Manik Kadam NCP: माणिक कदम यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षामध्ये प्रवेश; बीआरएसला ठोकला रामराम!

महाराष्ट्र बीआरएसच्या किसान सेलचे अध्यक्ष माणिक कदम देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर टीका करत होते. परंतु आता माणिक कदम यांनी मंगळवारी (ता.१९) बीआरएसचा राजीनामा देत अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसची वाट धरली.
Manik kadam And Ajit pawar
Manik kadam And Ajit pawarAgrowon

शेतकऱ्यांना २४ तास मोफत पाणी आणि वीज देऊ, वर्षाला दहा हजार देऊ अशी आकर्षक आश्वासनं देतं शेती प्रश्नांवर रान उठवलं होतं तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी. केसीआर यांनी नांदेड, संभाजीनगरमध्ये जंगी सभा घेतल्या होत्या. या सभांमध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर फोकस होतं. महाराष्ट्र बीआरएसच्या किसान सेलचे अध्यक्ष माणिक कदम देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर टीका करत होते. परंतु आता माणिक कदम यांनी मंगळवारी (ता.१९) बीआरएसचा राजीनामा देत अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसची वाट धरली. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी नेत्यांच्या विश्वासहार्यतेचा मुद्दा चर्चे ठरला.

राष्ट्रवादी कॉँग्रेससह भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या सरकारवर माणिक कदम आरोपासह टीका करत होते. पण आता कदम यांनीच सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं ठरवलं. त्यामुळे कदम यांचं संधीसाधूपणाचं राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलं. गेल्यावर्षी माणिक कदम यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. आणि बीआरएसच्या किसान सेल अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सभा घ्यायला सुरूवात केली. केसीआर यांचे गोडवे गात राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसवर कठोर टीका केली. शेतकऱ्यांचं वाटोळं सत्ताधाऱ्यांनीच केलं, अशा आशयाची मांडणी बीआरएसच्या पाठकुळीवर बसून कदम करत होते.

केसीआर यांच्या बीआरएसची हवा होती. मराठवाड्यात आणि विदर्भात गुलाबी रुमाल शेतकऱ्यांच्याही गळ्यात दिसू लागली होते. त्यात बीआरएसने लक्षवेधी कार्यक्रमांची आखणी केली. जाहीर सभा घेत पक्ष प्रवेशाचे सोहळे घेतले. पंढरपुरला शेकडो गाड्यांच्या ताफ्यासोबत पांडुरंगाच्या दर्शनाला येणं असो वा नागपूरमध्ये पहिलं पक्ष कार्यालय सुरू करणं असो. सगळं काही ठरवून सुरू होतं. त्यासाठी तेलंगणातून आर्थिक रसद पुरवली जात होती. त्यामुळे कधी नव्हे ते शेतकरी संघटनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेत्यांना चांगले दिवस आले होते. सोबत राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसच्या नाराज मंडळीनंही बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसची राजकीय स्पेस पदरात पाडून घेण्यासाठी हालचाली सुरू होत्या. त्यात शेतकऱ्यांच्या मुद्दयावर भर दिला गेला.

Manik kadam And Ajit pawar
BRS Manik Kadam : शेतकऱ्यांच्या जमिनी खासगी कंपन्यांचा घशात घालण्याचा सरकारचा डाव: माणिक कदम 

मोफत वीज, पाणी, कर्जमाफी, शेतमालाचे पडलेले भाव आणि शेतकरी आत्महत्या यावरुन रान उठवलं गेलं. पण याच दरम्यान एकनाथ शिंदे आणि भाजपच्या सत्तेत अजित पवारही सामील झाले. आणि राज्यातील राजकीय गणितं बदलली. अजित पवारांनाही बीआरएस महाविकास आघाडीसाठी मोठं आव्हानं वाटत होतं. पण याच दरम्यान तेलंगणात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे केसीआर यांनी तेलंगणावर फोकस केलं. पण शेवटी तिथेही कॉँग्रेसने बाजी मारली. १० वर्ष हातात सत्ता असणार राज्य हातून सुटलं. त्यामुळे केसीआर यांच्या पक्ष विस्ताराच्या मनिषेवर पाणी फेरलं गेलं. आणि हळूहळू तेलंगणातही बीआरएसला गळती लागयला सुरुवात झाली. विधानसभेच्या निवडणुकाच्या निकालानंतर आतापर्यंत बीआरएसचे मोठ्या नेत्यांनी केसीआर यांना रामराम ठोकला. त्यासाठी कारण ठरलं, केसीआर आणि त्यांचे चिरंजीव केटीआर यांच्या एकहुकमी कारभाराचं. या कारभारामुळे पक्षातील अन्य नेत्यांना वैताग आणल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी करण्यात आलेल्या योजनांमध्ये केसीआर यांनी भ्रष्टाचार केल्याचे विरोधकांचे आरोप चांगलेच गाजले. कालेश्वरम डॅम असो वा शेतकऱ्यांना वार्षिक आर्थिक मदत करणं असो याबद्दल गंभीर आरोप केसीआर यांच्यावर केले गेले. या परिस्थितीत महाराष्ट्रातील बीआरएसचे नेतेही बिथरले. वास्तविक आपला कुठेही निभाव लागत नाही हे ओळखून संधीसाधू मंडळी बीआरएसला चिटकली होती. पण बीआरएस बालेकिल्ल्यातच ढसाळत असताना महाराष्ट्रातील नेत्यांनीही अंग बाजूला सुरुवात केली. आणि त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे माणिक कदम.

शेतकरी संघटनेतून बाहेर पडत राजकीय संधी कुठे मिळतेय का, याची चाचपणी करत कदमांनी शेवटी बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांचे प्रश्नांवरून अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यावर कदम जोरदार टीका करत होते. अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप करत होते. सोयाबीन कापसाचे भाव पडले तेव्हा तर माणिक कदम शेतकऱ्यांनाच उपहासाने बोलत होते. आणि त्याच वेळी केसीआर यांचे तोंडभरून कौतूक करत होते. शेतकरी आत्महत्यासाठी सरकार जबाबदार असल्याचंही ते वारंवार सांगत होते. बीआरएस सत्तेत आलं की, हे सगळे प्रश्नही सुटतील असा माणिक कदम यांचा दावा होता. आणि त्यासाठी माणिक कदम यांनी मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांना हाताशी धरलं होतं. पण बीआरएसला तेलंगणात घरघर लागली तशी कदम यांनी पलटी मारत संधीसाधूपणा केला.

अजित पवारांवर सिंचन घोट्याळ्यांचे आरोप माणिक कदम लावत होते, त्याच अजित पवारांच्या पक्षात ते सामील झाले. गळ्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस किसान सेलच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळही गळ्यात पडली. आणि कदम यांनी संधी साधून घेतली. अजित पवारांवर केलेल्या आरोपांचं काय? शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं काय? कारण आजही शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतीमालाला चांगला दर मिळत नाही. आठ तासदेखील वीज पुरवठा शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं जात नाही. म्हणजेच शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत. कदम यांनी कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हा त्यांचाच निर्णय आहे. पण मग शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वत:ची राजकीय पोळी त्यांनी भाजून घेतली नाही का? म्हणूनच शेतकऱ्यांनी कदम यांच्यासारख्या शेतकरी नेते म्हणवून घेणाऱ्यांवर विश्वास का ठेवावा? याचं उत्तर कदम यांनी दिलं पाहिजे. थोडक्यात काय तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ संधीसाधू राजकारण करणाऱ्या एका नेत्याचा चेहरा शेतकऱ्यांसमोर आला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com