Akshaya Tritiya : अन्वयार्थ सोन्याच्या झळाळीचा!

Akshaya Tritiya 2024 : आज अक्षय तृतीया. सोने खरेदीचा हा उत्तम मुहूर्त समजला जातो. परंतु मागील काही महिन्यांत सोन्याच्या किमती फारच वाढल्या आहेत. त्यामुळे ऐन लग्नसराईत ग्रामीण भागातून सोने खरेदीला अल्प प्रतिसाद मिळतोय.
Akshaya Tritiya
Akshaya TritiyaAgrowon

डॉ. केदार विष्णू, डॉ. वैष्णवी शर्मा

Indian Festival and Gold Purchase : सोने म्हणजे संपत्ती आणि प्रतिष्ठेचे झळाळणारे मूर्तिमंत प्रतीक आहे. सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये खोलवर रुजलेल्या सोन्याचा जगभरात मोठा प्रभाव आहे. सोन्याला त्याचे मूल्य, संपत्तीत त्याचे असणारे विशेष स्थान, महागाई विरोधातील एक ढाल आणि सौंदर्याचे सार्वत्रिक प्रतीक म्हणून बहुमूल्य मानले जाते.

तो केवळ एक मौल्यवान धातू नाही, तर समृद्धी, परंपरा आणि सर्व शुभ गोष्टींचे प्रतीक म्हणून पूज्य आहे. जीवनाच्या सर्वच स्तरातील लोक एक शाश्‍वत संपत्ती म्हणून सोन्याकडे आदराने बघतात.

सोन्याच्या जागतिक बाजारपेठेत भारताला महत्त्वाचे स्थान आहे. जगातील सोन्याच्या एकूण मागणीपैकी एक तृतीयांश मागणी भारताकडून सोन्याला आहे. याव्यतिरिक्त, भारताने जगातील सर्वाधिक बचत दर गाठला आहे आणि आता बचत दर ३० टक्क्यांवर पोहोचला आहे. अर्थातच, भारतीय नागरिकांचा सोन्याच्या टिकाऊ मूल्यावर विश्‍वास आहे. आपल्या बचतींपैकी अंदाजे १० टक्के गुंतवणूक ते सोन्यामध्ये करतात.

भारतात सोन्याची मोठी मागणी असली, तरी सोन्याचे खाणकाम करणाऱ्या जगातील आघाडीच्या देशांमध्ये भारताचा समावेश नाही. भारत सोने आयात करून नागरिकांची मागणी पूर्ण करतो. सन २०२१ मध्ये भारताने ५५.८ अब्ज यूएस डॉलर किमतीचे सोने आयात केले. मूल्याच्या आधारे सोन्याची आयात करणारा भारत हा दुसरा सर्वांत मोठा देश ठरला आहे.

या मौल्यवान धातूचा भारतात होणारा वापर आणि त्यात केली जाणारी गुंतवणूक पाहता सोन्याच्या किमतीत अलीकडे झालेली वाढ देशाच्या अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम करणारी ठरली आहे.

Akshaya Tritiya
Gold Rate : सोने पुन्हा चकाकले

गेल्या वर्षी, एप्रिल २०२३ पासून आजपर्यंत, सोन्याच्या मूल्यात खूपच अस्थिरता दिसून आली. त्याच्या किमती आता २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या आहेत. ऑक्टोबर २०२३ मध्ये नोंदवली गेलेली सर्वांत कमी किंमत ५६ हजार १५८ रुपये प्रति १० ग्रॅम इतकी होती. यातही वर्षभर चढ-उतार दिसून आले. फक्त तीन महिन्यांत, फेब्रुवारी ते एप्रिल २०२४ पर्यंत, सोन्याच्या किमती आश्‍चर्यकारकपणे १८.५ टक्के एवढ्या वाढल्या.

या अभूतपूर्व वाढीस अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, २०२४ च्या सुरुवातीस डॉलरची अपेक्षेपेक्षा जास्त झालेली चलनवाढ! फेडरल रिझर्व्हने चलनवाढीचा सामना करण्यासाठी डॉलर पुरवठा कमी केला आणि व्याजदर वाढले.

एप्रिल २०२४ मध्ये फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदर कपातीची अपेक्षा ठेवून, अनेक गुंतवणूकदारांनी अधिक सोने खरेदी केले. व्याजदरांबद्दलच्या तीव्र अनिश्‍चिततेमुळे पुन्हा डॉलरची मागणी आणि किंमत वाढली.

सामान्यतः जेव्हा व्याजदर जास्त असतात तेव्हा सोन्याच्या किमती कमी असणे अपेक्षित असते. फेडरल रिझर्व्हने व्याजदर जास्त ठेवल्यास, गुंतवणूकदार सोन्यापेक्षा जास्त परतावा मिळण्यासाठी रोखे खरेदी करण्यास किंवा बँकांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. तथापि, व्याजदरातील मोठ्या अनिश्‍चिततेमुळे, अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी जगभरातून अधिक सोने खरेदी केले. त्यामुळे समस्या आणखी चिघळली.

भारताच्या संदर्भात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत आणखी वाढ झाली. बहुतेक सोने भारतात आयात केले जात असल्याने, रुपयाच्या मूल्यातील घसरणीचा सोन्याच्या किमतीच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला. विनिमय दर मूलतः भारतातील सोन्याच्या किमतीतील चढ-उतार निश्‍चित करतो. जेव्हा डॉलरचे मूल्य वाढते आणि रुपया घसरतो तेव्हा सोन्याच्या किमती वाढतात.

पहिल्यांदाच, रुपयाने १९ एप्रिल २०२४ रोजी डॉलरच्या तुलनेत ८३.५२ चा ऐतिहासिक नीचांक गाठला. गेल्या दोन वर्षांत, जानेवारी २०२२ पासून डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात सातत्याने घसरण होत असल्याविषयी धोरणकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

गेल्या दोन वर्षांत रुपयाचे मूल्य जवळपास १२ टक्क्यांनी घसरले आहे. याशिवाय, डॉलरच्या वाढत्या मूल्याबरोबरच, अमेरिकेमधील महागाईदेखील सोन्याच्या किमती वाढण्यास कारणीभूत ठरली आहे. सोने हे काही अंशी चलनवाढ रोखण्याचे कार्य करते.

जेफरीजच्या क्राइस्ट वूल यांनी लोभ आणि भीती या भावनांसंबंधीच्या आपल्या अहवालात सोन्याच्या किमतींमध्ये अलीकडे झालेली तीव्र वाढ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. चिनी सेंट्रल बँक अधिक सोने खरेदी करत आहे आणि उपलब्ध यूएस डॉलरचा साठा कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे धोरण जागतिक राखीव चलन म्हणून डॉलरचे महत्त्व कमी करण्याच्या चीनच्या इराद्याशी अनुकूल आहे.

Akshaya Tritiya
Gold Rate : सोनेदर प्रतितोळा ७५ हजार रुपये

त्यामुळे सोन्याच्या मागणीस चालना मिळते. याव्यतिरिक्त, मध्य पूर्वेतील भौगोलिक-राजकीय तणाव आणि रशिया- युक्रेनमधील संघर्षामुळे अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोन्यासाठी एखादे निश्‍चित व सुरक्षित आश्रयस्थान शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे, ऐतिहासिकदृष्ट्या, युद्धे किंवा भू-राजकीय अनिश्‍चिततेच्या काळात, सोने अस्थिर झाल्याने, त्याचे मूल्य आणि मागणी वाढल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.

या सर्व घटकांसोबतच लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने भारतात सोन्याची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. इतर अनेक राष्ट्रांच्या तुलनेत कोविड-१९ महासाथीपासून भारताला जलद आर्थिक पुनर्प्राप्ती किंवा परतावा मिळाल्यामुळे ही मागणी अधिक तीव्र झाली. परिणामी, जागतिक आर्थिक परिस्थितीशी तुलना करता, भारतीय बाजारपेठेत सोन्याची मागणी लक्षणीयरीत्या वाढलेली आहे.

सोने दरवृद्धीचा शेतकऱ्यांवर कसा परिणाम होईल?

सोन्याच्या किमतीतील अलीकडची वाढ शेतकऱ्यांसाठी प्रतिकूल ठरली आहे. भारतातील सोन्याच्या मागणीत ग्रामीण मागणी महत्त्वाची भूमिका बजावते व ती प्रामुख्याने पावसाळ्यावर अवलंबून असते.

महागाईचा दबाव, अनियमित मॉन्सून आणि सरकारी खर्चात घट यामुळे शेतकरी आधीच आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत आहेत. औपचारिक शिक्षण नसलेले शेतकरी, अस्थिरता आणि अनिश्‍चिततेपासून बचाव म्हणून सोन्यात गुंतवणूक करतात.

अनेकांसाठी, पीक नुकसान, आजारपण किंवा अपघात अशा अनपेक्षित आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी सोन्याची खरेदी हा एक मार्ग ठरतो. भविष्यातील सोन्याच्या मूल्याबाबतची अनिश्‍चितता शेतकऱ्यांना चिंतेने ग्रासून टाकत आहे.

१६ एप्रिल २०२४ रोजी ७३ हजार ०२९ रुपये प्रति १० ग्रॅमचा विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, ९ मे रोजी सोन्याच्या किमती २.६५ टक्क्यांनी घसरल्या आहेत. मुख्यतः एका आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात २० पैशांनी सुधारणा झाल्यामुळे पुढे सोन्याचे भाव किरकोळ प्रमाणात कमी होण्याचा अंदाज आहे.

गोल्डमन साच्स, सिटी, एएनझेड आणि कॉमर्झ बँक यासह विविध आंतरराष्ट्रीय एजन्सीने त्यांच्या सोन्याच्या किमती तीन ते पाच टक्क्यांनी वाढवल्या आहेत. ब्लूमबर्ग इंटेलिजेंसचे स्ट्रॅटेजिस्ट माईक मॅकग्लोन यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, २०२५ पर्यंत बिटकॉइन आणि सोन्याच्या डिजिटल आवृत्तीचे मूल्य वाढेल.

या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अंदाजानुसार, आगामी महिन्यांत सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. जे शेतकरी सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांनी आणखी दोन-तीन महिने थांबणे व वाट पाहणे हिताचे आहे. कारण गुंतवणुकीसाठी आत्ताचा कालावधी सुयोग्य आणि अनुकूल नाही.

(डॉ. केदार विष्णू हे नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई येथे अर्थशास्त्राचे साहाय्यक प्राध्यापक तर डॉ. वैष्णवी शर्मा या इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च, मुंबई येथून पीएचडी प्राप्त केलेल्या अर्थशास्त्रज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com