Seed Production : बीजोत्पादन : उत्पन्नाचा उत्तम स्रोत

Seed Production in Crops : पारंपरिक पिकांपेक्षा शेडनेट तसेच उघड्यावरील सोयाबीनसह भाजीपाला पिकांचे बीजोत्पादन शेतकऱ्यांना खूपच फायदेशीर ठरतेय.
Seed Production
Seed ProductionAgrowon

Importance of Seeds in Crop Production : आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन आज आपण शेतीमाल निर्यातीत जी आघाडी घेतली त्यात बियाणे या घटकाचे मोठे योगदान राहिले आहे, हे नाकारता येणार नाही. बियाणे ही पिकांची अधिक उत्पादकता व उत्पादनासाठी मूलभूत अन् अत्यंत महत्त्वाची निविष्ठा मानली जाते.

एकूण पीक उत्पादन खर्चात बियाणे या घटकाचा वाटा दोन ते पाच टक्के तर एकूण उत्पादनात हा वाटा १५ ते २० टक्के असतो. उत्पादनाचा हा वाटा इतर निविष्ठांचा शास्त्रशुद्ध वापर करून ४५ टक्क्यांपर्यंत वाढविला जाऊ शकतो. यावरून पीक उत्पादनात बियाण्याचे महत्व आपल्या लक्षात यायला हवे. कृषी निविष्ठांमध्ये बियाणे उद्योग हा एकमेव असा उद्योग आहे, की ज्यामध्ये उत्पादक आणि ग्राहक एकच आहेत.

बियाणे उत्पादन शेतकऱ्यांच्या शेतावरच होते. अनेक खासगी कंपन्या शेतकऱ्यांशी करार करूनच त्यांच्याकडून बियाणे उत्पादन करून घेतात आणि अशा शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बियाण्याचा ग्राहकही शेवटी शेतकरीच असतो. बदलत्या हवामान काळात शेतीतील जोखीम वाढली आहे. शेतीमालास रास्त दरही मिळत नाही.

अशावेळी संरक्षित शेतीतून हमखास बियाणे उत्पादन आणि त्या बियाण्यास कंपन्यांच्या माध्यमातून शाश्‍वत बाजारपेठ आणि निश्‍चित दर यामुळे बीजोत्पादन शेतकऱ्यांना किफायतशीर ठरू लागले आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांचा कल बीजोत्पादनाकडे आहे.

Seed Production
Buldana Seed Production : बुलडाणा बनतेय बीजोत्पादन ‘हब’

विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांपैकी एक जिल्हा म्हणजे बुलडाणा. या जिल्ह्याचा बहुतांश भाग हा दुष्काळी आहे, तर काही क्षेत्र खारपाण पट्ट्यात मोडते. केवळ पारंपरिक पिकांवर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून असताना बीजोत्पादनातून या जिल्ह्याचा कायापालट होत असेल, तर त्याचे स्वागतच करायला पाहिजे.

राज्यात जालन्यापाठोपाठ आता बुलडाणा जिल्हा बीजोत्पादन हब बनतोय. बुलडाणा जिल्ह्यातील घाटांवरील तालुक्यात मागील काही वर्षांपासून बीजोत्पादनाचे काम वेगाने पुढे जात आहे. पारंपरिक पिकांपेक्षा शेडनेट तसेच उघड्यावरील सोयाबीनसह भाजीपाला पिकांचे बीजोत्पादन शेतकऱ्यांना खूपच फायदेशीर ठरतेय.

Seed Production
Seed Production : भाजीपाला बीजोत्पादनातून अल्पभूधारक कुटुंबाची प्रगती

शेडनेटमध्ये कमी क्षेत्रातून बीजोत्पादनाद्वारे अधिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते. बीजोत्पादनामुळे शेतकऱ्यांकडून उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब तर होतोच शिवाय त्यास काटेकोर नियोजनाची जोडसुद्धा मिळते. बीजोत्पादन कार्यक्रमाद्वारे मजुरांना गावपरिसरातच काम मिळत असल्याने त्यांचे स्थलांतर थांबले आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, हैद्राबाद येथील बियाणे कंपन्याशी शेतकरी करार करून विविध भाजीपाला पिकांचे बीजोत्पादन घेत आहेत.

राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांत महसूल तसेच कृषी विभागाचा अनेक योजनांत चांगला समन्वय दिसून येत नाही. बुलडाणा जिल्ह्यात जिल्हाधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे दोघेही जिल्ह्याला ‘सीड हब’ बनविण्यासाठी प्रयत्नशील आहेत, ही बाबही उल्लेखनीयच म्हणावी लागेल.

बीजोत्पादनात अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूकदेखील होते. करार केलेला असला तरी कंपन्या बियाणे विकत घेत नाहीत, अनेक वेळा ठरावीक दरापेक्षा बियाण्यास दरही कमी दिला जातो. असे प्रकार होऊ नयेत यासाठी पण महसूल तसेच कृषी विभागाने काळजी घेतली पहिजेत. तांत्रिक माहिती अभावी बीजोत्पादनापासून अनेक शेतकरी दूर राहतात.

अनेकदा कुशल मनुष्यबळाअभावी देखील बीजोत्पादनाला खीळ बसते. अशावेळी जिल्ह्यात बीजोत्पादनाचे क्षेत्र वाढत असताना शेतकऱ्यांना तसेच मजुरांना देखील प्रशिक्षित करण्याचे काम कृषी विभागाने करायला हवे. राज्यातील बियाणे उद्योग मागील काही वर्षांपासून शेजारील राज्यात स्थलांतरित होत आहे.

बियाणे उद्योगातील बऱ्याचशी नामांकित कंपन्यांचे मुख्यालय महाराष्ट्रात असले तरी प्रत्यक्ष बियाणे संशोधन, उत्पादन, प्रक्रिया असे कार्यक्रम ते शेजारील राज्यांत हलवित आहेत. बियाणे उद्योगामुळे शेतकऱ्यांसह एकंदरीत परिसराचाच कायापालट होत असल्याने राज्यातून हा उद्योग स्थलांतरीक का होतोय, याचा राज्य शासनाने गांभीर्याने विचार करायला हवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com