
डॉ. योगेश मात्रे, डॉ अनंत लाड
Sucking Moth Control Management : लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये रस शोषक पतंगामुळे सुमारे ५० ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. या किडीचा जीवनक्रम समजून घेऊन वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. रस शोषक पतंग हे मोठ्या आकाराचे व आकर्षक रंगाचे असतात. रस शोषक पतंगाच्या ओथ्रिस मॅटरना, ओथ्रिस फुलोनिका व अकिया जनाटा अशा विविध प्रजाती आढळून येतात.
ओथ्रिस मॅटरना :
समोरील पंख तपकिरी रंगाचे असून, मागील पंख नारंगी रंगाचे असतात. मागील पंखावर मध्यभागी एक काळा ठिपका असतो. पंखाच्या कडा काळ्या रंगाच्या असून त्यावर पांढरे ठिपके असतात.
ओथ्रिस फुलोनिका :
मागील पंख नारंगी रंगाचे असून, त्यावर मध्यभागी इंग्रजी “C” अक्षरासारखा काळा ठिपका असतो.
अकिया जनाटा :
समोरील पंख तपकिरी व मागील पंख पांढरे असून त्यावर काळे चट्टे असतात.
हे रस शोषणारे पतंग मोसंबी, संत्री फळाव्यतिरिक्त डाळिंब, आंबा, द्राक्ष इ. फळांवरही प्रादुर्भाव करतात. या पतंगांचा प्रादुर्भाव तुलनात्मकदृष्ट्या उशिराचा आंबिया बहार आणि मृग बहरात जास्त प्रमाणात दिसून येतो. ऑगस्ट ते ऑक्टोबर या पावसाळी कालावधीत प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो. पावसाळी हवामानात जून ते ऑगस्ट कालावधीत जीवनक्रम पूर्ण होऊन या किडीचे पतंग बाहेर पडतात. त्यांच्या प्रौढ होईपर्यंतचा जीवनक्रम आज आपण जाणून घेऊ.
जीवनक्रम :
ज्या फळांना हे पतंग उपद्रव करतात, त्या फळझाडांवर पतंगापूर्वीच्या कोणत्याही अवस्था (उदा. अंडी, अळी आणि कोष) दिसून येत नाहीत. अंडी घालण्यापासून ते पतंगाची पूर्ण वाढ होईपर्यंत या किडीचा जीवनक्रम जंगली वनस्पतींवर होतो. (उदा. गुळवेल, वासनवेल, चांदवेल इ. वेलवर्गीय वनस्पती) या वनस्पती नदी नाल्यांच्या किनाऱ्याला किंवा जंगलांमध्ये आढळतात.
एक मादी पतंग जवळपास ८०० अंडी या वनस्पतींच्या पानांवर घालते. ही अंडी २ ते ३ दिवसांत उबतात.
त्यातून लहान पिवळसर रंगाच्या अळ्या बाहेर पडतात. सुरुवातीला अळ्या वेलींची पाने खरवडून खातात.
वाढीच्या अवस्थेत नंतर त्या पूर्ण पाने कुरतडून खातात. अळीची पूर्ण वाढ होण्यास १२ ते १४ दिवसांचा कालावधी लागतो. पूर्ण वाढ झालेल्या अळीचा रंग तपकिरी होतो.
पूर्ण वाढ झाल्यानंतर अळी स्वतःभोवती कोष विणून आत कोषावस्थेत जाते. कोषावस्था या वेलींवरच तयार होते. १० ते १५ दिवसांनी त्यातून पतंग बाहेर पडतो. हा बाहेर पडलेला पतंग डाळिंब, मोसंबी, संत्री अशा फळ पिकांकडे धाव घेतो.
नुकसान :
फक्त प्रौढ पतंग अवस्था फळाचे नुकसान करते. हे पतंग निशाचर असून सर्वसाधारणपणे दिवस मावळल्यापासून ते मध्य रात्रीपर्यंत पतंगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.
बागेतील पक्व फळ शोधून त्यावर पतंग बसतात. आपल्या सोंडेने फळांना सूक्ष्म छिद्र पाडून त्यात सोंड खुपसून आतील रस शोषतात.
कालांतराने छिद्र पडलेल्या जागेवर गोलाकार तपकिरी चट्टा तयार होतो. त्या जागी फळ सडण्यास सुरुवात होते. त्या जागी बुरशींचा शिरकाव होऊन अशी प्रादुर्भावग्रस्त फळे गळून पडतात.
पतंगामुळे जर फळगळ झाली असल्यास पडलेली फळे दाबल्यास त्यातून रस निघतो. फळांची प्रत कमी झाल्याने अशी फळे विक्री योग्य राहत नाहीत.
व्यवस्थापन :
अंडी, अळी आणि कोषाला पूरक असणाऱ्या फळ बागेतील आणि आजूबाजूस असलेली गुळवेल, वासनवेल व चांदवेल इ. वेळीच बंदोबस्त करावा.
जमिनीवर पडलेली प्रादुर्भावग्रस्त फळे ताबडतोब जमा करून जमिनीमध्ये पुरावे.
पतंगाचा प्रादुर्भाव दिसून येताच सायंकाळी बागेमध्ये धूर करावा.
त्यामुळे पतंगांचा शिरकाव फळबागेत वेळीच रोखता येईल.
शक्य असल्यास फळांना कागदी किंवा कापडी पिशवीने झाकावे.
पिकलेली केळी बागेमध्ये ठेवून त्यावर आकर्षित झालेले पतंग पकडून नष्ट करावेत.
बागेमध्ये प्रकाश सापळा लावावा. प्रकाशाकडे आकर्षित झालेले पतंग प्रकाशाच्या झोताने सुस्त होतात. असे पतंग पकडून नष्ट करावेत.
बागेतील संपूर्ण झाडे ०.५ सेंमी मेशपेक्षा कमी असलेल्या नायलॉनच्या जाळीने झाकावे.
फळ हिरवे रंगांमधून पिवळसर रंगांमध्ये रूपांतर होत असताना १० ते १५ दिवसांच्या अंतराने फळ तोडणी होईपर्यंत निंबोळी तेल दहा मिलि प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.
मॅलेथिऑन १०० मिलि अधिक गूळ १०० ग्रॅम अधिक फळांचा रस १०० ते १५० मि.लि. प्रति लिटर पाणी असे विषारी आमिष तयार करावे. हे मिश्रण १०० मिलि प्रमाणात मोठ्या आकाराच्या बाटल्यांमध्ये भरून ८ ते १० झाडांच्या अंतरावर एक या प्रमाणे टांगून ठेवावे. या विषारी आमिषाकडे आकर्षित झालेले पतंग गोळा करून नष्ट करावेत.
डॉ. योगेश मात्रे, (संशोधन सहयोगी), ७३८७५२१९५७,
डॉ. अनंत लाड (सहायक प्राध्यापक), ७५८८०८२०२४
(कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.