Agricultural Success : माझी आनंददायी शेती

Blissful Farming : माझी कोरडवाहू शेती फायद्यात आहे, असं म्हटलं की अनेक जण चकित होतात. काहींना मी काही तरी ठोकून देतोय असं वाटतं. एका बाजूला कोरडवाहू शेती हा शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास आहे; तिच्यावर अवलंबून राहू नये, असं मी म्हणतो आणि त्याच वेळी कोरडवाहू शेतीत आनंद घेतोय असंही लिहितो, यात अनेकांना विरोधाभास दिसतो. पण मी खरं तेच बोलतोय. या विषयाकडं तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघता, ही यातली खरी ग्यानबाची मेख आहे.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

महारूद्र मंगनाळे

Agriculture Success Story : मी कोरडवाहू शेती करतो. एखाद्या वर्षाचा अपवाद सोडला, तर मी दरवर्षी शेतीत जी गुंतवणूक करतो तेवढे पैसे निघत नाहीत, हे उघड सत्य आहे. त्यासाठी हिशेबाचा सगळा पसारा मांडायची गरज नाही. शेतीत आमच्या सोबत राहणाऱ्या दोन सहकाऱ्यांचं वार्षिक मानधन व थोडासा खर्च निघाला तरी ते वर्ष चांगलं राहिलं असं म्हणतो. पण तसं घडलं नाही तरीही शेतीत नुकसान झालं, असं मी कधीच मानत नाही.

माझं गाव लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद. इथंच वडिलोपार्जित शेती. दहावीपर्यंत गावात शिकलो. अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयातून बी.ए. केलं. औरंगाबादला (छत्रपती संभाजीनगर) विद्यापीठात पत्रकारितेची पदवी घेतली. मी १९८५ मध्ये लातूरमध्ये पत्रकारितेची सुरुवात केली. बारा वर्षे जिल्हा दैनिकाचा मुख्य संपादक, पुढे १७ वर्षे एका साप्ताहिकाचा संपादक, जवळपास २५ वर्षांपासून पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय असा माझा प्रवास राहिला.

या काळात माझा गावाशी, शेतीशी संपर्क राहिला असला, तरी मी सर्वार्थाने लातूरवासी होतो. पत्रकार, लेखक, प्रकाशक, पुस्तक वितरक अशी सर्वदूर ओळख तयार झालेली. शहरात स्वत:चं घर. व्यवसाय स्थिरावलेला. मुक्तरंग प्रकाशन हा ब्रॅण्ड तयार झालेला. तरीही २०१० मध्ये मी शेतीत येऊन राहण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला.

मी आज लातूर शहरात राहत असतो तर आम्हा दोघांना महिन्याकाठी भाड्यासह किमान चाळीस हजार रुपये लागले असते. माझी पत्रकारिता जोमात असताना हॉटेलमध्ये रात्री जेवण्याचा खर्च महिन्याला दहा हजार रुपये होता. अॅसिडिटी हा मुख्य रोग. बाजारात येणाऱ्या नवनवीन, जास्त किमतीच्या गोळ्या खरेदी करून खायचो. तो दिवस ठीक जायचा. दुसरा दिवस गोळी खाऊनच सुरू व्हायचा.

Agriculture
Agriculture Success Story : शेतीसारखे समाधान कुठेच अनुभवले नाही...

पोटाच्या सतत तक्रारी. हे खरं तर पटत नव्हतं, पण याला पर्यायही नव्हता. नियमित पायी फिरणं, व्यायाम होता. योग्य काम करतोय याचं समाधान होतं. त्यामुळे तब्येत टिकून होती. मात्र निसर्गापासून, मातीपासून तुटत चाललोय ही जाणीव सतत अस्वस्थ करायची. जिल्हा दैनिकाचा मुख्य संपादक, राज्य पातळीवरील दैनिकाचा जिल्हा वार्ताहर, चित्रलेखासारख्या वाचकप्रिय साप्ताहिकात लेखन, भूकंप-पुनर्वसनाचं दस्तऐवजीकरण,

आठ पानी राजकीय साप्ताहिकाचा संपादक, त्याचं काही काळ पुणे-मुंबई येथून प्रकाशन, मुक्तरंग प्रकाशनाची सुरुवात, काही वर्षांतच ५०० पुस्तकांचा गाठलेला पल्ला, माझी स्वतःची सातत्याने प्रकाशित होणारी पुस्तकं… असा सगळा यशाचा चढता आलेख होता. तरीही बालपणापासून असलेली मातीची ओढ मला गावाकडं बोलावत होती. शेती करणारा छोटा भाऊ २००८ मध्ये अकाली गेला. शेती बघण्याची जबाबदारी माझ्यावर आली.

काहीही केलं तरी कोरडवाहू शेती तोट्याची आहे, याची मला खात्री होती. त्यामुळे शेती करण्यासाठी नाही, तर निसर्गासोबत राहण्यासाठी म्हणून शेतीत जायचं व तिथं राहतो म्हणून शेती करायची असं ठरवलं. शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना जो मानसिक त्रास होतो, तो आपल्याला होऊ द्यायचा नाही, हे मनाशी नक्की केलं. जीवनपद्धती म्हणूनच शेती करण्याचा निर्णय घेतला. याला मी आनंददायी शेती असं नाव दिलं. केवळ उत्पन्नासाठी, फायद्यासाठी शेती करायची नाही, तर आनंददायी जगण्यासाठी शेती करायची.

केवळ शेतीवर अवलंबून राहू नका, कोरडवाहू शेती हा फासाकडं नेणारा दोर आहे, ही भूमिका मी सातत्याने मांडत आलोय. आजही माझी तीच भूमिका आहे. पत्रकार म्हणून शेतीतील मानवनिर्मित व निसर्गनिर्मित समस्यांवर, कटू वास्तवावर सातत्याने लिहीत आलोय. मात्र यात रडण्याचा, दु:खाचा सूर नाही. कारण वर्षानुवर्षे रडगाणं सुरू आहे. त्याने कुठलाच प्रश्‍न सुटला नाही. रडण्यातून नैराश्य येतं. एकदा वास्तव स्वीकारलं, की किमान जगण्यातील आनंद तरी घेता येतो.

शेतीत काय करायचं, कसं राहायचं याच्या माझ्या कल्पना स्पष्ट होत्या. शेतात राहण्यासाठी पडीक जमिनीतील एका कोपऱ्यात एक छोटी खोली बांधली. तिला रुद्रा हट हे नाव दिलं. मी २०१५ पासून पूर्णपणे रुद्रा हटवासी बनलो. हटच्या समोरच विविध फळांची रोपं लावली. ही रोपं जोपासायची हा प्राधान्यक्रम ठरला. मस्त रमलो. शारीरिक कष्टांची सवय, आवड होती. हे कष्ट नियमित सुरू झाले आणि प्रकृती निरोगी राहू लागली. काही महिन्यांतच अॅसिडिटी गायब झाली. इथं जसजसा रमत गेलो तसं तसे लातूरचे व्याप कमी करीत गेलो. सहचारिणी सविताही इथं राहायला आली आणि रुद्रा हटचं आजचं विश्‍व निर्माण झालं.

Agriculture
Agriculture Success Story : फळबागेने दिली आर्थिक समृद्धी...

मी वर उल्लेख केल्याप्रमाणे आम्ही लातुरात राहत असतो, तर महिना किमान ४० हजार रुपये लागले असते. रुद्रा हटवर आमचा खर्च १० हजार रुपयेसुद्धा नाही. महिन्याला ३० हजार म्हणजे वर्षाला साडेतीन लाख रुपये इथं कमी लागतात. एका अर्थाने हे लातुरात खर्च होणारे पैसे वाचले. हेच पैसे मी शेतीत खर्च करीत असेन, तर त्याचा हिशेब ठेवण्याची गरज काय? शेतीतील तोट्याचा विचार केला तर तो यापेक्षा नक्कीच कमी होतो. म्हणजेच माझी शेती फायद्याची आहे. मी शेतीवर नाही, तर माझ्या आनंददायी जगण्यावर हे पैसे खर्च करतोय. त्याला शेतीतील तोटा म्हणता येत नाही.

लातुरात भेसळीचं दूध, कीटकनाशकांचा वापर केलेली फळं, भाजीपाला खात होतो. इथं घरच्या गायी-म्हशींचं दूध मिळतंय. फळबागेत रासायनिक खत नाही की फवारणी. फक्त शेणखतावर ती बहरलीय. बारा महिने बागेत कुठलं ना कुठलं फळ असतं. त्याचा आस्वाद घेतो. गावरान सीताफळं किमान तीन महिने खायला मिळतात. पेरू वर्षांतून दोन वेळा तीन-चार महिने मिळतात. आंबे दोन महिने, बोर दोन महिने तर चिकू कमी-जास्त बारा महिने असतात. याशिवाय लिंबू, नारळ, केळी बारा महिने असतात.

अंजीर, आवळेही खातो. जांभळं आणखी लागायचेत. लवकरच ते येतील. या सगळ्या फळांचा हिशेब उत्पन्नात कुठंच धरलेला नाही. बाजारात ही फळं विकायला गेलो तर कदाचित याचे फारसे पैसे होणार नाहीत. पण मी यातली कुठलंही फळ विकत घ्यायला गेलो, तर मला भरपूर पैसे मोजावे लागतील. शिवाय ती फळं सेंद्रिय असणार नाहीत. त्यामुळे आमच्या बागेतील ही फळं अनमोल आहेत.

बागेत फळझाडांची रोपं लावताना ही खाण्यासाठीच आहेत; ती विक्रीसाठी नाहीत, ही कल्पना माझ्या मनात स्पष्ट होती. कुठंही व्यापार आला, की नफा-तोटा आला आणि सोबत आनंद आणि दु:खही. मला माझ्या या शेतीत दु:ख नको आहेत. त्यामुळे फळबाग हा माझ्यासाठी नफ्या-तोट्याचा विषय नाही. पैसे नकोच असं नाही; पण केवळ पैशाचं साधन म्हणून याकडं बघत नाही. साहजिकच फळबाग मला पौष्टिक खाण्यासोबतच भरभरून आनंद देतेय.

शेतीतून केवळ फळंच नाही, तर ताजा सेंद्रिय भाजीपाला खायला मिळतोय. तांदुळजा, घोळ, पातरूड अशा कितीतरी रानभाज्या खातोय. शेवग्याच्या पानांची, शेंगांची, हिरव्या केळीची, हरभऱ्याची, करडईची ताजी भाजी खातोय. या अशा भाज्या बाजारात कितीही पैसे दिले तरी मिळणार नाहीत. आमच्याच शेतात पिकवलेल्या ज्वारीची भाकरी खातोय. हरभरा, तूर या डाळीही इथंच पिकतात. या धान्याचं बाजारभावाप्रमाणे मोल करणं योग्य नाही. याची पौष्टिकता आणि चवही वेगळी आहे. या सगळ्यांचा प्रकृतीवर सकारात्मक परिणाम होतो.

हे झालं खाण्या-पिण्याच्या बाबतीत. बाकी लातूर शहरातलं जगणं आणि रुद्रा हटचं जगणं, याची कुठल्याच दृष्टीने तुलना होऊ शकत नाही. झाडं, पाखरं, सूर्य, चंद्र, चांदण्यांच्या सोबतीनं इथं मी जगतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अनुभवतो. इथली शुद्ध, ताजी हवा लातुरात कुठेच मिळणं शक्य नाही. इथं मला हातरूमाल नाकाला लावायची गरज नाही. सगळीकडं कुठल्या ना कुठल्या फुलांचा गंध आसमंतात दरवळत असतो.

अर्थात, रानफुलांसोबतच आम्ही विविध सुगंधी फुलझाडंही जोपासलीत. इथं कचरा, घाण नाही. त्यामुळे मन प्रसन्न राहतं. क्षणाक्षणाला बदलणारा निसर्ग अनुभवता येतो. शेतीतील, बागेतील छोटी-मोठी काम केली, की शरीर निरोगी राहतं...ही यादी खूप मोठी आहे. एक वाचणारा, लिहिणारा निसर्गप्रेमी माणूस म्हणून मी स्वत:बाबत विचार करतो तेव्हा मलाच माझा हेवा वाटतो. वाचन, लेखनासाठी हवं असणारं असं वातावरण दुसरीकडं कुठं मिळेल? या सगळ्याचा पैशात हिशेब मांडता येईल का?

आनंददायी शेती करण्यासाठी आपलं पोट शेतीवर अवलंबून असायला नको. शेतीत तोटा, त्रास, विवंचना, जोखीम आहेच. नजीकच्या काळात ही परिस्थिती बदलेल असं वाटत नाही. शेतीत पोट भरण्याइतकं मिळू शकतं; मात्र रंगीबेरंगी स्वप्नं पूर्ण करण्याची क्षमता शेतीत नाही. अशा स्थितीत शेतीत सकारात्मक काय आहे ते शोधून ते जगण्यात उतरवण्याची गरज आहे. स्वच्छ, शुद्ध हवेचं मोल शेतीत असणाऱ्यांना नाही. शहरात गेलं की त्याचं मोल कळतं. अशा कितीतरी सकारात्मक बाबी आहेत, ज्या केवळ शेतीतच आहेत.

मुळात मी शेतीकडं कसं बघतो, त्यावर हे सगळं अवलंबून आहे. मातीशी नाळ जुळलेली असेल, मातीशी जिव्हाळ्याचं नातं असेल, मातीचा संबंध जीवनशैलीशी असेल तरच या आनंददायी शेतीचं मोल कळू शकतं. मी गेल्या आठ-दहा वर्षांपासून ही शेती करीत जगतोय. माझं जगणं समृद्ध केलंय या मातीनं. माझ्या दृष्टीने माझी ही शेती भरपूर फायद्याची आहे.

९०९६१३९६६६, ९४२२४६९३३९

(लेखक लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com