घोरवड ग्रामपंचायतीने करभरणा प्रोत्साहन लाभ योजनेतून उभारला स्वनिधी
नाशिक : मार्चअखेर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाला. त्यामुळे ग्रामपंचायतीची करवसुली बंद झाली. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील घोरवड ग्रामपंचायतीने लॉकडाऊनमध्ये कर भरणा प्रोत्साहन लाभ योजना राबविली. ही शक्कल लढवून गावाने तीन लाखांवर करवसुली तर केली. यासह कर भरणाऱ्यास आकर्षक भेटही दिली. त्यामुळे ही योजना चर्चेचा विषय ठरली आहे.
ग्रामपंचायतीने घरपट्टी व पाणीपट्टी कर भरण्यासाठी ३० जून रोजी बैठक घेतली. १५ जुलैपर्यंत कर भरण्याची मुदत दिली. ज्यामध्ये संपूर्ण घरपट्टी एक रकमी भरणा केल्यास ५ टक्के सुट व केशर आंब्याचे रोप, तर मार्चअखेरपर्यंतची पाणीपट्टी एकरकमी १०० टक्के भरल्यास वॉटर एटीएमचे ५०० रुपये रिचार्जमोफत किंवा २० लिटरचा पाण्याचा जार देण्याचे जाहीर केले. ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला, अशी माहिती सरपंच रमेश हगवणे यांनी दिली.
गावात एकूण १३४ नळजोडण्या आहेत. यापैकी २४ जणांनी थकबाकीसह पूर्ण रक्कम भरली. मागील वर्षी गावाने वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला. परंतु, यावर्षी शासनाने कोरोनामुळे वृक्ष लागवडीचे कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नाही. हे लक्षात घेऊन ग्रामपंचायतकडून वृक्ष लागवड व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने १०० टक्के कर भरणा करणाऱ्या ग्रामस्थांना केशर आंब्याचे झाड व २० लिटर पाण्याचा जार देऊन सन्मानित करण्याचे नियोजन करण्यात आले. ग्रामपंचायतीने करवसुलीसाठी आगळी-वेगळी शक्कल लढवली आहे. यामध्ये ग्रामस्थांनी सहभाग नोंदवल्याने घरपट्टी व पाणीपट्टीद्वारे अवघ्या १५ दिवसांत सुमारे साडेतीन लाख रुपये जमा झाले.
या आर्थिक वर्षासाठी घरपट्टी ९,१९,४०७ रुपये होती. त्यापैकी ३५ टक्के म्हणजेच २,८८,६५० रुपये वसूल झाले. तर, पाणीपट्टी मधून २,१०,००० पैकी ३० टक्के म्हणजे ६०,५९० रुपये वसूल झाले. लोकांचा प्रतिसाद व मागणी पाहता योजनेला ४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
घरपट्टी भरून आंब्याचे झाड
घरपट्टी (रुपये) | आंब्याचे झाड |
० ते ५०० | १ |
५०१ ते १५०० | २ |
१५०१ ते ३००० | ३ |
३००१ ते ५००० | ४ |
५००१ च्या पुढे | ५ |
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.