
Pune News : राज्यात जूनमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण, घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. यामुळे ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत असून १ जून ते २३ जून या कालावधीत धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. सध्या अनेक धरणांत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्याने उजनी, खडकवासला, गंगापूर, दारणा, राधानगरी, वारणा, घोड अशा सुमारे अठराहून अधिक धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
राज्यातील एकूण तीन हजार ९९७ प्रकल्पांमध्ये सुमारे ५५८ टीएमसी (१५८२८.६९दशलक्ष घनमीटर) एवढा म्हणजेच सरासरी ३९ टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी अवघा २० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्या तुलनेत यंदा धरणांत अधिक पाणीसाठा झाला आहे.यंदा मे महिन्यात पाण्याची मागणी वाढल्याने धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला होता. मात्र, ६ ते २७ मे या कालावधीत मॉन्सूनपूर्व व माॅन्सूनचा चांगला पाऊस बरसला. त्यामुळे धरणांत चांगला पाणीसाठा झाला आहे.
कोकणातील धरणांत २९ टक्के पाणीसाठा
कोकण व घाटमाथ्यावर धुव्वाधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे भात खाचरे तुडुंब भरली आहेत. कोकणातील लहानमोठ्या १७३ धरणांत २३१.८४ टीएमसी म्हणजेच ४६ टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत या धरणांत अवघा २९ टक्के पाणीसाठा होता. कोकणातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास, गाढी, जगबुडी, वशिष्टी या नद्या प्रवाही झाल्याने मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, मध्य वैतरणा, बारवी, भातसा, धामणी या धरणांतील पाणी धरणांतील पाणीपातळी वेगाने वाढत आहे. त्यामुळे अनेक गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. तर खेडमधील जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत असल्याने खेड शहर अलसुरे, चिचघर, प्रभुवाडी गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे विभागातील अनेक धरणांतून विसर्ग
पुणे विभागातील ७२० धरणांत सद्यःस्थितीत २३१ टीएमसी म्हणजेच सरासरी ४३ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या धरणात अवघा १३ टक्के पाणीसाठा होता. मागील काही दिवसांपासून घाटमाथा व पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे उजनीसह अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. जिल्ह्यातील धरणांत मागील चोवीस तासांमध्ये ७.१३ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. आतापर्यंत पाच धरणांत पाणीसाठा ७५ टक्केहून अधिक झाला असल्याने विसर्ग सोडण्यात आला आहे.
कृष्णा खोऱ्यातील ३९ धरणांत ८१.१८ टीएमसी म्हणजेच ३८ टक्के पाणीसाठा झाला आहे. नाशिकमधील धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तर नाशिक विभागातील २३७ धरणांत ८०.१० टीएमसी म्हणजेच ३८ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर गेल्या वर्षी या धरणांत अवघा २२ टक्के पाणीसाठा होता. यंदा मोठी वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने प्रमुख धरणांत पाण्याची आवक वाढली आहे. अवघ्या आठ दिवसांत सहा प्रमुख धरणांत १९.४३ टीएमसीने वाढ झाली आहे. कोयना, कण्हेर धरणांतून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच माण, खटाव, कोरेगाव व सातारा तालुक्यांतील २० मध्यम व लघू प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.
मराठवाड्यातील धरणांत ३२ टक्के पाणीसाठा
मराठवाड्याच्या अनेक भागात मे महिन्याच्या अखेरीस दमदार पाऊस झाला. प्रामुख्याने छत्रपतीसंभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव या भागांत पाऊस झाला. या पावसामुळे पेरण्या झाल्या असल्या तरी काही प्रमाणात ओढे, नाले भरून वाहिले होते. त्यामुळे या भागातील धरणांत काहीशी वाढ झाली आहे. सध्या मराठवाड्यातील ९२० धरणांत ८२.८३ टीएमसी म्हणजेच ३२ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या धरणात अवघा ९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झालेली आहे. परंतु मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
विदर्भ अद्याप तहानलेला
विदर्भातील काही मंडलांत अतिवृष्टी झाली असली तरी अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण कायम आहे. अधूनमधून ऊन पडत आहे. त्यामुळे पाणीपातळी चांगलीच खालावली असून विदर्भाचे काही जिल्हे अद्याप तहानलेले आहेत. नागपूर विभागातील ३८३ धरणांत ५० टीएमसी म्हणजेच ३१ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या धरणांत ३५ टक्के पाणीसाठा होता. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात घट झाली आहे. अमरावती विभागातील २६४ धरणांत ७९.४२ टीएमसी म्हणजेच ३९ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात ३७ टक्के पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी किंचित वाढ आहे.
आता विदर्भात मॉन्सूनचे आगमन होऊन आठवडा होत असला तरी अद्याप समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली नाही. सुरुवातीच्या हलक्या सरींनंतर पावसाचा जोर वाढत नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. यंदाही पेरणी जुलैपर्यंत जाईल की काय, असे एकूणच चित्र निर्माण होत आहे. पावसाने मध्यंतरी पाठ फिरवल्याने शेतजमिनींमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झालेला नाही. परिणामी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कपाशी आदी पिकांची सार्वत्रिक पेरणी अद्याप सुरू झालेली नाही. काही मर्यादित क्षेत्रावरच पेरणी झाली. मात्र जोरदार पाऊस झाला नाही, तर उगवलेल्या पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
या धरणांतून विसर्ग सुरू (विसर्ग क्युसेकमध्ये)
उजनी ३०,०००, गंगापूर ६१६०, दारणा ४०७९, घोड ५५००, कुंडली ५६७५, राधानगरी ३१००, हतनूर २६८४, खडकवासला २०७६, वीर ६५३७, वारणा १७२५, येरळवाडी १११७, कण्हेर १०४०, वडीवळे ७३६, वडज ६४०, कासारसाई २७०, कासारी २५०, तुळशी ३००, तिलारी जलविद्युत प्रकल्प ११७, वाघूर ४०.
पाणीसाठा दृष्टिक्षेपात...
- सध्या धरणांत एकूण ५५८ टीएमसी पाणीसाठा
- मराठवाडा, विदर्भात पावसाची प्रतीक्षा
- पुणे जिल्ह्यातील पाच धरणांतून पाण्याचा विसर्ग
- उजनी धरणातून भीमा नदीत ३० हजार क्युसेकचा विसर्ग
- पंढरपुरात चंद्रभागा नदीपात्र काठोकाठ भरले
- नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
- गंगापूर धरणातून सर्वाधिक ६१६० क्युसेस, दारणातून ४,०७९ क्युसेकने विसर्ग सुरू
- विदर्भात पाण्याची पातळी खालावली
- मराठवाड्यात जोरदार पावसाची अपेक्षा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.