
Costal Biodiversity Maharashtra : कांदळवने तोडून त्यावर जगण्यापेक्षा त्यांच्या संवर्धनातून जगण्याची दिशा शोधण्याचा प्रयत्न वन विभागांतर्गत कांदळवन कक्षाने सुरू केला. मुळातच कोकण आणि किनारावर्ती भागामध्ये पावसाचे प्रमाण अधिक. त्यामुळे पावसाळ्यात भात हे मुख्य व एकमेव पीक. कोकणातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने छोट्या छोट्या खाचरांमध्ये भात शेती करतो.
या शेतीमध्ये सुधारित तंत्रांच्या वापराला प्रोत्साहन देण्यात आले. एसआरआय (श्री) तंत्रामध्ये एका जागेवर भाताच्या रोपांचा पुंजका लावण्याऐवजी एकच रोप लावणे, सर्व रोपात समान २५ सें.मी. अंतर ठेवणे, चार रोपांच्या मध्ये गांडूळ खत व तत्सम सेंद्रिय खत किंवा युरिया डीएपी खतगोळी (ब्रिकेट) खोचणे, रासायनिक खतांचा कमीत कमी वापर यांचा समावेश करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
यामुळे पारंपरिक भातशेतीच्या तुलनेत भाताचे उत्पादन ४० ते ६० टक्क्यांनी वाढते. भात लागवडीसाठी सुधारित व अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणांचा (उदा. बासमती) वापर केला जाऊ लागल आहे. शेतीतून स्थानिकांचे उत्पन्न वाढावे, यासाठी कृषी विभागाचेही मोलाचे सहकार्य मिळाले.
रोपवाटिका व्यवसाय
कांदळवनातील झाडे, वनस्पतींचे औषधी व आरोग्यासाठीचे मूल्य स्थानिकांपर्यंत पोहोचविण्यात आले. मात्र त्यासाठी कांदळवनाची तोड होऊ नये, यासाठी कांदळवनातील विशेष उपयोगी वनस्पतींची रोपे तयार करण्यावर भर देण्यात आला. त्याचा स्थानिकांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून बऱ्याच लोकांना रोजगार उपलब्ध झाला असून, दरवर्षी हजारो रोपांची निर्मिती होत आहे. व्यवसायासोबतच वनस्पतींचे संवर्धन शक्य होत आहे.
कालवांची शेती
खाड्यांमध्ये कांदळवनासोबत पाण्यात कालवांचेही दर्जेदार उत्पादन मिळू शकते. कालव पालनाच्या शास्त्रशुद्ध पद्धती शिकविण्यात येत आहेत. त्यामुळे या व्यवसायाकडे अनेक स्थानिक वळले आहेत. त्यासाठी रोजगार वाढला आहे.
स्थानिक उत्पादनांपासून उपपदार्थ
कोकणामध्ये आंबा, फणस, कोकम, नारळ, सुपारी यासारखी प्रमुख फळबागा जोपासल्या जातात. या फळांपासून विविध उपउत्पादनांच्या निर्मितीलाही चालना देण्यात आली. त्याला माशांपासून बनवलेले मूल्यवर्धित पदार्थांची जोड देण्यात आली. या उत्पादनांच्या विक्रीसाठी बाजारपेठांचा शोध घेतला जात आहे. त्यातून व्यवसायवृद्धी होत आहे.
भरडधान्य वर्षाचे औचित्य साधून गेल्या दोन वर्षात भरड धान्यांपैकी नाचणी या कोकणातील थोड्याशा मागे पडलेल्या पिकाच्या लागवडीला चालना देण्यात आली. डोंगर उतारावर नाचणीच्या लागवडीपासून काढणीपर्यंतचे शेतकऱ्यांना, तर काढणीपश्चात विविध उत्पादनांच्या निर्मितीसाठी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.
आता या भागातील अनेक महिला बचत गट नाचणीपासून विविध मूल्यवर्धित खाद्यपदार्थ बनवत आहेत. नारळ उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने नारळाच्या शेंड्या, कवच आणि अन्य भागांपासून विविध वस्तूंच्या निर्मितीची व्यापकता वाढवली आहे. यामध्ये कॉयरबोर्डचा मोठा वाटा आहे.
कांदळवन निसर्ग पर्यटन
लोकसहभागातून कांदळवन संवर्धनासाठी केलेल्या विविध प्रयत्नांमध्ये निसर्ग पर्यटन हा व्यवसाय यशस्वी ठरला आहे. कोकणातील विशेषतः किनाऱ्यालगतची जैवविविधता खूपच समृद्ध आहे. खाडीत असलेल्या कांदळवनांच्या सफरीतून पर्यटकांना रमणीय दर्शन घडविण्यात येते. ही सफर ज्ञानात भर घालणारी असते.
२०१४ ला कांदळवन कक्षाने यूएनडीपी प्रकल्पाच्या माध्यमातून वेंगुर्ल्यात १० महिलांचा स्वामिनी महिला गट तयार केला. या गटाला पर्यटनविषयक प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनीही येणाऱ्या देशी परदेशी पर्यटकांशी मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये संवाद साधण्याचे कौशल्य प्राप्त केले.
कांदळवनाची वैशिष्ट्ये, त्याचे महत्त्व आणि त्यातील जैवविविधता विषयक माहिती सोप्या भाषेत, गोष्टीरूपात कशी द्यायची, हे त्या शिकल्या. आता या महिला कित्येक तास कांदळवन, खाऱ्या पाण्यातील आणि अन्य जैवविविधतांबाबत बोलू शकतात. यांत्रिक होडीच्या मोठ्या आवाजामुळे वनातले पक्षी व प्राणी दूर निघून जाण्याचा धोका असतो.
तसेच इंजिन ऑइल, डिझेल गळती होण्याचा धोका असतो. तो टाळण्यासाठी काही महिलांनी होडी वल्हवण्याचे शिक्षण घेतले. या महिला गटाने पर्यटकांसाठी स्वतःचे उपाहारगृहही उभारले आहे. काही गावकऱ्यांनी ‘होम स्टे’ च्या सुविधा उभ्या केल्या आहेत. स्वामिनी महिला गटाने पहिल्याच वर्षात (२०१५ मध्ये) पावसाळ्याचा काळ वगळता सात महिन्यामध्ये ७० हजार रुपयांचा व्यवसाय केला होता.
आता माउथ पब्लिसिटीमुळे गेल्या दहा वर्षांत उत्तरोत्तर त्यात भरच पडत गेली आहे. या गटाचे भरघोस यश पाहून विजयदुर्ग ते रेडी या किनारी पट्ट्यातील बारा गावातही असेच निसर्ग पर्यटन सुरू झाले आहे. स्थानिक वैशिष्ट्यानुसार त्यात मगर पर्यटन, कासव पर्यटन, इ. बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
विविध विभागांचे सहकार्य
कांदळवन कक्ष आणि कांदळवन फाउंडेशन हे वनविभागाच्या अंतर्गत येतात. मात्र विविध कामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभाग, कृषी, पर्यटन, महसूल, गृह विभाग (पोलिस), नगर विकास आणि कौशल्य विकास अशा विविध विभागांशी समन्वय करणे गरजेचे होते.
अनेक केंद्रीय संस्था उदा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोलॉजी, केंद्रीय मत्स्य संशोधन संस्था, केंद्रीय मच्छीमार तंत्रज्ञान संस्था, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकीश ॲक्वाकल्चर, सागरी उत्पादने निर्यात विभाग, केंद्रीय वन्यप्राणी संवर्धन संस्था, केंद्रीय प्राणी सर्व्हेक्षण विभाग, सलीम अली संस्था आणि बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी यांचेही विविध ठिकाणी सहकार्य घेण्यात आले. विविध सामाजिक संस्थांशी जोडून घेत कांदळवन कक्षाने संवर्धनाचे काम तडीला नेले.
या प्रकल्पाचे नियोजन, विविध संसाधने व अर्थसाह्यासाठी ‘युनिसेफ’चा ‘यू.एन.डी.पी. (युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) आणि ग्रीन एन्व्हायर्न्मेंट फंड्स या जागतिक संस्थांनी मोलाची मदत केली. तसेच महाराष्ट्र शासनाने विविध विभागांचाही निधी विविध योजनांद्वारे इथे खर्चण्यात आला.
सकारात्मक परिणाम
स्थानिकांना अशा छोट्या मोठ्या व्यवसायातून उदरनिर्वाहाचे मार्ग उपलब्ध झाले. परिणामी, त्यांच्या संवर्धनाचीही आवश्यकता आपोआपच त्यांच्या मनात ठसली. आता कोणीही न सांगता स्थानिक मंडळी विविध पर्यावरणविषयक दिन साजरे करू लागले आहेत. उदा. पर्यावरण दिन, सागर सृष्टी दिन, पाणथळ जागा दिन, वसुंधरा दिन इ.
हे निसर्ग पर्यटन केवळ मनोरंजनाच्या पातळीवर न राहता सांस्कृतिक चळवळ बनले आहे. त्यातून एकविसाव्या शतकातही निसर्गासोबतच त्याला जपत जगण्याची नवीन जीवनमुल्ये रुजत आहेत. अभ्यास पर्यटनही सुरू झाले आहे. पशुपक्षी, सागरी जीव आणि कांदळवनातील वनस्पतींच्या निरीक्षणासाठी, अभ्यासासाठी लोकांची, विद्यार्थ्यांची वर्दळ वाढत आहे.
कोकणातील महाविद्यालयाबरोबरच कर्नाटक, केरळ व तमिळनाडूमधील महाविद्यालयातील विद्यार्थी इंटर्नशिपसाठी येऊ लागले आहेत. सर्व बाबींचे व्यापकता लक्षात घेऊन इथे उच्च प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज सतत वाढत आहे. ती पुरविण्यासाठी प्रशिक्षणाचे व व्यावसायिक अभ्यासक्रम स्थानिक महाविद्यालयांमध्ये सुरू झाले आहेत.
पूर्वी जगण्यासाठी शहराकडे स्थलांतर करावे लागत असे. त्याचे प्रमाण कमी झाले असे नाही, तर उपजीविकेसाठी अन्यत्र असलेल्या अनेक कुटुंबानी गावाची दिशा धरली आहे. आजवर दुर्लक्षले गेलेले कोकणातील छोटेमोठे गड, किल्ले व सागरी किल्ले, विविध वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे, ठिकठिकाणच्या देवराया, कातळ शिल्प आणि पुरातन गुहा ही आकर्षणाची केंद्रे बनत आहेत. निसर्ग संवर्धनातून पर्यटकांना आनंद देतानाच शाश्वततेबरोबरच आर्थिक सुबत्तेकडे नेणारी ही वाट स्थानिक तरुणांनी स्वीकारली आहे.
भूतान सारखा छोटा देश जे करतोय, तेच आपल्या कोकणात साकारले जात आहे. हरित अर्थव्यवस्था हाच शाश्वत विकासाचा राजमार्ग ठरत आहे. या सर्व छोट्या छोट्या वाटणाऱ्या प्रयत्नांतून कांदळवनाच्या क्षेत्रात भारतभरामध्ये गेल्या १२ वर्षांत एकूण ३६३.६८ चौरस किलोमीटर इतकी वाढ शक्य झाली आहे.
(टीप ः हा लेख लिहिण्यासाठी ‘यू. एन. डी. पी.’ च्या माजी प्रकल्प अधिकारी दुर्गा ठिगळे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.)
सागर पर्यटन
अतिशय स्वच्छ आणि तुलनेने उथळ समुद्रकिनाऱ्याच्या भागामध्ये पाण्यातील जीवसृष्टी विशेषतः रंगीबेरंगी प्रवाळे पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडते. ती खरेतर कांदळवन कक्ष सुरू होण्याआधीचीच आहे. पण त्यांना आवश्यक त्या सोईंची वानवा होती. त्या सोयीसुविधांच्या उभारणीवर लक्ष देण्यात आले. ‘स्कूबा डायव्हिंग’ साठी पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. स्वच्छ समुद्र किनाऱ्यामुळे विविध सागरी सस्तन प्राणी या भागात वावरतात. उदा. डॉल्फिन, पानमांजर यांचा वावर वाढला.
- सतीश खाडे ९८२३०३०२१८,
(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.