Water Crisis : खानदेशात अनेक नद्यांची पात्रे कोरडीठाक

Water Shortage : खानदेशात गिरणा, वाघूर, अनेर, पांझरा सातपुड्यातील उदय आदी नद्यांची पात्रे कोरडीठाक आहेत.
Water Crisis
Water CrisisAgrowon

Jalgaon News : ः खानदेशात गिरणा, वाघूर, अनेर, पांझरा सातपुड्यातील उदय आदी नद्यांची पात्रे कोरडीठाक आहेत. काही नद्यांना पावसाळ्यातही पूर किंवा प्रवाही पाणी नव्हते. नदीकाठी टंचाई जाणवत असून, गावोगावीदेखील पाणी योजनांसमोर जलसंकट तयार झाले आहे.

गिरणा नदीवर अनेक गावे व पाणी योजना अवलंबून आहेत. परंतु गिरणा धरण फक्त ५६ टक्के भरले होते. त्यातून रब्बीला पाणी मिळू शकले नाही. पिण्यासाठी पाणी दिले जात आहे. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व विविध गावांच्या पाणी योजना गिरणा नदीवर अवलंबून आहेत. परंतु नदीपात्र कोरडे आहे.

नदीत दोन वेळेस टंचाई दूर करण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. परंतु नदीत वाळू नसल्याने पाणी वाहून जाते. नदीकाठच्या शिवारातील विहिरी कोरड्या झाल्या आहेत. तसेच नदीतील पाणी योजनांवरही जलसंकट तयार होत आहे. वाळू नसल्याने नदीत पाण्याचे पुनर्भरण होत नाही. यामुळे भूगर्भात पाणी कमी आहे. नदीतही पाणीसाठा नसल्याने अडचणी तयार होत आहेत.

Water Crisis
Water Crisis : ‘दिघंची’ कोरडाच, ‘टेंभू’चे पाणी असूनही टंचाई

वाघूर नदीचे पात्रही कोरडे आहे. धुळ्यातील पांझरा नदीदेखील कोरडी असून, साक्री, धुळे, शिंदखेडा, जळगावातील अमळनेर तालुक्यातील अनेक गावांच्या पाणी योजनांना पाणी कमी पडू लागले आहे. तसेच शिवारातही जलसंकट तयार झाले असून, नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे.

सातपुडा पर्वतात अक्कलकुवा, धडगाव क्षेत्रातील उदय नदीदेखील कोरडी झाली आहे. सातपुड्यातही पाणीटंचाई आहे. पाण्याची काटकसर करण्याची वेळ या भागात आहे. सातपुड्यातून येणाऱ्या अन्य नद्याही कोरड्या झाल्या आहेत. त्यात चोपड्यातील गूळ, यावलमधील मोर, रावेरातील सुकी, भोकर आदी नद्यांचा समावेश आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपुरातील अनेर नदी सातपुड्यातून वाहत येऊन सूर्यकन्या तापीला मिळणारी एक उपनदी. कधीकाळी मळ्यांचं हिरवं लेणं अंगावर घेऊन भर उन्हाळ्यातही गारवा देणारी जीवनदायिनी काळाच्या ओघात उन्हाळ्यात कोरडी पडू लागली असून, पात्रातील दगडगोटे तापून आग ओकू लागले आहेत. अनेर नदीचे मासे जसे पूर्वापार प्रसिद्ध आहेत तसे या नदीतील दगडगोटेही प्रसिद्ध आहेत. आजही गोल गोटे आणि अंघोळीचा फेना पात्रातून गोळा करून राज्यासह गुजरातेत गेल्याची असंख्य उदाहरणे आहेत.

Water Crisis
Water Crisis : टंचाईत जलसाठ्यावर प्रशासनाची नजर

साधारण १९७३ ते १९७८ च्या दरम्यान अनेर नदीवर गणपूर गावाजवळ धरण झाले. त्यानंतर शिरपूर आणि चोपडा तालुक्यांत डावा आणि उजवा कालवा होऊन शेतीला पाणी मिळू लागले. बरीच वर्षे हे पाणी रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी मिळत असे. मात्र पुढे पुढे ते रब्बीसाठीच मिळू लागले आणि धुळ्यासह अन्य पाणीपुरवठा योजनांसाठी पाणीसाठा राखीव झाला. पर्जन्यमान कमी झाले आणि नदी फेब्रुवारी, मार्चमध्येच लुप्त होऊ लागली. तिची धार आता जेमतेम दोन किलोमीटर टिकून पुढे सर्व दगडगोट्यांचे साम्राज्य दिसू लागले.

उन्हाळी हंगाम बंदच

साधारण १९८० ते १९९५ पर्यंत अनेर धरणाच्या कक्षेतील शिवारात उन्हाळी हंगामात भुईमूग पिकत असे आणि जळगाव, धुळे जिल्ह्यात सर्वांत जास्त उन्हाळी भुईमूग पीक घेणारा हा पट्टा होता. मात्र पाणीपुरवठा बंद झाल्याने रब्बीतील पिकेच फक्त पिकू लागली आणि भुईमूग इतिहासजमा झाला. कोट्यवधींचे उत्पादन आणि लाखोंची मजुरी बंदच झाली. मार्चपासून नदी कोरडी होऊ लागल्याने चोपडा व शिरपूर तालुक्यांच्या काही पाणीपुरवठा योजनांना त्यामुळे अडचण येऊ लागली.

एप्रिल ते जूनदरम्यान नदीकाठावरील विहिरी, कूपनलिका कोरड्या होऊ लागल्या. गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न भेडसावू लागला. गेली अनेक वर्षे उन्हे तापू लागली की हा प्रश्‍न ऐरणीवर येतो. सद्यःस्थितीत गणपूरपर्यंत नदीची बारीक धार टिकते. मात्र पुढे भवाळे, गलंगी, घोडगाव, वेळोदे, होळनांथे, भावेर आदी भागांत नदीत पाणीच नसल्याने प्रश्‍न निर्माण होतो. त्यासाठी नदीपात्रात धरणातून पाणी सोडण्याची गरज सध्या आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com