
Pune News : राज्यातील कृषी योजना तसेच कृषी शिक्षण व संशोधनाचा आढावा घेण्यासाठी येत्या शनिवारी (ता. ४) पुण्यात तीन बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. नवे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी कृषी विभागाच्या क्षेत्रीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पुण्याचा दौरा करण्याचे गेल्या आठवड्यात घोषित केले होते. त्यानुसार एकाच दिवशी तीन बैठका घेतल्या जाणार असून, पूर्वतयारीसाठी सध्या अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, योजना समजून घेणे, त्यातील अडचणी लक्षात घेणे आणि पुढील वाटचालीची दिशा ठरविणे अशी भूमिका या बैठकांमागे आहे. कृषिमंत्री अॅड. कोकाटे व कृषी आयुक्त सूरज मांढरे हे दोघेही नवे आहेत. सध्या राज्याला कृषी सचिवच नाही. त्यामुळे या बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले जाण्याची शक्यता वाटत नाही.
पुण्याच्या साखर संकुलमधील आत्मा सभागृहात शनिवारी सकाळी ११ ते दुपारी एक वाजेच्या दरम्यान संचालकांकडून आढावा घेतला जाणार आहे. यात डॉ. कैलास मोते (फलोत्पादन), सुनील बोरकर (गुणनियंत्रण), रफिक नाईकवाडी (विस्तार), विनयकुमार आवटे (प्रक्रिया), अशोक किरन्नळी (आत्मा) या संचालकांकडून कामकाजाचा आढावा सादर केला जाईल. त्यानंतर दुपारी दोन ते साडेतीनपर्यंत स्मार्ट प्रकल्पाचे संचालक डॉ. हेमंत वसेकर यांच्या चमूकडून सादरीकरण होईल.
साडेतीन वाजता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या आढावा बैठकीला सुरुवात होईल. परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे व शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांच्याकडून परिषदेचे कामकाज मांडले जाणार आहे. या बैठकांना कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनाही निमंत्रित करण्याच्या सूचना कृषिमंत्र्यांनी दिल्या आहेत.
अनुदानासह अनेक प्रकल्प रखडलेले
राज्यातील विविध कृषी योजनांचे रखडलेले अनुदान, लांबणीवर पडलेल्या ऑनलाइन डीबीटीच्या सोडती, सिंचन कार्यक्रमांना बसलेली खिळ तसेच राज्यातील अनधिकृत कृषी महाविद्यालये, रखडलेले संशोधन प्रकल्प, याशिवाय क्षेत्रीय कामकाजातील अडथळे, गुणनियंत्रण प्रणालीमधील गैरव्यवहार तसेच कृषी विभागाचा रखडलेला आकृतिबंध हेच सद्यःस्थितीमधील मुख्य मुद्दे असल्याचे अधिकारी सांगतात. यापैकी कोणत्या मुद्द्यांना राज्य शासनाकडून प्राधान्य दिले जाते याकडे आता क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे लक्ष लागून आहे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.