Water Conservation : गावासाठी सरपंच ‘पाणीदार’ हवा...

Rural Development : देशाच्या विकासाची मुहूर्तमेढ गावापासून सुरू होते. गावाच्या विकासाचे नियोजन लोकसहभागाने सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करावयाचे असते. लोकांच्या गरजा लक्षात न घेता गावाचा विकास आराखडा केल्यास तो शाश्‍वत आणि संतुलित कसा असेल?
Water Conservation Project
Water ConservationAgrowon
Published on
Updated on

Water Conservation For Rural Development : देशाच्या विकासाची मुहूर्तमेढ गावापासून सुरू होते. गावाच्या विकासाचे नियोजन लोकसहभागाने सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करावयाचे असते.

लोकांच्या गरजा लक्षात न घेता गावाचा विकास आराखडा केल्यास तो शाश्‍वत आणि संतुलित कसा असेल? महाराष्ट्रात एकूण सुमारे २८,००० ग्रामपंचायती आहेत. म्हणजेच २८,००० सरपंच आणि सुमारे दोन लाख ग्रामपंचायत सदस्य आहेत.

त्यापैकी ५० टक्के महिला, म्हणजेच सुमारे १,००,००० महिला सदस्य. गावाच्या शाश्‍वत विकासात, किंबहुना पंचक्रोशीच्या विकासात पाणी आणि पर्यावरण हेच विषय अग्रक्रमाने असायला हवेत.

येत्या कालावधीत ग्रामपंचायतीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. २०२२ च्या अध्यादेशाने सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यात येत आहे. पंचायतीच्या कारभारात स्थिरता येणे आणि निश्‍चित कालावधीत विकास आणि त्याचे नियोजन आणि अंमलबजावणी होणे ही धारणा आहे.

बऱ्याच ठिकाणी असेही होते, की सरपंच एका गटाचा आणि सदस्य इतर गटाचे असतात. असा विरोधाभास ही बऱ्याच ठिकाणी आढळून येतो. हे गट, तट, विरोध, हा केवळ निवडणुकांपुरते मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. आता सर्वांनी एकत्र मिळून सहविचाराने गावाच्या विकासासाठी झोकून देऊन काम करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ अन्वये ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या किमान सात ते कमाल १७ अशी आहे; जनतेतून निवडून आलेला सरपंच मिसळल्यास ८ ते १८ सदस्य आहेत. गावाच्या विकासासाठी संपूर्ण पाच वर्षांचा कालावधी देण्यात आलेला असून, १८ लोकप्रतिनिधी जोडलेले आहेत.

Water Conservation Project
Water Conservation : पाझर तलावासाठी शेतातील योग्य जागा कोणती?

आजही समाजामध्ये अत्यंत सकारात्मकदृष्टीने काम करणारे आणि चांगल्या कामावर विश्‍वास ठेवणारे अनेक जण आहेत. हेच ग्रामपंचायतीचे सौष्ठव. वैरभाव, एकमेकांबद्दलचा आकस, विरोध ही समाजाला न भावणारी अशी गोष्ट आहे. शांती आणि समृद्धी हे आपल्या भारतीय समाजाचे मानक आहे; आणि हेच चिरंतन आहे.

गट, पक्ष हे विसरून सर्व निर्वाचित सदस्य, सरपंच आणि उपसरपंच हे एकाच विचाराने काम करणारे असतील आणि त्यांच्यामध्ये वैयक्तिक हेवेदावे नसतील तर गावाच्या स्वरूप पाच वर्षे नव्हे, तर केवळ दोन वर्षांत बदलल्याचे स्पष्टपणे जाणवेल. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर जाहीरनामा निघाल्यावर पहिल्या बैठकीत उपसरपंचाची निवड होते. या बैठकीमध्ये सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांचा एक गट निर्माण होईल.

बैठकींची रचना आणि पूर्वतयारी

सर्व बैठका सरपंचाच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येतात. सबब सरपंचांनी बैठकीची पूर्व तयारी अभ्यासपूर्ण पद्धतीने करणे योग्य राहील. बैठकीचा अजेंडा, हेतू याबाबत स्पष्टता असावी. बैठक सुरू होण्याची आणि संपण्याची वेळ निश्‍चित असावी. मुद्देनिहाय आणि विषयनिहाय बैठक घ्यावी. सरपंच उपसरपंच आणि सदस्यांनी संगणक साक्षर होणे गरजेचे आहे.

सरपंचांनी प्रत्येक बैठक संगणकाचा आणि प्रोजेक्टरचा वापर करून घेणे गरजेचे आहे. आपल्याला जे मांडावयाचे आहे त्याची आधी नीट आखणी करून ते पॉवर पॉइंटच्या स्वरूपात मांडणी केल्यास लोकांना दृकश्राव्य माध्यमातून त्याचे नीट आकलन होते. उचित ठिकाणी महाराष्ट्र शासनाने तसेच केंद्र शासनाने अनेक विषयावर केलेल्या व्हिडिओ क्लिप्स आणि माहिती याचा वापर करावा.

Water Conservation Project
Water Conservation : जलस्रोतांचे करा संरक्षण

ग्रामसभेच्या बैठका

प्रत्येक वित्तीय वर्षात विहित करण्यात येतील अशा दिनांकास आणि वेळेस ग्रामसभेच्या निदान चार सभा घेणे बंधनकारक आहे. (यात कसूर केल्यास शास्ती होऊ शकते.) सरपंचास कोणत्याही वेळी ग्रामसभेची बैठक बोलावता येऊ शकते. त्याच प्रमाणे स्थायी समिती, पंचायत समिती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागणी केल्यावर बैठक बोलावली जाते.

मासिक बैठका

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ३६ नुसार आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत (सभेबाबत) नियम १९५९ मधील तरतुदीनुसार प्रत्येक महिन्यात किमान एक मासिक सभा घेणे बंधनकारक आहे.

बैठकीचे इतिवृत्त

या प्रत्येक बैठकीचे इतिवृत्त बैठकीनंतर लगेचच अंतिम करावे. इतिवृत्तामध्ये विलंब करू नये.

बैठकांचे नियोजन

एकूण निदान चार ग्रामसभा आणि १२ मासिक सभा यांचे एकत्रित कॅलेंडर वित्तीय वर्षाच्या पूर्वी तयार करावे. म्हणजे त्यांचे नियोजन आणि सकस कामकाज करता येते.

Water Conservation Project
Water Conservation Project: जलसंधारण प्रकल्पांच्या देखभाल, दुरुस्तीकरिता नवीन धोरण आणणार

सरपंचाने गाव केले पाणीदार

जयराम नाईक तांडा (तर्फे पाचेगाव) ता. गेवराई, जि. बीड हे सुमारे ३०० घरांचे गाव. लोकसंख्या सुमारे १६००. बहुसंख्य बंजारा समाजाचे. प्रत्येकी किमान एक हेक्टर शेती आहे, परंतु पाणी नसल्याने मजुरी हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन. सुमारे २५० कुटुंबे ही ऊस तोड कामगार म्हणून पुणे, कोल्हापूर आणि गुलबर्गा (कर्नाटक) येथे जातात.

२०१५ पासून ऊस तोड कामगार म्हणून जाणाऱ्यांची संख्या दरवर्षी तीस ते चाळीस कुटुंबाने वाढतच होती. येथील स्थानिक भाषेत सुमारे २५० कोयते मंजुरीला जातात. हे बहुतेक सर्व जण तरुण तिशीतील. घरी मुलांना सांभाळण्याची सोय नसेल तर मुलांसह स्थलांतर. मुलांचे शिक्षण आणि आरोग्याची परवड.

या गावाचे युवा सरपंच विष्णू राठोड यांनी आपल्या गावाच्या गरजा ओळखताना पाणी हेच गावाच्या प्रगतीसाठी शस्त्र आहे हे जाणले. गावाची भौगोलिक स्थिती जाणून घेतली. गावाच्या उत्तरेला मोठ्या जलग्रहण क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याच्या साठवणुकीचा एक तलाव सुमारे पन्नास वर्षांपूर्वी बांधलेला होता.

परंतु राज्यातील इतर तलावाप्रमाणे याही तलावाची अवस्था गंभीर होती. सांडवा तुटलेला, गाळाने तलाव भरलेला आणि तलावातील पाण्याची गळती होती. तलावाचा पुढचा ओढा गाळाने भरल्याने जमिनीला समतल झालेला होता. या तलावाची क्षमता सुमारे दोन कोटी लिटर पाणी साठवण्याची आहे.

गावशिवाराचा भाग साधारणपणे साडेसहाशे ते साडेसातशे मिलिमीटर एवढ्या पर्जन्यवृष्टीचा आहे. मागील दहा वर्षांमध्ये सुमारे चार ते पाच वर्षे ही सरासरीपेक्षा अधिकच्या पर्जन्याची आहे. या सर्व बाबींचा विचार करून त्यांनी यावर काम करण्याचे निश्‍चित केले. डॉ. सुमंत पांडे आणि त्यांच्या गटाने गाव सगळा अभ्यास केला.

संपूर्ण परिसराची ड्रोनच्या माध्यमातून अभ्यास केला. लोकांच्या बैठका घेतल्या आणि परिस्थिती नीट आकलन करून कामाची दिशा ठरवली.२०२३ च्या मे महिन्यामध्ये नभांगण फाउंडेशनाच्या आर्थिक सहकार्याने सुमारे दीड महिना लोकसहभागाने जलसंधारणाची कामे केली.

त्याचा परिणाम गावातील सुमारे ६० विहिरीतील पाणीसाठा वाढला. या संपूर्ण वर्षभर या विहिरीतील पाणीसाठा वाढला. कोरड्या कूपनलिकांना पाणी आले. आज ओढ्याकाठच्या दोन्ही बाजूंच्या सुमारे दोनशे एकर जमिनीवर दोन पिके घेतली जातात.

बाजरी, ज्वारी, तूर, मूग, उडीद यांसारखे पारंपरिक पिके आहेतच, तसेच बरेच शेतकरी आता रेशीम शेतीकडे वळले आहेत. आता संपूर्ण गाव समन्यायी पद्धतीने सिंचनाखाली आणण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला आहे. म्हणून जयराम नाईक तांड्याचे सरपंच विष्णू राठोड हे खऱ्या अर्थाने पाणीदार सरपंच झाले आहेत.

९७६४००६६८३

(माजी कार्यकारी संचालक, जलसाक्षरता केंद्र, यशदा, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com