Village Development : ऐतिहासिक ठराव, विधायक उपक्रमांसाठी प्रसिद्ध मसूर

Masoor Village : ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेल्या मसूर (जि. सातारा) गावाची कीर्ती अजून उत्तुंग व्हावी यासाठी संपूर्ण गाव प्रयत्नशील आहे.
Village Development
Village Development Agrowon

हेमंत पवार

Rural Development : ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेल्या मसूर (जि. सातारा) गावाची कीर्ती अजून उत्तुंग व्हावी यासाठी संपूर्ण गाव प्रयत्नशील आहे. गावाने एकजुटीतून विकासकामे घडविलीच. शिवाय वृद्ध आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना दाखला न देणे, वडिलांआधी आईचे नाव लावणे आदी ऐतिहासिक ठराव व वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांमधून राज्यात आपल्या कामांचा वेगळा ठसा उमटवला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी, गगनगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव म्हणून मसूरची (ता. कऱ्हाड, जि. सातारा) ख्याती आहे. कऱ्हाड तालुक्यातील तेलबिया, गूळ, हळद, शेंगा, घेवडा यांची नावाजलेली बाजारपेठ म्हणूनही मसूरचे नाव होते.

गावाच्या पूर्वेला पाटील बुवाची टेकडी, पश्‍चिमेला रेल्वे स्टेशन, उत्तरेला थोरबाचा डोंगर आणि दक्षिणेला सह्याद्री सहकारी कारखाना आहे. समर्थ रामदास यांनी रामनवमी उत्सव मसूर येथूनच साजरा केला. त्यांनीच स्थापित केलेल्या अकरा मारुतींपैकी दुसरा मारुती मसूरमधील आहे.

अफजलखानाचा वध केल्यानंतर पन्हाळा काबीज करण्यास जाताना मसूरच्या भुईकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा दोन दिवस मुक्काम होता अशी इतिहासात नोंद आढळते. गावातील पाटील वाड्यात गणेश उत्सव अखंडपणे साजरा करण्यासंबंधी उल्लेख येथील शिलालेखांवर पाहावयास मिळतो. या काळात महादजी जगदाळे यांनी गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली. आजही जगदाळे घराणं अखंडपणे हा उत्सव साजरा करते.

वारसा जपण्याचा प्रयत्न

धार्मिक व इतिहासाचा वारसा लाभलेल्या या गावाचं नाव अजून वृद्धिंगत
व्हावं यासाठी गाव प्रयत्नशील आहे. यात ग्रामस्थांसह सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, ग्रामपंचायतीचे सदस्य यांचाही वाटा आहे. खा. श्रीनिवास पाटील, माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली. ग्रामपंचायतीची इमारत, पाणी योजना, सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाना, अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मार्ट अंगणवाडी, शाळा, अद्ययावत स्मशानभूमी ही त्याची साक्ष देतात.

Village Development
Village Development : गावाचा मानवी विकास निर्देशांक अन् आनंदाचा निर्देशांक

मसूर गाव- वैशिष्ट्यपूर्ण कामे

-ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी सर्व व्यवहार संगणकीकृत.
-ग्रामस्थांना ग्रामपंचायती संदर्भातील माहिती मोबाइलवर एसएमएसद्वारे देण्याची कार्यवाही.
-सर्व ११ अंगणवाड्या आणि शाळा डिजिटल. चोवीस तास विजेसाठी सौरऊर्जा संच, बॅटरी, इन्व्हर्टर, पाणी शुद्धीकरण यंत्रणा, ‘स्मार्ट एलईडी टीव्ही’, संगणक, स्मार्ट कॅमेरा व थ्रीडी लर्निंग कीट देण्यात आले आहे.

-जिल्हा परिषद शाळेतील सर्व वर्गांना ‘स्मार्ट एलईडी टीव्ही प्रोजेक्टर’ व शैक्षणिक संगणकीय प्रणाली देण्यात आली आहे.
- गावातील घंटागाडीमार्फत ओला आणि सुका कचरा स्वतंत्ररीत्या गोळा केला जातो. त्यानुसार
अडीच हजार कुटुंबांना स्वतंत्र कचराकुंड्यांचे वाटप.
-गावात सर्व समाजांसाठीच्या स्मशानभूमी. त्यांचे सुशोभीकरण, परिसर हिरवागार करून पक्ष्यांना तेथे आश्रय मिळावा यासाठी सुमारे २५०० वृक्षांचे रोपण व संवर्धन.
-गावाच्या सुरक्षिततेसाठी ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा.

Village Development
कृतिशील, विधायक गावाची ओळख- आव्हाणे बुद्रुक

-ग्रामपंचायतीच्या वतीने पोस्ट कार्यालयात २५० रुपये भरून सुकन्या समृद्धी योजनेची खाती काढण्यात येतात. मुलींना बचतीची सवय लागावी व त्याचा श्रीगणेशा व्हावा हा त्यामागील हेतू. आतापर्यंत सुमारे २५० मुलींची खाती काढण्यात आली आहेत.

-गावात अनेक व्यक्ती अशा असतात की त्यांचे हातावर पोट असते. अशांच्या घरातील व्यक्तीचे
निधन झाल्यास अंत्यविधीचा खर्च करणेही मुश्कील असते. अशा कुटुंबांसाठी अंत्यविधीसाठी ग्रामपंचायतीमार्फत एक हजार रुपयांची अनुदानपर मदत करण्यात येते.
-निर्मल ग्राम, तंटामुक्त गाव, आदर्श गाव तसेच आदर्श सरपंच आदी विविध पुरस्कारांनी गावाचा सन्मान.

शेतीचा विकास

गावच्या शेतीला आरफळ कॅनॉल, विहिरी, ओढे असा सिंचन स्रोत आहे. मात्र उन्हाळ्यात काही प्रमाणात पाणी टंचाई भासते. त्यामुळे पावसाचे पाणी साठवण्यासाठी सिमेंटचे दोन बंधारे बांधले आहेत. त्याचा उपयोग गावातील विहिरींची पाणीपातळी वाढविण्यास होत आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखाना नजीक असून, ऊस हे गावचे मुख्य पीक आहे. अलीकडे भाजीपाला व आले लागवडीकडे

येथील शेतकरी वळले आहेत. अलीकडे मजुरांची मोठी टंचाई जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी शेतकरी छोटी अवजारे तसेच ट्रॅक्टरचलित यंत्रांचा वापर करू लागला आहे. सध्या अनेक ठिकाणी कचऱ्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हा विचार करून ग्रामपंचायतीच्या वतीने ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खताची निर्मिती सुरू केली. विक्रीही केली. कालांतराने त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर प्रकल्पातील खताचा वापर करून गावात उद्यान फुलविण्यात आले आहे.

महिलांना बाळंत विडा किट

आर्थिकदृष्ट्या कमजोर कुटुंबातील महिलांना प्रसूतीनंतर शरीर सुदृढ ठेवण्यासह बालकांचे चांगले पोषण करण्यासाठी आवश्‍यक पौष्टिक पदार्थ घेणे परवडत नाही. याचा विचार करून गावातील महिलांना ग्रामपंचायतीच्या खर्चातून बाळंतविडा कीट देण्यात येते. यात तीन महिने पुरेल एवढे पदार्थ असतात. त्यात मेथी, गहू, काजू, बदाम, गाईचे तूप, गूळ डिंक, खारीक, खोबरे आदींचा समावेश
असतो.

पालकांना न सांभाळणाऱ्यांना दाखला नाही

मोठे झालो, नोकरी, व्यवसायाला लागलो की आपण आणि आपले कुटुंब यातच अनेकजण गुरफटून जातात. भोवतालच्या जगाशी काहीही देणं घेणं नाही अशी स्थिती तयार होते. त्यामुळे लोकांतील माणुसकी कमी होत चालल्याचं वातावरण पाहायला मिळतं. अनेकदा मुलं आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांनाही सांभाळत नाहीत अशी परिस्थिती तयार झाली आहे.

या पार्श्‍वभूमीवर मसूर ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक ठराव केला आहे. यात आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना कोणताही शासकीय लाभ किंवा दाखले न देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. महिलांना सन्मान व सुरक्षा प्रदान करण्यासाठी यापुढे प्रत्येकाने मुलीचे वा मुलाचे नाव, आईचे, त्यानंतर वडिलांचे नाव व आडनाव असा क्रम ठेवावा अशा धोरणात्मक निर्णयाचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरांतून मोठे कौतुक होत आहे.


संपर्क ः पंकज दीक्षित, ९९२२९०२५१९ (सरपंच)
विजयसिंह जगदाळे, ८२७५२७४४९९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com