Ornamental Fish : शोभिवंत माशांच्या संगोपनाच्या पद्धती

Ornament Fish Management : मत्स्यालयातील पाण्याचे तापमान २० ते ३० अंश सेल्सिअस असावे. पाण्याची पारदर्शकता, पुरेसा प्रकाश, माशांची योग्य संख्या आणि पाणवनस्पतीच्या वापरामुळे शेवाळ तयार होते.
Ornamental Fish
Ornamental FishAgrowon

कृष्णा पाटील, जयंता टिपले

मत्स्यालयातील पाण्याचे तापमान २० ते ३० अंश सेल्सिअस असावे. पाण्याची पारदर्शकता, पुरेसा प्रकाश, माशांची योग्य संख्या आणि पाणवनस्पतीच्या वापरामुळे शेवाळ तयार होते. ते कमी करण्यासाठी पाणी बदलावे लागते. पाण्यात ३ ते ४ शिंपले ठेवावेत. मत्स्यालयास ८ ते १० तास प्रकाश आणि ३ ते ४ तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवावे. शोभिवंत माशांच्या व्यवसायातून रोजगार निर्मितीला संधी आहे. शहरांमध्ये शोभिवंत माशांच्या व्यापारात दरवर्षी दहा टक्के वाढ होत आहे.

शोभिवंत मत्स्यपालनाच्या पद्धती

इनडोअर युनिट

कमी आकाराच्या जागेमध्ये शक्य.

घरातील एखादी खोली किंवा पडवीमध्ये मत्स्य संवर्धन करता येते. मत्स्यबीज उत्पादन आणि संवर्धनाकरिता विविध आकारांच्या काचेच्या टाक्यांमध्ये मत्स्य संवर्धन केले जाते.

जास्त किंमत मिळवून देणाऱ्या मत्स्य प्रजातीचे बी उत्पादन आणि संवर्धनाकरिता या प्रकारचे युनिट योग्य आहे.

यार्ड स्केल युनिट

या प्रकारचे युनिट पडवी किंवा अंगण या ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध असल्यास करता येणे शक्य आहे. याकरिता १००० ते २००० चौरस फूट जागा योग्य आहे. यामध्ये प्लॅस्टिक पूल आणि एफआरपी टाइम ठेवून मत्स्य संवर्धन करता येते. 

मत्स्यबीजाचे विक्री योग्य आकारापर्यंत संवर्धन करण्याकरिता या प्रकारचे युनिट योग्य आहे. जास्त संख्येमध्ये पिले देणाऱ्या माशांच्या संगोपनासाठी योग्य आहे.

एंजल, गोल्डफिश, बार्ब, गुरामी, टेळा संवर्धनाकरिता युनिट उपयोगी आहे.

सिमेंट तलाव युनिट

विविध आकाराचे तलाव बांधून मत्स्यबीज संगोपन करण्यात येते.

यार्ड स्केल युनिटपेक्षा थोडी मोठी जागा उपलब्ध असल्यास अशा प्रकारचे युनिट बांधून मत्स्य संवर्धन करणे योग्य ठरते.

सुमारे ५००० चौरस फुटांपर्यंत जागेमध्ये या प्रकारे एक चांगले युनिट बांधता येते.

सिमेंट तलाव युनिट बांधण्याकरिता सुरुवातीचा खर्च थोडा जास्त असतो, परंतु याद्वारे सर्व प्रकारच्या माशांचे संवर्धन विक्रीयोग्य करण्यापर्यंत करता येते. यातून मिळणारे उत्पन्न देखील जास्त आहे.

Ornamental Fish
Fisheries Employment Opportunity : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

प्लॅस्टिक अस्तरीकरण तलाव युनिट

बारमाही पाण्याचा स्रोत आणि ५ ते १० गुंठे आकाराची मोकळी पडीक जमीन उपलब्ध असल्यास कमी गुंतवणूक करून मत्स्यसंवर्धन करण्याकरिता या प्रकारचे युनिट आदर्शवत आहे.

हे युनिट करण्याकरिता जागेचा आकार आणि क्षेत्रफळाप्रमाणे ५ ते १० मीटर लांब १.५ ते २ मीटर रुंद आणि १.२ मीटर खोल असे तलाव तयार करून त्यामध्ये २५० ते ३५० मायक्रॉन जाडीचे प्लॅस्टिक अस्तरीकरण करण्यात येते.

तलावाच्या एका बाजूने पाइपलाइनद्वारे पाणी घेण्यासाठी व्यवस्था करावी. विरुद्ध बाजूने अतिरिक्त पाणी वाहून जाण्याकरिता पाइप बसवावा. यामुळे तलावांमध्ये १०० ते १२० सेंटिमीटर पाणीपातळी राखता येते. पाणी बदलणेदेखील सहज शक्य होते.

माशांना नैसर्गिक शत्रूपासून संरक्षण मिळवण्यासाठी संपूर्ण युनिटला शेडनेट वापरून आच्छादित करावे.

पिले देणारे मासे (गप्पी, स्वोर्डटेल, मोली, प्लॅटी) तसेच कोईकार्प, गोल्डफिश, गुरामी, बार्ब अशा प्रकारच्या माशांच्या संवर्धनाकरिता युनिट योग्य ठरते.

अत्यंत माफक खर्चात कमी जागेत कमीत कमी साधन सामग्री वापरून, अत्यंत सोपे तंत्रज्ञान वापरून माशांचे संवर्धन करणे शक्‍य आहे.

मत्स्यपालनातील मूलभूत बाबी

काचेच्या मत्स्यालयाचा आकार ५० × ३० × ३० सेंमी किंवा ६० × ४५ × ३० सेंमी असावा.

मत्स्यालयाकरिता पावसाचे पाणी, वितळलेल्या बर्फाचे पाणी, डिस्टिल वॉटर वापरावे.

मत्स्यालयातील पाण्याचे तापमान २० ते ३० अंश सेल्सिअस असावे.

पाण्याची पारदर्शकता, पुरेसा प्रकाश, माशांची योग्य संख्या आणि पाण वनस्पतींच्या वापरामुळे जे शेवाळ बनते ते कमी करण्यासाठी पाणी बदलावे लागते.

पाण्यात ३ ते ४ शिंपले ठेवावेत.

मत्स्यालयास ८ ते १० तास प्रकाश आणि ३ ते ४ तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवावे. प्रकाशासाठी ट्यूबलाइट बसवावी.

खडीयुक्त वाळू चांगल्या प्रकारे धुऊन वापरावी.

मत्स्यालयामध्ये पाणवनस्पती ठेवावी. त्यामुळे मासे शोभिवंत दिसतात. प्राणवायूचे प्रमाण वाढते. अॅमेझॉन स्वोर्ड प्लान्ट, इंडियन फर्न, बनाना प्लॅन्ट, वॉटर लिली, हायड्रीला. इ. रकर आहेत ते वापरावे.

बुडबुडे सोडण्यासाठी एअर रेटर मशिनचा मत्स्यालयात वापर करावा.

साधारणत: पाण्याच्या निम्मी घनमीटर हवा मत्स्यालयात असावी. मत्स्यालयात पाणी शुद्धीकरणासाठी फिल्टर बसवावा.

थंडीच्या दिवसांत मत्स्यालयाचे तापमान नियंत्रित करण्यासाठी हिटर बसवावे.

मासा जेवढा भुकेला राहतो तेवढा तो चांगला राहतो. थंडीत आठवड्यातून २ ते ३ वेळा खाद्य द्यावे. खाद्याशिवाय डफ निया, मोईना, वर्म्स इत्यादी जिवंत खाद्य पाण्यावर पसरून द्यावे.

मत्स्यालयात गप्पी,गोराफिश, गोल्डफिश, एंजल, टेट्रा,कोई, प्लटी इ. शोभिवंत मासे पाळावेत.

मत्स्यबीज उत्पादनासाठी प्रजनन टाक्यांमध्ये माशांच्या प्रजननाच्या सोयीनुसार आवश्यक वातावरण तयार करावे. त्यासाठी प्रजननासाठी वापरावयाच्या टाक्या पोटॅशिअम परमँगनेटने निर्जंतुक कराव्यात. या टाक्यांमध्ये ७ ते ८ सामू असलेले पाणी भरून प्रजननक्षम नर आणि मादी मासे सोडावेत. टाक्यांमध्ये निर्जंतुक केलेल्या पाणवनस्पती किंवा प्लॅस्टिकचे कृत्रिम गुच्छ अंडी चिकटण्यासाठी सोडावेत. माशांच्या आवश्यकतेनुसार प्रजननाच्या वेळेस पाण्याचे योग्य तापमान राखले जाते, जेणेकरून मासे वर्षभर भरपूर अंडी देऊन सशक्त पिले देतात. जून ते ऑगस्ट आणि सप्टेंबर ते मार्च या महिन्यांमध्ये जास्त अंडी मिळतात. 

शासकीय अनुदान

राष्ट्रीय मत्स्यिकी विकास बोर्ड, हैदराबाद यांनी लहान प्रमाणात व एकात्मिक पद्धतीने शोभिवंत मत्स्य प्रजनन व पालन करण्याकरिता लाभार्थींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अनुदान देण्याच्या योजना प्रस्तावित केल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या/व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतील.

शोभिवंत माशांची देशांतर्गत, परदेशांत असणारी मोठी मागणी व बाजारपेठ यांचा विचार केल्यास शोभिवंत माशांचे संवर्धन हा चांगले अर्थार्जन मिळवून देणारा जोडधंदा व कालांतराने मुख्य व्यवसाय होऊ शकतो.

शोभिवंत मत्स्यबीज उत्पादनासाठी एमपेडा आणि एमएफडीबी या संस्थांमार्फत काही योजना कार्यान्वित आहेत. या संस्थांमार्फत प्रशिक्षण दिले जाते. 

Ornamental Fish
Fishery Employment : बक्कळ नफा कमवून देणाऱ्या मत्स्य व्यवसायातील संधी

मत्स्यालय  निर्मिती

साहित्य ः योग्य जाडीचे काचेचे तुकडे (टँक आकार). पॉलिथिन पेपर, चिकटपट्ट्या, धारदार चाकू, मोजपट्टी, काबोरेंडम दगड, हिरकणी (काच कापण्याची पट्टी), सिलिकॉन ट्यूब.

प्रथम काचेच्या योग्य तावदानाची निवड करावी. हिरकणीच्या साह्याने काच कापून घ्यावी. प्रथम सपाट पृष्ठभागावर पॉलिथिनचा पेपर अंथरून त्यावर मत्स्यालयाच्या तळासाठी निवडलेली काच ठेवावी. त्यानंतर काचेच्या पाठीमागच्या कडेवर सिलिकॉनचा पातळ थर घ्यावा. पाठीमागे येणारी काच यानंतर उभी करावी आणि योग्य त्या रीतीने बाजूच्या काचा जोडून घ्याव्यात.

यानंतर प्रथम एका बाजूची काच उभी करावी. पाठीमागच्या काचेच्या सिलिकॉन लावलेल्या कडांना जोडावे. दुसऱ्या बाजूची काच अशाप्रकारे जोडा, की शेवटी मत्स्यालयाच्या समोर येणारी काच सिलिकॉनच्या साह्याने दोन बाजूंच्या काचा आणि तळाची काच यांना जोडावी.

मत्स्यालयाची बांधणी पूर्ण झाल्यानंतर सर्व कोपऱ्यांना चिकटपट्ट्या लावाव्यात. सर्व जोडांना लावलेले सिलिकॉन बोटाने दाबून एकसारखे करावे. अशाप्रकारे मत्स्यालय तयार झाल्यानंतर सिलिकॉन सुकण्याकरिता एक दिवस ठेवावे. जास्त झालेले सिलिकॉन चाकूने खरडून काढावे.

मत्स्यपेटीत पाणी ओतून कुठे गळती आहे का, ते तपासावे. तयार मत्स्यालय टेबलावर ठेवावे. हे टेबल मत्स्यपेटी, त्यातील पाणी व शोभेचे साहित्य या सर्वांचे ओझे पेलण्याइतके भक्कम असावे.

मत्स्यालयाचा आकार

गोलाकार, षट्‍कोनाकृती, त्रिकोणी, काचेची हंडी, आयाताकृती, स्टीलचा सांगाडा असलेले, लाकडाचा सांगाडा असलेले, एका खिडकीचे मत्स्यालय. 

सजावटीसाठी साहित्य  

थरांचे दगड, उभे पट्टे असलेले दगड, शिंपले, प्रवाळाची वाळू, ओढ्यात सापडलेले गोटे, मोठे गोटे, संगमरवराचे तुकडे, वाटाण्याच्या आकाराची वाळू.

 देखभालीसाठी लागणारे साहित्य

मासे व झाडांना प्रकाशासाठी बल्ब व ट्यूब्ज. मासे पकडणे, इतरत्र हलविण्यासाठी स्कूप जाळे, मत्स्यालयाच्या आतील भागावर जमा झालेली घाण, शेवाळ काढण्यासाठी ब्रश.

पानझाडांची लागवड करण्यासाठी चिमटे.

- जयंता टिपले, ८७९३४७२९९४

(सहायक प्राध्यापक-अतिथी व्याख्याता, जलीय प्राणी आरोग्य व्यवस्थापन विभाग, मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com