
Paddy Farming Management: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकिसरे (ता. वैभववाडी) येथील अनंत वसंत मिराशी खरीप हंगामात तीन एकर क्षेत्रावर भातलागवड करतात. रासायनिक खते व शेणखताचा सुयोग्य वापर, पाणी आणि तणनियंत्रण व्यवस्थापन काटेकोरपणे करीत हेक्टरी ३८ ते ४० क्विंटल उत्पादन घेण्यापर्यंत त्यांनी यश मिळवले आहे. तालुका खरेदी विक्री संघाकडून उत्कृष्ट भात उत्पादक म्हणून त्यांचा गौरव झाला आहे.
खरीप हंगामात सिंधुदुर्गात सर्वाधिक क्षेत्रावर भात पीक लागवड केली जाते. जिल्ह्यातील प्रत्येक भागाची भौगोलिक रचना, जमिनीचा प्रकार वेगवेगळा आहे. त्यामुळे लागवडीसाठी वापरण्यात येणारे बियाणे आणि लागवड पद्धती देखील थोड्या फार फरकाने वेगवेगळ्या आहेत. वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे येथील अनंत वसंत मिराशी चाळीस वर्षांपासून भात उत्पादन घेतात. पूर्वी ते पारंपरिक वाणांचा वापर करायचे, परंतु आता सुधारित आणि संकरित बियाण्यांचा वापर करतात. दरवर्षी तीन एकर क्षेत्र भातासाठी राखीव ठेवले जाते. पैकी दोन एकरांत सुधारित तर एक एकरात संकरित वाण असते.
लागवड क्षेत्र निश्चित केल्यानंतर त्या ठिकाणी रोपवाटिकेची जागाही निश्चित केली जाते. मार्चमध्येच त्याची पूर्वतयारी ते करतात. ही जागा स्वच्छ करीत तेथे पालापाचोळ्याचा वापर करून रोपांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार केले जाते. मॉन्सून किंवा साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर रोपवाटिकेत बीज पेरणी केली जाते. एक वाण १३५ ते १४० दिवस कालावधीचे तर दुसरे वाण १४० ते १४५ दिवस कालावधीचे वापरण्यात येते.
रोपवाटिका व्यवस्थापन
पेरणी केल्यानंतर साधारणपणे १३ ते १५ दिवसांचा कालावधी शिल्लक असतो. या कालावधीत लागवड करावयाच्या जमिनीची नांगरणी केली जाते. त्यानंतर आठ दिवसांनी आणि पुन्हा पाच ते सहा दिवसांनी अशी तीनदा जमिनीची मशागत केली जाते. जेणेकरून तणाचे प्रमाण कमी होईल. या जमिनीत उन्हाळ्यात शेणखत पसरून ठेवलेले असते. तीनदा नांगरणी केल्यामुळे ते संपूर्ण शेतात चांगल्या प्रकारे मिसळते. रोपांची योग्य पद्धतीने वाढ होण्याच्या दृष्टीने निरीक्षण काटेकोर ठेवले जाते. रोपवाटिकेतील रोपांना साधारणपणे सात ते आठ दिवसांनी नत्रााचा हलकी मात्रा देण्यात येते.
पेरणीनंतर साधारणपणे रोप १५ दिवसांनी लागवडीयोग्य होते. त्यानंतर पुनर्लागवड करण्याचे नियोजन केले जाते. मिराशी यांच्याकडे दोन प्रकारची जमीन आहे. पावसाचे प्रमाण अधिक असेल तर वरकस जमिनीतील लागवडीला आधी सुरुवात करतात. चिखलणी करून रोप लागवड केली जाते. पॉवर विडर आणि बैल अशा दोन साधनांचा वापर गरजेनुसार केला जातो. बैलांद्वारे मळ्यांच्या कोपऱ्यांची नांगरणी चांगल्या पद्धतीने होते. चिखलणी करताना मिश्रखतांचा वापर साधारणपणे गुंठ्याला दोन ते तीन किलो खत या प्रमाणात केला जातो.
रोप पुनर्लागवड
रोप पुनर्लागवड करण्यासाठी साधारणपणे पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागतो. सर्वसाधारण पणे जुलैच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यत ती पूर्ण होते. विहिरीच्या पाण्याची सोय असल्यामुळे पावसावर अवलंबून राहावे लागत नाही. त्यामुळे पुनर्लागवडीत खंड पडत नाही. लागवड केलेल्या शेतामध्ये योग्य प्रमाणात पाणी साचून राहील याची दक्षता घेतली जाते.
सिंधुदुर्गात सतत पाऊस पडत असतो. मुसळधार पावसामुळे शेताचे बांध फुटतात. त्यामुळे बांधावर सातत्याने लक्ष ठेवावे लागते. पाणी साचून राहिल्यामुळे तण कमी प्रमाणात येते. पुनर्लागवडीनतंर २० ते २५ दिवसांनी तण भांगलणीद्वारे काढले जाते. त्यानंतर हलका पाऊस सुरू असताना प्रति गुंठा एक ते दोन किलो नत्र दिले जाते. त्यातही रोपांची वाढ पाहून त्याचे प्रमाण कमी जास्त केले जाते.
उत्पादन व विक्री
रोपांची वाढ सुरू असताना उंदरांकडून रोपांचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतात पाणी साचून ठेवणे आणि गिरीपुष्पासारख्या झाडांचा पाला शेताच्या बांधावर ठेवणे या पद्धतींचा वापर होतो. त्यामुळे उंदीर त्या ठिकाणी जाण्याचे टाळतात. अशा प्रकारच्या अनुभवातून व अभ्यासातून आलेल्या कमी खर्चिक उपाययोजना प्रभावी ठरतात. ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पीक कापणीयोग्य होते. पाऊस पडणार नाही याची खात्री करून कापणीला सुरवात केली जाते.
सकाळच्या सत्रात कापणी करून भात वाळविला जातो. सायंकाळच्या सत्रात झोडणी केली जाते. दुसऱ्या दिवशी हलके उन्हात पुन्हा ते सुकविले जाते. त्यानंतर पिशवीत भरून ठेवले जाते. दरवर्षी हेक्टरी ३८ ते ४० क्विंटलच्या दरम्यान उत्पादन घेण्यात येते. साधारणपणे तीन एकरांत पाच ते साडेपाच टन उत्पादन मिळते. घरी वापरासाठी आवश्यक भात ठेवून उर्वरित भाताची शासकीय खरेदी केंद्रावर विक्री केली जाते. वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक भात विक्री मिराशी करतात. मागील वर्षी त्यांनी साडेतीन टन भाताची विक्री केली होती. सलग तीन ते चार वर्षे तालुक्यात सर्वाधिक भातविक्रीचा मान त्यांना मिळाला आहे. त्यामुळे तालुका खरेदी- विक्री संघाने उत्कृष्ट भात उत्पादक म्हणून त्यांचा गौरव केला आहे.
- अनंत मिराशी ९४०४१६७७२७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.