Dairy Business : विदर्भात दुग्ध व्यवसायाला तयार केली बाजारपेठ

Dairy Farming : सुमारे चौदा वर्षांपूर्वी विदर्भातील रिसोड तालुक्यात (जि. वाशीम) दुधाला बाजारपेठच नव्हती. ही संघी व दूध उत्पादकांची गरज ओळखून येथील मनोज जाधव यांनी दूध संकलन व प्रक्रिया उद्योगात पाऊल ठेवले. दूध उत्पादकांसाठीही हक्काचीबाजारपेठ तयार झाली आहे.
Dairy Business
Dairy Business Agrowon

गोपाल हागे

Success Story of Dairy Business : विदर्भातील वाशीम जिल्हा विकासाच्या दृष्टीने मागास ओळखला जातो. रिसोड हे तालुक्याचे मुख्यालयही फारसे विकसित नाही. शेती आधारित अर्थव्यवस्था आहे. अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून एक-दोन दुधाळ जनावरे पाळतात. याच तालुका ठिकाणी वास्तव्य असलेले शेतकरी विलासराव जाधव यांनी अकोल्याहून भाजीपाला आणून त्याची ठोक पद्धतीने विक्री करण्याचा व्यवसाय सुमारे नऊ वर्षे केला.

मोठा मुलगा मनोज यांनी बारावी शिक्षण घेतल्यानंतर २००७ मध्ये गिरिराज कोंबडीपालन सुरू केले. मात्र आपल्या भागात दूध उत्पादकांसाठी कोणतीही बाजारपेठ नाही. अनेक वेळा हॉटेलला दूध पुरवठा केल्यानंतर शिल्लक दूध त्यांना घरी न्यावे लागते. दूध नासून जाण्याची वेळ येते या बाबी त्यांनी अभ्यासल्या. त्यातून दुग्ध व्यवसायाला मोठी संधी असल्याचे लक्षात आले.

दुग्ध व्यवसायात वाटचाल

मनोज यांनी मग २०१० मध्ये दूध संकलनापासून व्यवसायात वाटचाल सुरू केली. सुरुवातीला असंख्य अडचणींचा सामना केला. दूध संकलनाचा कसलाच अनुभव नसल्याने वाहतुकीसह अनेक प्रतिकूल गोष्टींना तोंड द्यावे लागले. नुकसानही झाले. एकेक अनुभव घेत, शेतकऱ्यांची विश्‍वासार्हता मिळवत ते चिकाटीने पुढे जात राहिले.

दर्जा कायम ठेवला. व्यवहार पारदर्शक ठेवले. रिसोड भागात सहकारी डेअऱ्या नसल्याने तसेच शासकीय संकलन केंद्रही बंद असल्याने समस्या वाढत गेल्या. मग अकोला येथेही स्वीटमार्टधारकाला दूध पुरवणे सुरू केले. अर्थात, सर्व संकटांशी सामना करून चौदा वर्षांच्या काळात मनोज यांनी सृष्टी डेअरी नावाने ब्रॅण्ड रिसोड भागात नावारूपाला आणला आहे.

Dairy Business
Dairy Business : चाळीस वर्षांची दुग्धप्रक्रियेची यशस्वी परंपरा

असा आहे सृष्टी डेअरीचा व्यवसाय

-रिसोड परिसरातील १५ गावांतील दुग्धोत्पादक करतात दूधपुरवठा.
-रोजचे संकलन १५०० लिटरपर्यंत. हंगामात १७०० लिटरपर्यंत.
-शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी डेअरीतर्फे वाकद, चिंचाबाभर, माळशी (मराठवाडा) या ठिकाणी संकलनाची सुविधा. दररोज वाहनाद्वारे दूध या ठिकाणी आणले जाते.
-दूध संकलन, फॅट, चुकारे आदी इत्थंभूत माहितीच्या नोंदीसाठी मोबाइल ॲपची सुविधा.
-दर १० व्या दिवशी शेतकऱ्यांना फॅटनुसार होते दुधाचे पेमेंट.
-संकलित दूध ठेवण्यासाठी तीन हजार लिटर क्षमतेचा बल्क मिल्क कूलर. स्टीम बॉयलर, प्रत्येकी ४०० लिटर क्षमतेचे चार शीतकरण संच अशी सामग्री आहे. वाहतुकीसाठी तीन वाहने.
-पदार्थ निर्मितीत दैनंदिन स्वच्छता व साफसफाइवर विशेष लक्ष. ग्राहकांना दर्जेदार पदार्थ कसे देता येतील या उद्देशाने व्यवस्थापन.
-दूध व पदार्थ विक्रीत नऊ जणांना तर प्रक्रिया विभागात आठ जणांना मिळाला रोजगार.

उत्पादने व विक्री व्यवस्था

एकूण दूध संकलनापैकी दररोज साडेचारशे लिटरपर्यंत दुधावर प्रक्रिया होते. दिवसाला ३० ते ४० किलो पनीर, दही १२० किलो, खवा २० किलो, पेढा १५ किलो, तूप १५ ते २० किलो अशा प्रमाणात उत्पादन व विक्री केली जाते. सणसमारंभानुसार गरजेनुसार श्रीखंड, बासुंदी आदींचेही उत्पादन होते.

मनोज यांनी रिसोड शहरात चार ‘आउटलेट्‌स’ तयार केले आहेत. वाशीम, गोरेगाव तसेच मराठवाड्यात जिंतूर, झरीबोरी आदी ठिकाणी ‘फ्रॅंजायसी’ दिल्या आहेत. पूर्वी महिन्याला तीन लाखांपर्यंत होत असलेली उलाढाल आता १८ लाखांच्या दरम्यान पोहोचली आहे. मनोज यांना पत्नी स्वाती, बंधू अमर, भावजय कोमल यांचे सहकार्य व्यवसायात मिळते. तर आई ललिताबाई यांचे मार्गदर्शन मिळते.

Dairy Business
Dairy Business : कुटुंबाच्या एकीतून घातली दुग्ध व्यवसायाला गवसणी

रिसोड भागात वाढले दूध ‘क्लस्टर’

मनोज म्हणाले, की आमच्या डेअरीमुळे भागातील दुग्ध व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे.
परिसरात ५० डेअऱ्या तयार झाल्या आहेत. एकमेकां करू साह्य या उक्तीनुसार वाढत असलेल्या व्यवसायाने तालुकापातळीवर रोजगार निर्मितीला चालना दिली. तालुक्यातील सुमारे शेकडो शेतकऱ्यांना दूध बाजारपेठ मिळाली आहे. त्याचबरोबर दुग्ध उत्पादकांची संख्या वाढली आहे. पशुखाद्य व्यवसायाला चालना मिळाली आहे.

विश्‍वासार्हता तयार केली

एकेकाळी आम्ही जेव्हा दूध संकलनाला खेड्यांमध्ये जायचो त्या वेळी
अनेक शेतकरी आमच्यावर विश्‍वास ठेवत नसत. तुमची संस्था बंद पडली तर? आमचे पेमेंट थकविले तर? असे अनेक प्रश्‍न ते विचारत. परंतु आम्ही कामातून विश्‍वासार्हता तयार केली. त्याचेच फळ म्हणून आम्हाला डेअरीचा विस्तार करणे शक्य झाल्याचे मनोज यांनी सांगितले.

शेतकरी कंपनीची स्थापना

दुग्ध व्यवसायात स्थैर्य कमाविल्यावर मनोज जाधव यांनी कामाला व्यापक स्वरूप देण्याच्या उद्देशाने योगायोग शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना २०१७ मध्ये केली. या कंपनीत डेअरीला दूध पुरवठा करणारे तीनशे सभासद त्यात सहभागी आहेत. दूध उत्पादकांचीच ही कंपनी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विस्तारासाठी शेड उभारणी व ‘मशिनरी’ आणली आहे. कंपनीच्या माध्यमातून पदार्थाचे ‘ब्रॅण्डिग’ करण्याचा मनोदय मनोज यांनी बोलून दाखवला. कृषी विभागाच्या विविध योजनांचेही सहकार्य घेण्यात येत आहे.

मनोज जाधव, ९९२३७०३४९५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com