
Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यातील २१ लाख ४२३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १५ लाख ४३ हजार ३७२ हेक्टर, अर्थात ७२ टक्के क्षेत्रावर जूनअखेर पेरणी झाली आहे. ही पेरणी करताना शेतकऱ्यांनी ६ लाख ५८ हजार १३९ हेक्टरवर कपाशी लागवड तर ४ लाख ३२ हजार ६९२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली आहे. अजून दोन्ही पिकांची अपेक्षित लागवड व पेरणी झाली नसल्याची स्थिती आहे.
कपाशीला पर्याय म्हणून शेतकरी सोयाबीनकडे वळले. मात्र सोयाबीनचे दरही परवडेना म्हणून शेतकऱ्यांनी तर सातत्याने टिकून असलेल्या मका पिकाला यंदा पसंती दिल्याची स्थिती आहे. यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ६ लाख ८१ हजार ९०३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र होते. त्या तुलनेत प्रत्यक्षात ५ लाख ३३ हजार ७८० हेक्टर, अर्थात ७८.२८ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली.
जालना जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ६ लाख ५१ हजार १७३ हेक्टर असताना प्रत्यक्षात चार लाख ५४ हजार ४२ हेक्टर अर्थात ६९.७३ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली. बीड जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र ८ लाख ८ हजार ९४५ हेक्टर असताना प्रत्यक्ष ५ लाख ५५ हजार ५५० हेक्टर, अर्थात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६८.६८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. तीनही जिल्ह्यांत कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र दहा लाख ३४ हजार ७४८ हेक्टर असताना प्रत्यक्षात ६३ टक्के म्हणजे ६ लाख ५८ हजार १३९ हेक्टर क्षेत्रावरच कपाशीची लागवड झाली.
लागवड झालेल्या कपाशीच्या क्षेत्रामध्ये जालना जिल्ह्यातील २ लाख १९ हजार ५५० हेक्टर क्षेत्र सह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख ४१ हजार ७४६ हेक्टर तर बीड जिल्ह्यातील एक लाख ९६ हजार ८४३ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. कापूस उत्पादक जिल्हे म्हणून ओळख असलेल्या या तिन्ही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६० ते ६८ टक्के दरम्यानच कपाशीची लागवड झाली आहे. दुसरीकडे या तिन्ही जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख १२ हजार २८ हेक्टर असताना प्रत्यक्षात ४ लाख ३२ हजार ६९२ हेक्टर म्हणजे सर्व साधारण क्षेत्राच्या तुलनेत ८४ टक्के क्षेत्रावरच सोयाबीनची पेरणी झाली आहे.
तीन पैकी बीड व जालना हे दोन जिल्हे प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. पेरणी झालेल्या क्षेत्रात जालना जिल्ह्यात सर्वसाधारण १ लाख ८१ हजार ५७५ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ५३ हजार ६५४ हेक्टर, बीड जिल्ह्यात सर्वसाधारण ३ लाख २६५२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ५७ हजार ५१६ हेक्टर, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वसाधारण २७ हजार ८१७ च्या तुलनेत २१ हजार ५२२ हेक्टर क्षेत्रावरच सोयाबीनची पेरणी झाली आहे.
मकाची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत पुढे जाऊन पेरणी
जालना व छत्रपती संभाजीनगर हे दोन जिल्हे प्रामुख्याने मका उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. यंदा खरिपासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १ लाख ८५ हजार ६८२ हेक्टर, जालनामध्ये ४३ हजार ८८० हेक्टर, तर बीडमध्ये १० हजार ६३३ हेक्टर मिळून २ लाख ४० हजार १९६ हेक्टर खरीप मकाचे सर्वसाधारण क्षेत्र होते.
त्या तुलनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २ लाख २० हजार ५७४ हेक्टर,जालनामधील २६ हजार ५४६ हेक्टर तर बीडमध्ये ५ हजार ९०५ हेक्टर अशी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ५३ हजार २५ हेक्टर क्षेत्रावर खरीप मकाची लागवड झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १०५ टक्के आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.