही प्रमुख ऊर्जा स्रोत हा प्रामुख्याने मानवी शक्ती हाच आहे. तिचा इथला लेखाजोखा, अहवाल काढायचं म्हटलं तर आयटी क्षेत्रासारख्याच म्यान अवर्स, म्यान मंथ अशा पद्धतीने तो आजही जोखता येईल आणि इथं हेच प्रमाण आहे. वारंवार वापर, सामूहिक शहाणपण यातून ज्ञान मग तंत्रज्ञान असा रंजक टप्पा या सर्वांत लपलेला आहे.

झुकू व्हॅलीच्या पूर्वेला आजही सदाहरित जंगल पाहायला मिळतं आणि झूम शेतीही. त्यात बटाटे, क्वाश, भाज्या, नागा डाळ, पारंपरिक तृणधान्ये तसेच भाताचे असंख्य प्रकार आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे पश्‍चिमेला १० ते १५ किलोमीटर नजर जाईल इतक्या छोट्या टेकड्यावरील बांबूचं जंगल. नागा अंगामी लोकांनी कधी काळी इथं शेती करण्याचा प्रयत्न केला, पण तो इथल्या निसर्गापुढं सपशेल फेल गेला. आणि ते इथून माघारी फिरले.

ते का माघारी फिरले असतील, ते इथं पोहोचताना आणि पोहोचल्यावरच कळतं! इथं भात काढायच्या पद्धतीही निराळ्या. नाचणीप्रमाणे भाताची लोम्ब कापून पारंपरिक पाठीवरच्या बांबूच्या डालग्यात भरायचीत आणि जवळच अंथरलेल्या पारंपरिक कापडावर पायानं मळायची. असाच प्रकार मी चंदगडकडच्या काही भातरानात पहिलेला. म्हणूनच इथल्या कॅम्पसाइटच्या नागा मित्रांना आम्ही म्हणायचो- ‘वुई आर नागास फ्रॉम सह्याद्री.’

अत्यंत रमणीय असलेल्या या भागात २०२१ च्या तसेच त्याआधीच्या काही वणव्यांत खरं तर इथली एका बाजूची, एका पट्ट्यातील वनसंपदा बेचिराख झालेली. बांबूचं सबंध जंगल जळताना सोबत असंख्य झाडं, पक्षी, प्राणी सगळं पार राख झालेलं. कोळशाच्या झाडांचे अवशेष आजही जवळून पाहिले की अंगावर शहारे येतात; पण निसर्ग साला कणखर आहे.

अवघ्या दोन वर्षांत बांबूचं जंगल पुन्हा उभं राहतंय नव्या आशेनं, नव्या जोमानं. अद्‍भुत असा निसर्गाशी एकरूप ज्ञानकोश पाहायला, अनुभवायला मोकळ्या मनानं नागालॅंडला वारंवार जायला हवं.

९९२३००५४८५ (लेखक अभियंता आणि ट्रेकर आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com