Security System: न्हानीला बोळा अन् दरवाजा मोकळा

Security of Mantralaya Entry: फेशियल रिकॉग्नीनेशन म्हणजे चेहरा स्कॅन केल्यानंतर दरवाजा उघडतो, त्यानंतरच प्रवेश दिला जातो. मात्र, ध चा मा करायची प्रशासनाची रीत नवी नाही. त्यामुळे या प्रणालीद्वारे प्रवेश करत असताना आपण आरोपी किंवा दहशतवादी तर नाही ना, अशी शंका अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना येत आहे.
Facial Recognition
Facial RecognitionAgrowon
Published on
Updated on

Facial Recognition Mantralaya security:

ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा, आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही.

जाहली न कोणाची सांग राखरांगोळी,

आपुलीच रांगोळी काढणे बरे नाही.

आजकाल असे प्रत्येकाला म्हणजे महायुतीतील तीनही पक्षांच्या नेत्यांना आणि आमदारांना वाटतेय. पण सुरेश भटांची गजल मनातल्या मनात गुणगुणण्यावाचून त्यांना पर्याय नाही. सध्या मंत्रालय, पक्ष कार्यालये आणि नेत्यांच्या कार्यकर्त्यांत एकच चर्चा आहे, ती मंत्रालयात लावण्यात आलेल्या एफआरएस तंत्रज्ञानाची! फेशियल रिकॉग्नीनेशन म्हणजे चेहरा स्कॅन केल्यानंतर दरवाजा उघडतो आणि त्यानंतरच प्रवेश दिला जातो.

मात्र, ध चा मा करायची प्रशासनाची रीत नवी नाही. त्यामुळे या प्रणालीद्वारे प्रवेश करत असताना पोलिस ज्या पद्धतीने तपास करतात तो पाहता आपण आरोपी किंवा दहशतवादी तर नाही ना अशी शंका अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना येत आहे. एका बाजूला हा कडेकोट बंदोबस्त आणि दुसऱ्या बाजूला गार्डन आणि मुख्य प्रवेशद्वारातून मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनांचा ताफा, त्यात बसलेले कार्यकर्ते आणि अन्य कर्मचाऱ्यांना कोणताही नियम लावला जात नाही.

त्यामुळे सध्या ‘दरवाजा मोकळा आणि न्हाणीला बोळा’ या म्हणीसारखा प्रकार सुरू आहे. वेगवेगळ्या विभागांकडून जम केलेली माहिती, माहिती तंत्रज्ञान विभागाकडे पाठविली जाते. या माहितीची खातरजमा करून ती संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे केली जाते. त्यानंतर चेहरा आणि डोळ्यांचे स्कॅनिंग करून माहिती भरली जाते. त्यानंतर मंत्रालयाच्या कोणत्याही प्रवेशद्वारातून प्रवेश करता येतो.

Facial Recognition
Water Conservation : गावासाठी सरपंच ‘पाणीदार’ हवा...

मंत्रालयाची सुरक्षा अधिक चांगली होईल, मंत्रालयात अनावश्यक येणाऱ्यांची गर्दी कमी होईल आणि दलालांना चाप बसेल असा दावा केला जात आहे. मात्र, ही गर्दी काही कमी होताना दिसत नाही. ज्याअर्थी मंत्रालयात गर्दी होते त्याअर्थी राज्यातील प्रशासन व्यवस्था ढासळली आहे, असा निष्कर्ष लावला जात होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तसे बोलून दाखवले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर ही गर्दी कमी करण्याचे आव्हान आहे. राहिला प्रश्न दलालांचा! दलाल रांगेतून येतात आणि ते मंत्रालयात कामे करून घेतात, असा भाबडा समज विरोधकांचा आहे आणि त्याला सत्ताधाऱ्यांचेही समर्थन आहे. त्यामुळेच हा कडेकोट बंदोबस्त केला जात आहे. वास्तविक मंत्रालयाशेजारी असलेल्या पंचतारांकित हॉटेल आणि बिनदिक्कत प्रवेश करता येणाऱ्या बंगल्यावर कुणाची उठबस असते. हॉटेलांमध्ये सकाळच्या ब्रेकफास्टपासून कुणाच्या बैठका सुरू होतात याचा आदमास घेतला तरी दलाल कुठल्या रांगेत उभे असतात ते कळेल.

मात्र, सत्तेच्या बाजारात सोयीचे अर्थ लावून अंग काढून घेतले जाते. तर हा चेहऱ्यांचा बाजार सध्या भलताच चर्चेत आहे. मात्र, काहीही करून दिल्लीच्या संसद भवनासह अन्य मंत्रालयांमध्ये लावण्यात आलेल्या कडेकोट बंदोबस्ताच्या धर्तीवर महाराष्ट्राचे मंत्रालय कडेकोट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या फेस स्कॅनिंगबाबत अनेक अफवा, वदंता पसरविल्या जात आहेत. एकदा का स्कॅनिंग करून व्यक्ती आत प्रवेशकर्ता झाला की तो कोणत्या मजल्यावर जाणार, कुणाला भेटणार ही सर्व माहिती समजू शकणार आहे. मात्र, त्याबाबत अद्याप अधिकृतरीत्या प्रशासनाकडून काहीही सांगण्यात आलेले नाही.

मंत्र्यांना दरवाजा मोकळा

जुन्या जाणत्यांच्या चर्चेतून आलेला मुद्दा असा की, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रशासकीय गतिमानतेसाठी काही बदल सुचविले होते. त्यासाठी मंत्रालयाचे दोन मजले मंत्र्यांसाठी आणि वरच्या मजल्यांवर प्रशासन अशी व्यवस्था आणण्याचा विचार सुरू होता. जेणेकरून प्रशासनाला काम करता येईल. मात्र, एका ज्येष्ठ मंत्र्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला होता.

असे केलात तर मतदारसंघात फिरणे मुश्कील होईल. नेता आहे म्हटल्यावर कार्यकर्ते येणार. त्यामुळे असा विचार करू नका असे सुचविले होते. आताही मंत्री ही कडेकोट व्यवस्था भेदून आपले कार्यकर्ते वाहनांतून आत आणत आहेत. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी २५ कार्यकर्ते असेच चालत आत नेले. त्याच्या बातम्या आल्या. पण आता हळूहळू मंत्री आणि आमदार याबाबत बोलू लागले आहेत.

Facial Recognition
Agriculture Technology Center : कर्जत येथे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र

धनंजय मुंडेंचा पाय खोलात

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला ६० दिवस पूर्ण होत आहेत. या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. तर अन्य आरोपी मकोका अंतर्गत अटकेत आहेत. वाल्मीक कराड खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत आहे. त्यात अंजली दमानिया यांनी मुंडे यांना हैराण करून सोडले आहे. डीबीटी धोरण वगळून मुंडे यांनी राबविलेले निविष्ठा वितरण प्रकरण मुंडे यांनी विधिमंडळाच्या स्तरावर थंड केले असले तरी दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याची चिरफाड केली.

मात्र, त्यानंतर दिवसभर गदारोळ उडाला. जुन्या प्रकरणाला नव्याने फोडणी दिली तर त्याच दिवशी मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दमानिया यांना अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. मात्र, मुंडे सध्या कितीही बॅकफूटवर असले तरी त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांना माध्यमांमधून झालेली स्तुती ऐकायची सवय लागली आहे.

विरोधी पक्षनेतेपदी असताना डोक्यावर घेतलेली माध्यमे रोज उठून आपल्यावर कशी काय बोलू शकतात, असे त्यांना वाटत असावे. किंबहुना ते बोलतातच कसे असे त्यांना वाटते. त्यामुळे दमानिया यांच्याविरोधात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांनी ट्रायल चालवली आहे, असे सांगत त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात होते.

अखेर फडणवीस मराठवाड्यात

विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात सभा घेऊ न शकलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलाव योजना प्रकल्पातील बोगद्याचे भूमिपूजनाच्या निमित्ताने मराठवाड्यात पाय ठेवला. मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्याविरोधात टोकाची भूमिका घेतली होती.

तर मराठा आणि धनगर आरक्षणामुळे तणावही होता. लोकसभा निवडणुकीत मराठा मतांचे प्राबल्य दिसल्याने महायुतीच्या उमेदवारांनी सावध भूमिका घेत फडणवीस यांच्या सभा घेणे टाळले. मात्र, सध्या माध्यमांचे डार्लिंग असलेले सुरेश धस यांनी फडणवीस यांना आष्टीत नेऊन झोकात कार्यक्रम केला.

(लेखक सकाळ ॲग्रोवनचे मुंबई प्रतिनिधी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com