Book Review: पर्यावरणाचे अर्थपूर्ण स्त्रीवादी विश्‍लेषण

Feminist Environmentalism,: स्त्रीवादी अभ्यासक डॉ. छाया दातार यांच्या ‘स्त्रियांचे नाते : जमीन आणि पाण्याशी’ या पुस्तकात स्त्रियांचे पर्यावरणाशी असलेले संबंध, ग्रामीण वास्तव, धोरणांचे परिणाम आणि शाश्वत विकासाचे स्त्रीकेंद्री दृष्टिकोन अभ्यासपूर्णरीत्या मांडले आहेत. हा लेख संग्रह स्त्री सक्षमीकरणाला पर्यावरणीय अर्थ देतो.
Women’s Relationship: With Land and Water Book
Women’s Relationship: With Land and Water BookAgrowon
Published on
Updated on

डॉ. प्रवीण घोडेस्वार

Women’s Relationship: With Land and Water Book:

पुस्तकाचे नाव : ‘स्त्रियांचे नाते : जमीन आणि पाण्याशी’,

लेखिका : छाया दातार,

प्रकाशन : प्रतिमा प्रकाशन, पुणे,

पृष्ठे : १६४

किंमत : २०० रु.

प्रख्यात स्त्रीवादी अभ्यासक डॉ. छाया दातार यांचे ‘स्त्रियांचे नाते : जमीन आणि पाण्याशी’ या पुस्तकाला स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून जमीन आणि पाण्याची चर्चा करते. डॉ. दातार मुंबईच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या स्त्री अध्ययन केंद्राच्या निवृत्त प्राध्यापिका असून, सध्या महिला किसान अधिकार मंचासोबत काम करतात. त्याच्या या पुस्तकाला ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक माधव गाडगीळ यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे.

सप्टेंबर १९९१ ते जून २०१३ या दरम्यान विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या एकूण १५ लेखांचे संकलन आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच गॅब्रिएल डिट्रीच या कवीच्या ‘बाई म्हणते... ’ या कवितेचा सुहास कोल्हेकर यांनी अनुवाद दिला असून, ही कविता आपल्याला अंतर्मुख होण्यास भाग पाडते. आपल्या मनोगतात लेखिका म्हणतात, ‘‘विकेंद्रीकरणामध्येच स्त्रियांना कारभारामध्ये भाग घेण्याची संधी सापडू शकते व खऱ्या अर्थाने त्यांचे सक्षमीकरण होते, असे माझे ठाम मत बनत गेले.

Women’s Relationship: With Land and Water Book
Book Review: गावाच्या विकासाचा मूलमंत्र देणारे ‘ग्राम मंत्रालय’

त्याला कारणीभूत होती माझी गुरू मारिया मिएस. ती खऱ्या अर्थाने पर्यावरणीय स्त्रीवादी होती. तिचे सगळे विचार मला पटले असे नाही, पण एक अतिशय प्रामाणिकपणे जगणारी आणि झपाटलेली स्त्रीवादी म्हणून मला तिच्याबद्दल खूप आदर आहे. वंदना शिवा, मेधा पाटकर ही नावे परिणाम करणारी आहेतच. एक चांगले झाले म्हणजे मी शैक्षणिक क्षेत्रात असूनही मला ग्रामीण भागात फिरण्याची संधी मिळाली.

त्यामुळे काही प्रमाणात मी सामाजिक कार्यातही भाग घेऊ शकले. त्यातूनच जमीन व पाणी याचे महत्त्व सर्वांच्याच जीवनात आणि त्यातही स्त्रियांच्या जीवनात किती मध्यवर्ती आहे याचा प्रत्यय आला. स्त्रियांचे सक्षमीकरण व निसर्गाचे सक्षमीकरण म्हणजे शाश्वतता हे किती परस्परावलंबी आहे हेही लक्षात आले.’’

पुस्तकातल्या पहिल्याच लेखात आपल्याला विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि विधवा स्त्रियांची मुस्कटदाबी यावरील अभ्यासपूर्ण विवेचन वाचायला मिळते. पतीच्या निधनानंतर जमिनीची मालकी त्याच्या विधवा पत्नीकडे येते का? शेती करण्यासाठी लागणारे कौशल्य या बायकांकडे आहे का? सरकारची मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली का? कर्जमाफी मिळालीय का? दुसरे लग्न करण्याबाबत सासर - माहेरचा दृष्टिकोन काय आहे? यासारख्या अनेक प्रश्‍नांचा मागोवा यात घेतला जातो.

Women’s Relationship: With Land and Water Book
Book Review: शाश्‍वत सेंद्रिय शेतीचे सूत्रबद्ध मार्गदर्शन

ग्रामीण स्त्रियांच्या मनात नेमके काय आहे, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न त्या दुसऱ्या लेखातून करतात. वर्धा येथील शेतकरी महिलांशी झालेल्या चर्चेवर आधारित आहे. यातल्या कोणत्याही स्त्रीला आपल्या मुलांनी शिक्षण घेऊन शेती करावी असे वाटत नव्हत. त्यांनी शहरात नोकरी करावी, अशी त्यांची इच्छा होती. याचाच अर्थ ज्यांच्या भरवशांवर शेतीची उद्याची भिस्त आहे, अशी नवीन पिढी शेतीत येण्यास उत्सुक दिसत नाही. त्यामागे अनेक कारणे आहेत, तरुण मुलांना शेतीकडे आकर्षित करण्याची क्षमता आधुनिक तंत्रज्ञानामध्ये असल्याचे लेखिका नमूद करते. त्यामुळे शेती सुलभ व कमी कष्टदायक करणाऱ्या उपयुक्त तंत्रज्ञानाची आवश्यकता लेखिका व्यक्त करते.

मारिया मिएस यांची डॉ. दातारांनी घेतलेली मुलाखतही या पुस्तकात दिलेली आहे. त्यातून पर्यावरणाभिमुख स्त्रीवादाची संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होते. ‘पाणी आणि स्त्री’ यांचा एकमेकांशी असलेल्या सहसंबंधाची चिकित्सक मांडणी करणारे लेख महत्त्वपूर्ण आहेत. महाराष्ट्रातला ‘जलस्वराज्य’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा लेखाजोखा मांडणारा लेखही आहे. याआधी पिण्याच्या पाण्याचा एक प्रकल्प जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये राबवण्यात आला होता. त्यात डॉ. दातार यांच्यासमवेत काम करण्याची संधी मला मिळाली होती. त्या अनुभवावर आधारित ‘पाणी कुठवर आलं ग बाई’ हा दातारांचा लेख महत्त्वाचा आहे.

टाटा सामाजिक विज्ञान संस्था, सेवा, डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी, स्वामिनाथन फाउंडेशनने केलेल्या विविध प्रयोगांची चिकित्सा त्यांनी केली. यातल्या निष्कर्षातून आपल्या सरकारने धोरण कसे आखावे, याचे सूतोवाच होते. भारतीय समाजातले प्रश्‍न जाणून घेत कामाचा रेटा देऊन महिलांना अजून सन्मानाने जगता येईल, यासाठी होत असलेल्या प्रयोगांची व अभ्यासांची दखलही त्या घेतात.

त्याच वेळी पाश्‍चिमात्य देशांतील विकासाचे प्रारूप आपल्या देशात लागू होऊ शकते काय, याचीही समीक्षा त्या करतात. हे लेख वेगवेगळ्या कालावधीत आणि औचित्याने लिहिलेले असले तरी यातून चिरस्थायी विकास, स्त्री-पुरुष समानता, लिंगभाव संवेदनशीलता, समतावादी विचार ठळकपणे अधोरेखित होतात. सरकारी यंत्रणेसमवेत काम करताना लेखिकेला आलेले अनुभव त्या यंत्रणेच्या गुणावगुणाची प्रचिती देणारे आहेत.

स्त्रिया आणि पर्यावरण या सहसंबंधाचाच वेध घेताना लेखिका विसाव्या शतकातील महिलांच्या परिवर्तनवादी चळवळीच्या वाटचालीचाही धांडोळा घेते. पुस्तकाची मांडणी काहीशी अकादामिक वाटली तरी लेखिकेची भाषा सहज आणि सोपी आहे. त्यामुळे यातील संकल्पना सहजपणे समजतात. यातल्या लेखांची वर्गवारी व्यवस्थितपणे करतानाच जुन्या लेखांना आताचे काही संदर्भ किंवा लेखिकेचे मत किंवा टीप असे काही जोडता आले असते नवीन अभ्यासकांना अधिक फायदेशीर ठरले असते.

(लेखक प्राध्यापक आणि स्त्री प्रश्‍नाचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com