
Agriculture Success Story : शासनाच्या ग्रामीण विकासाच्या विविध योजनांमध्ये मान्याचीवाडीचा सहभाग नेहमीच उल्लेखनीय असतो. २००१ मध्ये स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळालेल्या मान्याचीवाडीला शाश्वत विकासाची दिशा देण्याचे काम गावचे दिवंगत सरपंच तात्यासाहेब माने यांनी केले. त्यांच्या पश्चात विद्यमान सरपंच रवींद्र माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्राम विकासाची परंपरा पुढे चालवली आहे.
साधारणपणे ४५० लोकसंख्येसह, पंचायतीमध्ये ९८ घरांचा समावेश आहे. सात निर्वाचित प्रतिनिधी असून यामध्ये तीन पुरुष आणि चार महिला गावाचे नेतृत्व करतात. लोकशाही मार्गाने विकासासाठी बिनविरोध निवडणुकांचा ‘पॅटर्न’ गावाच्या प्रगतीमध्ये यशस्वी ठरला. २००१ पासून आतापर्यंतच्या पाचही पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. ग्रामसभेतून लोकशाही मार्गाने पदाधिकारी निवड बिनविरोध होते.
प्रत्येक निर्णय ग्रामसभेतून घेतला जात असल्याने पारदर्शकता जोपासली जाते, त्याचे आचरणही प्रत्येक ग्रामस्थ करतो. म्हणूनच आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत ग्रामविकासासाठी दिशादर्शक म्हणून मान्याचीवाडीचा उल्लेख केला जातो. सत्तेचे विकेंद्रीकरण ही गावाच्या ऐक्यासाठी महत्त्वपूर्ण बाब असल्याने येथे ‘एक व्यक्ती एक पद’ हा अलिखित नियमच आहे. गावातील ग्रामपंचायत, दूध उत्पादक संस्था, विकास सेवा सोसायटी, तंटामुक्त गाव समिती, शाळा व्यवस्थापन समिती अशा स्थानिक संस्थांवर काम करण्याची संधी घराघरांत उपलब्ध झाली आहे.
ग्राम ऊर्जेत देशात अव्वल...
राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश या पंचतत्त्वांवर आधारित राबविलेल्या माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत मान्याचीवाडीने सतत तीन वर्षे यश संपादन केले. या माध्यमातून मिळालेल्या बक्षीस रकमेचा योग्य विनियोग करुन महाराष्ट्रातील पहिले सौर ग्राम ठरले.
७८ पुरस्कारांनी सन्मान
मान्याचीवाडीने ग्रामपंचायत स्थापनेपासून शासनाचे तब्बल ७८ पुरस्कार मिळवले आहेत. नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२४ अंतर्गत नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास हा प्रथम क्रमांकाचा दीड कोटी रुपयांचा पुरस्कार आणि ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत हा एक कोटी रकमेचा पुरस्कार मिळाला आहे. या वर्षात सर्वोत्तम पंचायत, ग्राम ऊर्जा स्वराज, माझी वसुंधरा अभियान आणि संत गाडगेबाबा या पुरस्कारातून गावास तीन कोटी ७० लाख रुपये मिळाले आहेत.
रवींद्र माने, सरपंच, मान्याची वाडी
७५८८६८५५५६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.