Maharashtra Election 2024 : मोदी साहेब! शेतकऱ्यांनी साथ दिली, आता शब्द पाळा; कर्जमाफी, सोयाबीनला ६ हजार हमीभाव आणि भावांतरची तातडीने अंमलबजावणी करा

Farmers Demands : शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करण्याची वेळ पंतप्रधान मोदींसह महायुतीची आहे.
Cotton Soybean
Cotton Soybean Agrowon
Published on
Updated on

Pune News : संपूर्ण कर्जमाफी करू, सोयाबीनला ६ हजार हमीभाव देऊ, भावांतर योजना राबवू, शेतकरी सन्मान योजनेचा निधी १२ हजारांवरून १५ हजार रुपये करू, लाडक्या बहिणीला १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ आणि ४५ हजार गावांमध्ये पांदण रस्ते बांधू असे अनेक आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी महायुतीला सत्ता दिली. आता शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करण्याची वेळ पंतप्रधान मोदींसह महायुतीची आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभांमध्ये सोयाबीनला ६ हजार हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या या आश्वासनाला सोयाबीन उत्पादकांनी साथ दिली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने बाजारात हस्तक्षेप करून सोयाबीनला ६ हजार रुपये हमीभाव जाहीर करून खरेदी सुरु करण्याची गरज आहे. कारण बाजारात सोयाबीन केवळ ४ हजार १०० रुपयांचा भाव मिळत आहे. यात सोयाबीन उत्पादकांचे मरण होत आहे. शेतकऱ्यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महायुतीला निवडून दिले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ आहे. त्यांनी सोयाबीन उत्पादकांना दिलेल्या वचनाची पुर्तता करावी. 

Cotton Soybean
Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

दुसरे महत्वाचे आश्वासन आहे सातबारा कोरा करण्याचे. संपूर्ण कर्जमाफी करू असे अनेकदा शेतकऱ्यांना सांगण्यात आले. खरे तर कर्जमाफीची मागणी शेतकरी निवडणुकीच्या आधीपासूनच करत आहेत. मात्र लाडक्या बहिणीच्या भरवश्यावर निवडणुकीत उतरलेल्या महायुतीला निवडणूक जड जाताच कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले. सत्ता असताना कर्जामाफी दिली नाही आणि आता आश्वासन देता ! असा प्रश्न शेतकरी विचारत होते. पण तरीही शेतकऱ्यांनी महायुतीला साथ दिली. आता महायुतीने शेतकऱ्यांना साथ देण्याची वेळ आली. 

तसेच शेतीमालाच्या हमीभावाशी संलग्न २० टक्के भावांतर योजना राबविण्याचे आश्वासनही देण्यात आले. आता कापूस, उडीद, मका, ज्वारी, बाजरी या पिकांचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. सरकारने तातडीने या शेतकऱ्यांना भावांतरचा फायदा द्यावा. शेतकरी सन्मान योजनेचा निधी म्हणजेच पीएम-किसान आणि नमो शेतकरी सन्मान योजनेतून सध्या शेतकऱ्यांना ६-६ हजारांप्रमाणे १२ हजार रुपये मिळतात. हा निधी वाढून १५ हजार रुपये करू, असे आश्वासन दिले आहे. लाडक्या बहिणीलाही १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ, असेही आश्वासन देण्यात आले. हे आश्वासनही सरकार स्थापन झाल्यानंतर कधी पूर्ण होणार हे पाहावे लागेल. 

Cotton Soybean
Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

याशिवाय शेतरस्त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी ४५ हजार गावांमध्ये पांधण रस्ते बांधू असेही आश्वासन भाजपने दिले आहे. ग्रामिण भागात शेतरस्त्यांचा प्रश्न खूपच गंभीर बनला आहे. तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. याशिवाय २५ लाख रोजगार निर्मिती आणि १० लाख विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन देण्याचेही भाजपने आश्वासन दिले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवत शेतकऱ्यांनी सत्ता दिली. आता पंतप्रधान मोदी आणि राज्य सरकारचे कर्तव्य आहे की त्यांनी दिलेले वचन पूर्ण करावे. सोयाबीन उत्पादकांना तातडीने मदतीची गरज आहे. खुद्द पंतप्रधान मोदी यांनी ६ हजार हमीभावाचे आश्वासन तातडीने पूर्ण करावे. शेतकरी आजही चांगल्या भावाची अपेक्षा ठेऊन आहेत. शेतकऱ्यांनी तुमची अपेक्षा पूर्ण केली. आता तुम्ही दिलेले वचन पूर्ण करा, एवढीच अपेक्षा शेतकरी करत आहेत. 

आता शेतकऱ्यांच्या अपेक्षाला धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आश्वासन पुर्ती करणार का? की केवळ शेतकऱ्यांना झुलवत ठेवणार? हे पुढच्या काळात कळेलच. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com