Maratha Reservation Protest : बेरोजगारीमुळे मराठा तरुणांच्या असंतोषाचा भडका

Maratha Andolan : ग्रामीण भागातील मराठा जातीतील तरूणांची अवस्था बिकट आहे. यातील बहुतांश तरुण शेती करतात. परंतु शेतीची अवस्था दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे.
Maratha Reservation Protest
Maratha Reservation ProtestAgrowon
Published on
Updated on

Maratha Reservation News : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. लाठीहल्ला होताच शांतेत चालणाऱ्या आंदोलनाचं लोण राज्यभर पोहचलं. राज्यभरात ठिकठिकाणी रस्तारोको, बंद, आंदोलन आणि मोर्चे करण्यात आले. महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आली. या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग आहे तो तरूणांचा. ग्रामीण भागातील मराठा जातीतील तरूणांची अवस्था बिकट आहे.

यातील बहुतांश तरुण शेती करतात. परंतु शेतीची अवस्था दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. नैसर्गिक संकट कमी की काय म्हणून सरकारी पातळीवरूनही शेतीमालाचे भाव पाडण्याची संधी सोडली जात नाही. त्यामुळे ग्रामीण तरूणांचे आर्थिक प्रश्नही उपस्थित झालेली आहेत. 

शिक्षणाचा अभाव, नोकरीची चिंता, सामाजिक प्रतिष्ठेचा मुद्दा, लग्नाचा प्रश्न, शेतीचं तुकडीकरण आणि राजकीय नेत्यांच्या थापा यामुळे शेतकरी कुटुंबातील तरुण अस्वस्थ आहेत. या अस्वस्थेच्या मुळाशी शेतीप्रधान ग्रामीण अर्थव्यवस्थेचा खचत चाललेला पाया आहे. त्यामुळे या कोलाहलातून बाहेर पडण्यासाठी आरक्षणाचा या तरूणांना शेवटचा आणि महत्वाचा पर्याय वाटतो. त्यामुळे आंदोलनामध्ये तरूणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसतो.

Maratha Reservation Protest
Maratha Reservation : जालन्यात राज ठाकरेंनी घेतली मनोज जरांगेची भेट ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही टीका

ग्रामीण भागातील शिकलेली तरुण पोरं शेतात काम करायला उत्सुक नाहीत. शिकलेल्या पोरांना नोकरी हवीय. पण नोकरीच्या संधीच मिळत नाहीत. जे तरुण शेती करतात त्यांना मजूर टंचाईचा समाना करावा लागतो. त्यामुळं त्यांना शेतीतलं तंत्रज्ञान हवं आहे. परंतु अजूनही शेती तंत्रज्ञानाची बाजू लंगडी आहे. त्यामुळे अंग मेहनतीपेक्षा या तरूणांना नोकरी महत्वाची वाटते. त्यामुळे या तरूणांनी बीए. बीकॉम. बीएस्सी. यासारख्या पदवीचं शिक्षण घेतलं आहे.

परंतु या पदवीच्या शिक्षणावर कोणतीही नोकरी मिळणं कठीण होऊन बसलेलं आहे. कारण या पदवीच्या शिक्षणात कौशल्य आधारित शिक्षणाचा पत्ताच नाही. आपलं राहतं गाव सोडून बाहेर गावी शिक्षणाला जावं तर तेही आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे जगात ज्या गोष्टींना मागणी आहे, अशा कौशल्याचा अभाव या तरूणांमध्ये पाहायला मिळतो. मग त्यामुळे शेवटी बेरोजगार म्हणून फिरण्याशिवाय तरूणांकडे पर्यायच उरत नाही.

नोकरी हवी तर सरकारी हवी, अशीही धारणा तरूणांमध्ये दिसते. किरकोळ स्वरूपाची कामं करण्यात प्रतिष्ठा नाही, असाही समज आहे. त्याला जातीय अस्मितेची जोड असल्यामुळे जिथं रोजगार मिळू शकतो, अशा तांत्रिक स्वरूपाच्या कामांना प्रतिष्ठा नसल्याचं समजलं जातं. त्यामुळे सरकारी नोकरीचा अट्टहासही बळवतो आहे. व्यवसाय करण्यासाठी भांडवल नाही, नोकरी करण्यासाठी संधी नाही आणि शेती करण्याची तयारी नाही, अशी तरूणांची मानसिक गोची झालेली आहे. 

ग्रामीण भागातील तरूणांसाठी लग्न जुळणं मोठी समस्या होऊन बसली आहे. लग्नाळू मुला-मुलींच्या वाढत्या अपेक्षा आणि वास्तवाचं हरवलेलं भान यातून आई-वडिलांशी तणवाचे संबंध निर्माण झाले आहेत. शिकूनही बेरोजगार झालेली तरुण तर शिक्षणव्यवस्थेला दोषी ठरवत आहेत. आणि अर्धवट शिक्षण सोडून राजकीय पुढाऱ्यांच्या मागे लागली आहेत.

मग राजकीय नेत्यांच्या मागे फिरणं, नेत्यांच्या सभा, मोर्चे आणि बैठकात सहभागी होणं, आणि पदरात काही तरी पडेल या आशेवर तरुण सगळं वाऱ्यावर सोडून नेत्यांसोबत फिरत असतात. या सगळ्यात वेळ निघून जातो. राजकीय नेत्यांकडून पदरी निराशाच पडते. मग जमेल तसं रोजीरोटीसाठी धडपडत राहण्याचा या तरूणांचा प्रयत्न असतो. 

सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक स्तरावर आलेलं अपयश तरूणांना पेलता येत नाही. त्यातून आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलून जीवन संपवलं जातं. शेतीतली वाढत जाणारी जोखीम, रोजगाराची अशाश्वती आणि राजकीय नेत्यांच्या दूरदृष्टीचा अभाव यातून ग्रामीण व्यवस्थेला वाळवी लागली आहे. त्यातूनच अस्मितेच्या मुद्द्याला उचलून धरलं जात आहे. या सगळ्यात ग्रामीण भागातील तरूणांच्या स्वप्नांचा बळी मात्र दिला जातो आहे.        

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com