Anjali damania : माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केला २७५ कोटींचा घोटाळा; अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप

Anjali Damania Makes Serious Allegations Against Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. त्यामुळे मुंडे यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
Anjali damania
Anjali damaniaAgrowon
Published on
Updated on

Anjali Damania Live: महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळात तत्कालीन कृषिमंत्री आणि विद्यमान मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी निविष्ठा खरेदीत घोटाळा केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी मंगळवारी (ता.४) पत्रकार परिषदेत केला. मंत्री धनंजय मुंडे यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि या प्रकरणातील प्रत्येकाची मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. त्यामुळे मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

दमानिया यांनी केलेल्या आरोपानुसार, महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळातील कृषी निविष्ठा खरेदीसाठी डीबीटीला बगल देऊन निविष्ठा खरेदी करण्यात आली. २०२२ मध्ये कापूस, सोयाबीनचं विक्रमी उत्पादन आहे. त्यासाठी १ हजार कोटी रूपयांचा उपक्रम सुरू करण्यात आला. १७ मार्च २०२४ पासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होणार होती. १२ मार्च रोजी एक शासन निर्णय आला. या शासन निर्णयानुसार कृषी आयुक्तांना नियंत्रण अधिकारी करण्यात आलं. मात्र त्यावेळी तत्कालीन कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांनी १२ मार्चच्या निर्णयाला विरोध केला. त्याचं कारण जी उत्पादने महामंडळ निर्मित करत नाही, ती उत्पादनं डीबीटीनुसारच वितरित झाली पाहिजेत, असं स्पष्ट मत गेडाम यांनी १५ मार्च रोजी मांडलं.

मात्र तरीही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तसं करायला नको, म्हणून आग्रह धरला. आणि मुख्यमंत्र्यांची यासाठी परवानगी असल्याचं सांगितलं. परंतु मुख्यमंत्र्यांना याबद्दलची अधिकारच नव्हता. त्यामुळे डीबीटीला बगल देऊन या खरेदीच्या परवानगीसाठी काढण्यात आलेल्या पत्रकावर एका रात्रीत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सही केली आणि त्यानुसार योजना राबवण्यात आली, असा आरोप दमानिया यांनी केला आहे.

Anjali damania
Ajit Pawar Meeting : 'एआय'चा कृषी आणि सहकार विभागाने वापर करावा; उपमुख्यमंत्री पवारांचे निर्देश

दमानिया यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी, कापूस बॅग, बॅटरी स्प्रेअर खरेदीत करण्यात आलेल्या घोटाळ्याची एकूण रक्कम २७५ कोटी रुपये असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दमानिया यांनी याबद्दल माहिती देताना सांगितलं की, महामंडळाकडून शेतकऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या नॅनो युरिया, नॅनो डीएपी, कापूस बॅग खरेदीत अधिकचे पैसे देण्यात आलेत. त्यांचे निविदा मे महिन्यात काढून पैसे मात्र मार्च महिन्यात संबंधित कंपन्यांना दिल्याचा आरोपही दमानिया यांनी केला आहे.

दमानिया म्हणाल्या, "राज्याचे तत्कालीन कृषिमंत्र्यांनी डीबीटीला बगल देत इफको कंपनीच्या नॅनो युरियाची एक बाटली बाजारात ९२ रूपयांना मिळत असताना २२० रुपये दराने खरेदी केली. तर नॅनो डीएपीची एक अर्धा लीटरची बाटली २६९ रूपयांना मिळत बाजारात असताना ५९० रुपये दराने खरेदी केली. नॅनो युरिया आणि डीएपीच्या अनुक्रमे १९ लाख ६८ हजार ४०८ आणि १९ लाख ५१ हजार ४२८ बाटल्याची खरेदी दुप्पटीच्या किंमतीने करण्यात आली. त्यामुळे या दोन प्रकरणात ८८ कोटी रुपयांचा घोटाळा आहे." असा आरोपही दमानिया यांनी केला आहे.

पुढे दमानिया यांनी बॅटरी स्प्रे आणि मेटाल्डिहाईडची खरेदी देखील जास्तीच्या दराने करण्यात आल्याचा आरोप केला. दमानिया म्हणाल्या, "मुंडे यांनी अत्यंत चालाखीने हा सगळा घोटाळा केला आहे. त्यासाठी राज्य बाहेरील कंपन्यांच्या नावाने निविदा काढण्यात आल्या. त्यासाठी डीबीटी संदर्भातील २०१८ च्या शासन निर्णयात विशेष बाब म्हणून सूट घेतली. त्यातून बॅटरीच्या स्प्रेची किंमत २ हजार ४५० रुपये असताना ३ हजार ४२६ रूपयांनी २ लाख ३६ हजार ४७ कृषिमंत्र्यांनी विकत घेतले. कापूस बॅग खरेदीत ४२ कोटीचा आणि मेटाल्डिहाईड खरेदीत १६० कोटी रूपयांचा घोटाळा कृषिमंत्री असताना मुंडे यांनी केल्याचा आरोपही दमानिया यांनी केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. तसेच हा पैसे निवडणुकीसाठी वापरण्यात आल्याचाही गंभीर आरोप दमानिया यांनी केला आहे.

दरम्यान, नुकतचं उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला कृषी निविष्ठा खरेदीच्या डीबीटी धोरणात बदल का केले, असा प्रश्न विचारला आहे. त्यासाठी दोन आठवड्याची मुदत देत राज्य सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com