Indian Agriculture : सूक्ष्मजीव ठेवतील आपली शेती जिवंत

Agriculture : रासायनिक खते, तणनाशके आणि कीडनाशकांचा अनियंत्रित वापरामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंवर परिणाम होऊन त्यांचे प्रमाण कमी होते. ही परिस्थिती शेतीमध्ये टाळली जाऊन जिवाणूंच्या वाढीचा वेग वाढतो. यामुळे माती आणि वनस्पतींची प्रतिकार शक्ती वाढून जमिनीच्या कार्यक्षमता वाढीस चालना मिळते.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

Multilevel Farming : आपली भारतीय पारंपरिक शेती ही प्रामुख्याने निसर्गाच्या जवळ जाणारी होती. दरम्यानच्या काळात होत गेलेल्या विविध सुधारणांमुळे शेती निसर्गापासून दूर गेलेली आहे. तिच्याकडे केवळ एखादे उत्पादन देणारा कारखाना अशा भौतिक स्वरूपामध्ये पाहण्याची पाश्‍चिमात्य पद्धती आपल्याकडेही हळूहळू रुजत गेली. रासायनिक शेतीमध्ये शेतकऱ्यांना बहुतांश सर्व निविष्ठांसाठी पूर्णपणे बाजारावर अवलंबून राहावे लागत आहे.

त्याचे काही काळ फायदे दिसून आले तरी त्याचे अंतिमतः ते नुकसानीचे असल्याचे आता सर्वांना जाणवू लागले आहे. अनेक शेतकरी आता एकात्मिक सेंद्रिय रासायनिक पद्धतीची कास धरू लागले आहे. सेंद्रिय शेतीमध्ये प्रामुख्याने वापरले जाणारे अनेक घटकही बाजारात उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे अशा बाजारातील सेंद्रिय घटकांच्या नावाखालीही शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या बातम्या नियमित होत गेल्या. अशा स्थितीमध्ये नैसर्गिक शेतीचा गाजावाजा वाढला. खऱ्या अर्थाने नैसर्गिक शेती कशाला म्हणता येईल, याचा ऊहापोह करतानाच सूक्ष्मजीवांच्या साह्याने शेतजमिनी जिवंत ठेवण्याकडे आपण लक्ष देऊया.

मातीमध्ये असलेल्या विविध सूक्ष्म जिवांच्या (यात उपयुक्त जिवाणू, बुरशी इ. सर्व आले.) साह्याने वनस्पती आपली वाढ करून घेत असते. गेल्या काही वर्षांमध्ये या प्रमुख घटकाकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. या सूक्ष्मजीवांची जाणीव ठेवून त्यांना पूरक अशा पद्धतीने शेती करणे म्हणजेच नैसर्गिक शेती होय.

यात बाहेरून काही टाकण्याऐवजी प्रामुख्याने नैसर्गिकरीत्या मातीमध्ये वाढणाऱ्या सूक्ष्म जिवाच्या साह्याने केली जाते. या पद्धतीमध्ये जमीन सजीव असल्याचे समजून सर्व व्यवस्थापन केले जाते. परिणामी, जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढते. सूक्ष्मजीव आणि गांडुळे हे अनादी काळापासून एकमेकांचे साथीदार आहेत. एकाची संख्या वाढली, की दुसऱ्याचीही संख्या आपोआप वाढते. हे दोघे भरपूर प्रमाणात उपलब्ध असले की जमिनीचे आरोग्य सुधारते.

Agriculture
Agriculture Success Story : ‘संघर्ष आहे! पण शेतीतच आयुष्य आहे...’

रासायनिक घटकांच्या अवाजवी वापर आणि सातत्याने घेतल्या जाणाऱ्या पिकांमुळे आपल्या नैसर्गिक संसाधनांचे अत्याधिक शोषण होत आहे. पिकाच्या उत्पादन खर्चात वाढ होत चालली असून, त्या तुलनेमध्ये उत्पादन वाढताना दिसत नाही. त्यातच ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरणातील संभाव्य बदल हे चिंतेचे विषय बनले आहेत. जमीन, प्राणी, पक्षी, वनस्पती आणि मानवाचे स्वास्थ यावरील परिणामाबाबत शेतकऱ्यांमध्ये हळूहळू जागरूकता वाढत आहे.

म्हणून रासायनिक शेतीला पर्याय म्हणून सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत आहे. मात्र गोधन कमी झाल्यामुळे सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक तितक्या सेंद्रिय खतांचा पुरवठा होत नाही. सेंद्रिय कार्बन हे शेतीच्या ताकदीचे सूचक नसून, गांडुळे आणि सजीवांचे प्रमाण आणि गुणवत्ता हे शेतीची ताकद दर्शवते. त्यामुळे उपलब्ध सेंद्रिय पदार्थ शेतामध्येच विघटित करण्यास प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.

हे सेंद्रिय पदार्थ शेतात विघटित होण्याच्या प्रक्रियेत व त्यानंतर त्यावर वेगवेगळे उपयुक्त जिवाणू आणि गांडुळांची वाढ होते. जमिनीतील सेंद्रिय कार्बन आपोआप वाढतो. जिवाणू जिवंत असेपर्यंत पिकाला मदत करतातच, पण त्यांचे मृत शरीरही प्रथिनांचे बनलेले असते. ही प्रथिने ह्युमसच्या रूपात मुळांजवळ जमा होऊन वनस्पतीच्या पोषणात मदत करतात.

सामान्यतः रासायनिक शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या खते, तणनाशके आणि कीडनाशकांच्या माऱ्यामुळे उपयुक्त जिवाणू शेतामध्ये कमी होतात. ही परिस्थिती नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीमध्ये टाळली जाऊन जिवाणू वेगाने वाढतात. परिणामी माती आणि वनस्पतींची प्रतिकार शक्ती वाढते.

सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीमध्ये उत्पादनात घट होते का? हा कोणत्याही सर्वसामान्य शेतकऱ्यांचा रास्त प्रश्‍न असतो. कारण आपल्या देशातील ८६ टक्के शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. पूर्णपणे सेंद्रिय परिस्थितिकी (इकोसिस्टिम) तयार होईपर्यंत सेंद्रिय शेतीच्या सुरुवातीच्या वर्षांत उत्पादनात नक्कीच काही प्रमाणात घट होते. त्यातच आजकाल प्रत्येकाकडे शेणखत किंवा सेंद्रिय खत उपलब्ध नसल्यामुळे अशा खतांसाठी खर्च वाढत आहे.

सेंद्रिय घटकांच्या बाजारातील किमती अव्वाच्या सव्वा वाढलेल्या दिसतात. परिणामी, सेंद्रिय शेती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचा समज वाढत आहे. अशा स्थितीमध्ये कोणताही घटक शेताच्या बाहेरून न पुरवता संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याची चळवळ तयार होत आहे. आता सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीमध्ये मूलभूत फरक आहे.

Agriculture
Agriculture Industry : उच्चशिक्षित युवकाने मानले शेतीलाच उद्योग

रासायनिक व सेंद्रिय शेतीमध्ये पिकाला पोषक तत्त्वांचा पुरवठा करण्यासाठी खतांची मात्रा ठरवली जाते. परंतु नैसर्गिक शेतीमध्ये शेतात कोणत्याही बाह्य खतांचा वापर करण्याऐवजी जिवाणूंच्या संवर्धनावर भर दिला जातो. अत्यंत कमी प्रमाणात शेणखत वापरून जिवामृत आणि घन जिवामृत तयार करून त्यांचा वापर केला जातो.

द्रवरूप जिवामृत शेतात सिंचनासोबत दिले जाते, तेव्हा त्यात असलेले जिवाणू जमिनीत वाढू लागतात. नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू वातावरणातील नायट्रोजन वनस्पतीच्या मुळांमध्ये आणि मातीमध्ये स्थिर करतात. जमिनीत वाढलेल्या सेंद्रिय पदार्थामुळे जिवाणूंसोबतच गांडुळांची संख्या वाढते. तेही विविध पोषक तत्त्वांची उपलब्धता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या हालचालींमुळे जमिनीच्या खालच्या पृष्ठभागातील पोषक तत्त्वे वर मुळांच्या कक्षेत उपलब्ध होतात.

नैसर्गिक शेतीमध्ये एका देशी गायीच्या शेण आणि मूत्रावर ३० एकरांपर्यंत शेती करता येत असल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञ करत असतात. त्यानुसार १ एकर शेतीसाठी एका दिवसाचे गाईचे शेण आणि गोमूत्राची आवश्यकता असते. यामध्ये जिवाणूंच्या वाढीसाठी दीड किलो बेसन, दीड किलो गूळ आणि ५० ग्रॅम माती (रासायनिक घटकांचा वापर नसलेली.) हे घटक दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून कल्चर तयार करावे.

हे द्रावण उन्हाळ्यात ३-४ दिवसांत आणि हिवाळ्यात ६-७ दिवसांत तयार होते. शेतीमध्ये जिवाणूंच्या योग्य प्रमाणात वाढ होऊन त्यांची परिस्थितिकी तयार होईपर्यंत दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. या काळात उत्पादनामध्ये काही प्रमाणात घट होते.

म्हणूनच एकाच वेळी सर्व शेतीमध्ये सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याऐवजी अर्धा किंवा एक एकरपासून हळूहळू वाढवत नेणे फायद्याचे असल्याचा सल्ला गाझियाबाद येथील सेंद्रिय प्रशिक्षण केंद्राद्वारे दिला जातो. आपल्या अनुभवानुसार क्षेत्र वाढवायचे की नाही, याचा निर्णय शेतकरी स्वतः घेऊ शकतात.

अमर तायडे, ९८५०६२०००२

(विषय विशेषज्ञ, कृषी विस्तार, कृषी विज्ञान केंद्र, अमरावती)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com