
Ahilyanagar News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, अंदोलकावरील गुन्हे मागे घेतल्याशिवाय आता माघार नाही, असा निर्धार आम्ही केला आहे. २९ ऑगस्टला मुंबईत जाऊन अंदोलन करायचे, असे राज्यातील मराठा समाजाने ठरवले आहे.
मुंबई, हैदराबाद गॅझेट लागू झालेच पाहिजे, अशा मागणी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी केली. बीडमधील महादेव मुंडे यांच्या हत्येतील आरोपीला अटक करून शिक्षा होईपर्यत आमचा संघर्ष सुरूच राहणार, असेही ते म्हणाले.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी २९ ऑगस्टला मुंबईत जाऊन उपोषण करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथे रविवारी (ता. १०) बैठक घेऊन कार्यकर्त्यांशी श्री. जरांगे पाटील यांनी संवाद साधला.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘मराठा समाज कुणबी आहे हे वारंवार सिद्ध झाले आहे. सातारा, मुंबई आणि हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा समाजाचा कुणबी म्हणून उल्लेख आहे. त्यामुळे कुणबी म्हणून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांना प्रमाणपत्रे मिळावीत, अंदोलनाच्या काळात गुन्हे दाखल झाले होते, ते गुन्हे परत घेण्याचे सरकारने आश्वासन दिले होते. त्याला आता दोन वर्षे झाली.
मात्र अजूनही हे गुन्हे मागे घेतले नाहीत. त्यामुळे मुंबईत जाऊन उपोषण करण्याचा इशारा आम्ही दिली होता. या वेळी नाही तर कधीच नाही, अशी मराठा समाजाची धारणा झाली आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाज एकवटून मुंबईत येणार आहे. गणेश उत्सवाचा काळ असला तरी आम्ही गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन सरकारला बुद्धी दे आणि आरक्षणाचा प्रश्न सुटावा, यासाठी साकडे घालत आहोत.
ते म्हणाले, की सरकारने मराठा समाजाला डिवचण्याचा प्रयत्न करू नये. आरक्षण मराठा समाजाचे हक्काचे असताना ते का सरकार देत नाही? मराठवाडा, विदर्भ, कोल्हापूर, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज एकवटला असून हा लढा अधिक तीव्र होईल.
बीडमधील महादेव मुंडे यांच्या हत्येतील आरोपींना अटक करून शिक्षा होईपर्यत लढा सुरूच राहील. आरोपी कोणाचेही आणि कितीही मोठे असले तरी त्यांना वाचवायचे काम कोणी करू नये. मुंडे यांचे कुटुंब उघड्यावर पडलेले असताना आरोपीला पाठबळ देणे चुकीचे आहे.
तपास सुरू आहे. एसआयटीचे प्रमुख अधिकारी चांगले आहेत. काय होतेय हे पाहणे गरजेचे आहे. नाही झाले तर बीडसह राज्यात बंद करण्याची आमची भूमिका आहेच. मात्र एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत कठोर कारवाई करून मुंडे कुटुंबाला न्याय देतील, अशी आशा आहे, असे श्री जरांगे पाटील म्हणाले.
प्रमाणपत्रे पडताळणी तातडीने व्हावी
श्री. जरांगे पाटील म्हणाले, की शिंदे समितीने चांगले काम केले, मराठा कुटुंबातील ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्रे मिळाली. मात्र आता बीड, नगरसह काही भागांत जात पडताळणी करण्याला अडथळे आणले जात आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या पडताळण्या झालेल्या नाहीत. जाणीवपूर्वक त्रुटी काढल्या जात आहेत. अशी अडवणूक पडताळणी समित्यांनी करू नये. दाखल प्रस्तावांच्या पडताळण्या कराव्यात. अन्यथा त्यासाठी अधिक तीव्र अदोलन करावे लागेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.