Hasan Mushrif Vs Samarjit Ghatge : गेली पंधरा वर्षे गडहिंग्लजसह उत्तूर-कडगाव- कौलगे मतदारसंघातील जनतेने हसन मुश्रीफ यांना बळ दिले. त्या जनतेची अस्मिता असलेला गडहिंग्लजचा गोड साखर कारखाना स्वतःच्या स्वार्थासाठी बंद पाडण्याचे पाप मुश्रीफ यांनी केले, अशी टीका जनता दलाच्या नेत्या गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ लिंगनूर, कसबा नूल येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत गुरूवारी (ता.०७) कोरी यांनी थेट आरोप केले.
कोरी म्हणाल्या, ‘ब्रिक्सने कारखाना चालवायला घेतला. कंपनीने करार पूर्ण होण्याआधीच कारखाना सोडला. त्यामुळे जिल्हा बँकेतून कर्जही नाकारले. अशा परिस्थितीत स्वर्गीय श्रीपतराव शिंदे यांनी शेतकरी, कार्यकर्त्यांकडून पैसे गोळा करून कारखाना सुरू केला. मुश्रीफ यांनी त्यांच्या संचालकांना राजीनामे देऊन कारखान्यावर प्रशासक आणून कारखाना बंद पाडला.’
यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘गडहिंग्लज एमआयडीसीमध्ये रस्ते, वीज, पाणी या सुविधा सत्ता मिळाल्यास उपलब्ध करून देऊ. नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करू. त्यामुळे येथील तरुणांना रोजगार मिळेल. त्यांना पुणे, मुंबईला जावे लागणार नसल्याचे आवाहन घाटगे यांनी केले.’
मुश्रीफ गटाकडून शाहू दूध संघ विकल्याचा घाटगेंवर आरोप
शाहू दूध संघ वाचवण्याच्या नावाखाली शाहू कारखानाही बुडविलात. पंजाब सिंध कंपनीला विकलेल्या शाहू दूध संघाच्या नावावर केंद्र सरकारचे ३२ कोटी अनुदानही लाटले. दूध संघ विकून, मोडून खाल्लात. या सगळ्याचा हिशेब जनतेला द्यावा लागेल असा थेट आरोप विजय काळे यांनी केला. महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत आरोप करण्यात आला.
काळे म्हणाले, ‘दिवंगत विक्रमसिंहराजे घाटगे यांनी शेतकरी कल्याणाच्या मोठ्या उदात्त भावनेतून शाहू दूध संघाची स्थापना केली. विकलेल्या दूध संघाचे संकलन दररोज पाच हजार लिटर असताना ते ५० हजार लिटर दाखवून राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून त्यांनी ३२ हजार कोटींचे अनुदान लाटले असल्याचा आरोप काळे यांनी केला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.