
डॉ. देवानंद बनकर, डॉ. साताप्पा खरबडे
Soybean Pest Control: वातावरणातील जास्त आर्द्रता, उबदार तापमान, रिमझिम पाऊस आणि त्यानंतर पडणारा पावसातील खंड असे वातावरण खोडमाशी व चक्रीभुंगा या किडींच्या वाढीसाठी पोषक असते. खोडमाशीचा प्रादुर्भाव पीक उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी रोपावस्थेत सुरू होतो व तो पुढे पीक काढणीपर्यंत राहतो. तर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव पेरणीपासून एक महिन्यानंतर पुढे सुरू होतो व पिकाच्या काढणीपर्यंत राहतो. साधारणतः जुलै ते ऑक्टोबरपर्यंत कीड कार्यरत असते. वातावरण पोषक असल्यास या किडींमुळे ९० ते १०० टक्के झाडे कीडग्रस्त होऊन उत्पादनात ३० ते ६० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. सोयाबीनवरील खोडमाशी व चक्रीभुंगा या किडींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी खालील नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा.
खोडमाशी
शास्त्रीय नाव - मेलेनअॅग्रोमायझा सोजाई (अॅग्रोमायझिडीई : डिप्टेरा)
ओळख, नुकसानीचा प्रकार
खोडमाशी तिचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष व प्रौढ अशा चार अवस्थांमध्ये पूर्ण करते. यापैकी खोडमाशीची अळी ही नुकसानकारक आहे.
प्रौढ खोडमाशी ही घरातील माशीपेक्षा लहान आकाराची, चमकदार काळ्या रंगाची असते.
मादी माशी पानांच्या पेशीत फिक्कट पिवळसर रंगाची अंडी घालते.
अंड्यातून ४ दिवसात पाय नसलेली पिवळसर रंगाची अळी बाहेर पडते.
अळीचा तोंडाकडील भाग टोकदार व मागील भाग गोलाकार असतो. अळी पान पोखरून पानाच्या शिरेमधून देठात शिरते. देठातून खोडात शिरून आतील भाग खाते. खोड पोखरत जमिनीपर्यंत पोहोचते. अळी अवस्था ही ७ ते १२ दिवसांची असते.
खोड पोखरल्यामुळे खोडात नागमोडी पोकळ्या तयार होतात. असे खोड आतून लालसर तपकिरी रंगाचे दिसते.
पूर्ण वाढ झालेली अळी खोडामध्येच कोषावस्थेत जाते. कोषावस्था ७ ते १० दिवसांची असते.
प्रौढ माशीला बाहेर येण्याकरिता जमिनीलगत किंवा मोठ्या झाडावर वरच्या बाजूस अळी गोलाकार छिद्र करते. त्यातून नंतर प्रौढ माशी बाहेर पडते. प्रौढ अवस्था ५ दिवसांची असून किडीचा जीवनक्रम साधारणतः २१ ते ३७ दिवसांत पूर्ण होतो.
वर्षभरात खोडमाशीच्या ८ ते ९ पिढ्या पूर्ण होतात.
नुकसानीची लक्षणे
खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे लहान झाडे, पाने आणि फांद्या देखील सुकतात. रोपावस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पाने कोमेजून सुकलेली दिसतात. एकरी झाडांची संख्या कमी होते. खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे झाडावरील फुलांची गळ होते. शेंगा कमी प्रमाणात लागतात. शेंगांमधील दाण्याचे वजन देखील कमी होते, त्यामुळे उत्पादनात घट येते.
आर्थिक नुकसान पातळी
सरासरी १० ते १५ टक्के प्रादुर्भावग्रस्त रोपे.
व्यवस्थापन
पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवणे खूप गरजेचे आहे.
पेरणीपूर्वी बियाण्यास थायामेथोक्झाम (३० टक्के डब्ल्यूएस) ६ मि.लि. प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया केलेली असल्यास खोडमाशी, चक्रीभुंगा यासोबतच रस शोषक किडींच्या व्यवस्थापनास मदत होते.
खोडमाशीचा प्रादुर्भाव झालेली झाडे उपटून नष्ट करून टाकावीत.
पेरणीनंतर २० व ३५ दिवसांनी निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा अॅझाडिरॅक्टिन (१००० पीपीएम) २० ते ३० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
खोडमाशीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडताच पुढील पैकी एका रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी. पुढील फवारणी आठ ते पंधरा दिवसाच्या अंतराने कीटकनाशक बदलून करावी. एकच एक किटनाशक वापरणे टाळावे.
कीटकनाशकाचे नाव वापराचे प्रमाण (प्रति १० लि. पाणी)
इथिऑन (५० टक्के ईसी) ३० मि.लि.
क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एससी) ३ मि.लि.
इंडोक्झाकार्ब (१५.८० टक्के इसी) ६.६६ मि.लि.
आयसोसायक्लोसेरॅम (९.२ टक्के डीसी) १२ मि.लि.
थायामेथोक्झाम (१२.६०) + लँबडा सायहॅलोथ्रीन (९.५० टक्के झेडसी) (संयुक्त कीटकनाशक) २.५ मि.लि.
क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (९.३०) + लँबडा सायहॅलोथ्रीन (४.६० टक्के झेडसी) (संयुक्त कीटकनाशक) ४ मि.लि.
लँबडा सायहॅलोथ्रीन (४.९० टक्के सीएस ) ६ मि.लि.
कारटॅप हायड्रोक्लोराइड (४ टक्के) + फिप्रोनील (०.५० टक्का सीजी) (संयुक्त कीटकनाशक) ४ ग्रॅम
डॉ. देवानंद बनकर, ७७५७९८७४५९
संशोधन सहयोगी (क्रॉपसॅप), कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.