Farmer Issue : सत्ताधारी पक्षाच्या खासदारांची शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी केली फजिती!

शिवसेना शिंदे गटाच्या यवतमाळ-वाशिम मतदार संघाच्या खासदार भावना गवळी शेतकऱ्यांच्या भेटीला गेल्या होत्या. त्यावेळी कापसाच्या दरावरून शेतकऱ्यांनी खा.गवळी यांची खरडपट्टी केली.
Farmer Issue
Farmer IssueAgrowon

शिवसेना शिंदे गटाच्या यवतमाळ-वाशिम मतदार संघाच्या खासदार भावना गवळी शेतकऱ्यांच्या भेटीला गेल्या होत्या. त्यावेळी कापसाच्या दरावरून शेतकऱ्यांनी खा.गवळी यांची चांगलीच खरडपट्टी केली. त्यावर सावरासावर करण्याचा प्रयत्न गवळी करत होत्या. पण शेतकऱ्यांनी मात्र प्रश्नांचा भडिमार केला. राज्यात कापसाचे भाव पडलेले आहेत. सीसीएची खरेदी केंद्र कापूस खरेदी करायला नकार देतायत. सोयाबीनच्या भावातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. एक रुपया पीक विमा योजनेत शेतकऱ्यांपेक्षा कॉमन सर्विस सेंटरवाल्यांची उखळ पांढरी झाली, हे प्रश्न होते जिल्हा यवतमाळ तालुका बाभूळगावतील शेतकऱ्यांचे.

खरंतर शेतकऱ्यांची विचारपूस करण्याच्या आधीच मोदी सरकारच्या विकास कामाचे गोडवे गायला गवळी यांनी सुरुवात केली. पण कापूस, सोयाबीन, हरभरा पिकाच्या पडलेल्या भाव आणि पीक विमा योजनेच्या बट्याबोळावरून गवळी यांच्यावर प्रश्नांची तोफ डागली. शेतकरी प्रश्न विचारत असताना व्हिडिओ काही शेतकरी व्हिडिओ रेकॉर्ड करत होते. गवळी अधूनमधून शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही करत होत्या. शेतकऱ्यांनी सीसीआयच्या कापूस खरेदीवरून गवळींना धारेवर धरलं. त्यावर गवळी म्हणाल्या, "त्यातून मार्ग काढण्यासाठी इथे आले आहे, आहे आता थोडा प्रॉब्लेम, सोडवू ना आपण," असंही आश्वासन देऊन शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न गवळी करत होत्या. पण गवळी यांना थोडा प्रॉब्लेम म्हणजे नेमकं काय म्हणायचंय ते काही शेतकऱ्यांना कळालं नाही.

वास्तविक गवळी याचा पक्ष केंद्र आणि राज्यात सत्तेत सामील आहेत. त्यामुळं प्रश्न सोडवण्याची शेतकऱ्यांची अपेक्षाही तर्काला धरून आहे. २०२२ मध्ये लहान बहीण या नात्यानं त्या रक्षाबंधन दिवशी पंतप्रधान मोदींना राखी बांधण्यासाठी गेल्या होत्या. मग आता सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पाडलेल्या दराची कैफियत सांगायला खा. गवळी जातील का? अशी त्यांच्याच मतदारसंघातील शेतकऱ्यांची भावना आहे. पण असो.

Farmer Issue
Cotton MSP : कापसाची हमीभावाने खरेदी केली नाही तर होणार गुन्हा दाखल ?|संयुक्त किसान मोर्चा दिल्लीत धडकणार?

शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा भडिमार सुरू असताना भावना गवळी आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळालं. आणि सीएस सेंटरवाल्यांवर कारवाई करण्याची तयारी दाखवली. पण मुद्दा शेतमालाच्या पाडलेल्या भावाचा आला तिथं मात्र गवळी यांनी पाहू, सोडवू, करू, या शब्दांची उधळण केली. त्यामुळं तर शेतकऱ्यांचा पाराही चढला. शेवटी गवळी यांनी हळूच काढता पाय घेतला. भावना गवळी यांच्यावर ओढावलेली वेळ सत्ताधारी पक्षांच्या इतरही काही खासदारांवरही ओढवली होती.

अहमदनगरमध्ये खा. सुजय विखे साखर पेरणी करण्यासाठी मतदारसंघातील गावात गेले असता त्यांनाही पाच वर्ष काय केलं, असा प्रश्न शेतकऱ्यांनी थेट विचारला होता. मागच्या आठवड्यात भाजप घर चलो अभियानाच्या निमित्तानं भाजपचे हंसराज अहीर यवतमाळ जिल्ह्यातील लोणी गावात गेले होते. खासदार असताना अहीर यांनी लोणी गाव दत्तक घेतलं होतं. पण या गावात अजूनही पाणंद रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही, त्यावरून अहीर यांना गावातील शेतकऱ्यांनी धारेवर धरलं होतं. शेवटी अहीर यांना आपला मोर्चा दुसऱ्या गावात वळवावा लागला होता. थोडक्यात लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळं मतदार संघ बांधणीसाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांची तयारी सुरू झाली आहे. त्यात शेतकऱ्यांनी आता थेट प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. अर्थात शेतकऱ्यांचा तो हक्क आणि अधिकार आहेच. पण त्यामुळे सत्ताधाऱ्यांची मात्र धांदल उडू लागली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com