Moong Cultivation : मूग, उडीद लागवडीचे तंत्र

Urad Cultivation : जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी मूग व उडीद पिके महत्त्वाची आहेत. त्यांच्या मुळावर रायझोबिअम जिवाणूंच्या गाठी तयार होऊन नत्राची उपलब्धता आणि साठा वाढतो.
Moong Urad Management
Moong Urad ManagementAgrowon
Published on
Updated on

Kharif Crop Management : खरीप हंगामामध्ये मूग आणि उडीद ही  महत्त्वाची कडधान्य पिके आहेत. त्यांची मुख्य किंवा आंतरपीक म्हणूनही लागवड करण्यात येते. ही दोन्ही पिके कमी कालावधीची (दोन ते अडीच महिने) आहेत. बाजारातील मागणी व दरही चांगला असल्याने कमी काळात बऱ्यापैकी आर्थिक फायदा देणारी पिके म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

जमिनीची निवड, पूर्वमशागत

या दोन्ही पिकांना मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. क्षारयुक्त, पाणथळ तसेच उतारावरील हलक्या जमिनीवर या पिकांची लागवड करू नये. या पिकांना जास्त मशागतीची आवश्यकता लागत नाही.

पूर्वीच्या पिकाची काढणी झाल्यानंतर खोल नांगरट करावी. त्यानंतर मृगाचा पहिला मोठा पाऊस पडून गेल्यावर वखरपाळी देऊन, धसकटे, काडीकचरा वेचून घ्यावा. कुळवाच्या एक दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. शेवटच्या पाळी अगोदर हेक्टरी १५ ते २० गाड्या शेणखत जमिनीत मिसळावे.

Moong Urad Management
Moong Cultivation : मूग, उडीद लागवड करताना योग्य जातींची निवड कशी करावी?

पेरणीची वेळ

वेळेवर पेरणीस अतिशय महत्त्व आहे. मॉन्सूनचा पहिला पेरणीयोग्य पाऊस पडल्यावर व जमीन वाफसा आल्याबरोबर लवकरात लवकर मूग, उडिदाची पेरणी करावी. शक्यतो जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी पूर्ण करावी.

पेरणीस उशीर झाल्यास पिकास त्याच्या कायिक वाढीस पुरेसा अवधी मिळत नाही. परिणामी, पिकाची वाढ कमी होऊन फुले, शेंगा कमी लागतात. उत्पादनामध्ये मोठी घट येते. पेरणीस जसा उशीर होईल त्याप्रमाणात उत्पादनातही घट होत जाते. ७ जुलैनंतर या पिकांची पेरणी टाळावी.

Moong Urad Management
Moong Cultivation : उडीद, मूग, तूर पिकांचे क्षेत्र होतेय कमी

बियाणे प्रमाण, पेरणीचे अंतर

अपेक्षित उत्पादन मिळण्याच्यादृष्टीने हेक्टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते. प्रति हेक्टरी रोपांची संख्या राखण्याकरिता १२ ते १५ किलो बियाणे वापरावे. दोन ओळींतील ३० सेंमी. आणि दोन रोपांमध्ये १० सेंमी अंतर ठेवून पेरणी करावी.

बीजप्रक्रिया

बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपाच्या अवस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम अधिक थायरम २ ग्रॅम एकत्र करून प्रक्रिया करावी. यानंतर रायझोबिअम व स्फुरद विरघळवणारे जिवाणू संवर्धक २५० ग्रॅम किंवा एकत्रित द्रवरूप जिवाणू संवर्धक १०० मि.लि. प्रति १० किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी. बियाणे सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे मुळांवरील गाठीचे प्रमाण वाढते. पिकास हवेतील नत्र उपलब्ध होतो.

खत व्यवस्थापन

या पिकांच्या मुळाद्वारे नत्र स्थिरीकरण चांगले व्हावे आणि मुळाची वाढ योग्य होण्याकरिता सेंद्रिय खतांचा वापर करावा. जमिनीची मशागतीवेळी शेवटच्या वखरणीआधी चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत ५ टन प्रती हेक्टरी द्यावे.

पेरणीच्या वेळी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद हेक्टरी मात्रा द्यावी. यासाठी एकरी २५ किलो युरिया आणि १२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट वापरावे किंवा डायअमोनिअम फॉस्फेट (डीएपी) ५० किलो प्रती एकरी द्यावे.

पालाशची कमतरता असल्यास २० किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति एकरी द्यावे. तसेच गंधकाची कमतरता असल्यास प्रति हेक्टरी २० ते २५ किलो गंधकाचा वापर करावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता लक्षात घेऊन झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट एकरी पाच किलो वापरावे. ही सर्व खते पेरणी सोबत जमिनीत मिसळून द्यावीत.

आंतरमशागत

उभ्या पिकामध्ये वेळीच आंतरमशागत करणे गरजेचे आहे. पीक पेरणीपासून पहिले ३० ते ४५ दिवस तणविरहित ठेवावे. त्यासाठी पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी एक आणि ३० ते ३५ दिवसांनी दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते. ओलावा टिकण्यास मदत होते. गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या कराव्यात.

आंतरपीक पद्धती

तूर, ज्वारी, कपाशी सारख्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून मूग,उडीद या पिकांना विषेश महत्त्व आहे. कापूस + मूग (१:२), कापूस + उडीद (१:२), तूर + मूग (१:२ किंवा २:४), तूर + उडीद (१:२ किंवा २:४), मूग + ज्वारी (२:१) उडीद + ज्वारी (२:१) इ. आंतरपीक पद्धतीचा अवलंब करता येतो.

पाणी व्यवस्थापन

ही पिके प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर येणारी आहेत. मात्र फुले येताना आणि शेंगा भरताना ओलाव्याची कमतरता भासू लागते. या स्थितीमध्ये जमिनीत ओलावा कमी झाल्यास हलके पाणी द्यावे. अगदीच पाण्याची कमतरता असले तरी २ टक्के युरियाची (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी.

उत्पादकता कमी असल्याची कारणे

 खरीप हंगामात अनियमित पडणारा पाऊस.

 अयोग्य जमिनीची निवड.

 जैविक बीजप्रक्रियेचा अवलंब न करणे.

 सुधारित बियाण्यांचा अभाव.

 खतमात्रा अपुऱ्या देणे किंवा टाळणे.

 हेक्टरी झाडांची योग्य संख्या न राखणे.

- डॉ. हनुमान गरुड (कार्यक्रम समन्वयक), ७५८८६७७५८३

- प्रा. अरुण गुट्टे (विस्तार कृषी विद्यावेत्ता), (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, खामगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com