Banana Farming : केळी लागवडीत ठिबकद्वारे विद्राव्य खतांचे व्यवस्थापन

Article by Satish Rathod : ठिबकमधून विद्राव्य खतांची मात्रा देण्यापूर्वी माती परीक्षण करणे गरजेचे असते. जमिनीचा सामू, विद्युत वाहकता तसेच जमिनीमध्ये उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे प्रमाण लक्षात घेऊन त्यानुसार विद्राव्य खतांची मात्रा ठरवावी.
Banana Farming
Banana FarmingAgrowon

सतीश राठोड

Application of Soluble Fertilizers by Drip in Banana Orchards : केळी लागवडीमध्ये उत्पादकता वाढविण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाण्याची उपलब्धता पिकांस करणे अत्यंत आवश्यक असते. चांगल्या उत्पादनासाठी ७० ते ७५ सिंचनाची आवश्यकता असते. हिवाळ्यात ७ ते ८ दिवसांच्या अंतराने, तर उन्हाळ्याच्या दिवसांत ४ ते ५ दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. पावसाळ्यात आवश्यकतेनुसार सिंचन करून बागेतील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याची सोय करणे आवश्यक असते. अन्यथा, रोपांच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

केळी बागेमध्ये ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केल्यास सिंचनाच्या सुमारे ५८ टक्के पाण्याची बचत होते तर उत्पादनात २३ ते ३२ टक्के वाढ झाल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये लागवडीपासून चौथ्या महिन्यापर्यंत ५ ते १० लिटर पाणी प्रतिझाड प्रति दिवस द्यावे. तर लागववडी नंतरच्या ५ व्या महिन्यापासून ते शूटिंगपर्यंत १० ते १५ लिटर पाणी प्रतिझाड प्रतिदिन आणि शूटिंगपासून १५ दिवस आधीपर्यंत १५ लिटर पाणी प्रतिझाड प्रतिदिन द्यावे.

विद्राव्य खतांचे व्यवस्थापन

ठिबकमधून विद्राव्य खतांची मात्रा देण्यापूर्वी माती परीक्षण करणे गरजेचे असते. जमिनीचा सामू, विद्युत वाहकता तसेच जमिनीमध्ये उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे प्रमाण लक्षात घेऊन त्यानुसार विद्राव्य खतांची मात्रा ठरवावी.

पिकांच्या योग्य वाढीसाठी लागणारी पोषक अन्नद्रव्ये द्रवरूप स्वरूपात (विद्राव्य खते) पिकांच्या अवस्थेनुसार ठिबक सिंचनाद्वारे देण्याच्या प्रक्रियेला ‘फर्टिगेशन’ असे म्हणतात. या पद्धतीमुळे जमिनीतील ओलाव्यात मुळांच्या कार्यक्षेत्रात खते दिली जातात. फर्टिगेशन हा काटेकोर (प्रिसिजन फार्मिंग) शेतीतील महत्त्वाचा भाग बनलेला आहे.

ठिबक सिंचनाद्वारे खतांची व पाण्याचा वापर कार्यक्षमता वाढविण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर करणे अधिक फायद्याचे ठरते. विद्राव्य खते उपलब्ध होत नसल्यास पारंपरिक खतांपैकी युरिया, पांढरा पोटॅश किंवा चांगल्या प्रतीचा म्युरेट ऑफ पोटॅश पाण्यात संपूर्ण विरघळत असल्यामुळे ठिबक सिंचनातून द्यावा.

Banana Farming
Banana Farming : मृग बाग लागवडीवर भर

ठिबक सिंचनाद्वारे खतांची मात्रा गरजेप्रमाणे विभागून देता येते. तसेच पिकांना आवश्यकतेनुसार खते देणे शक्‍य होते. एक दिवसाआड किंवा पंधरवड्यातून एकदा पिकांच्या गरजेप्रमाणे ठिबकद्वारे सिंचनातून खते दिल्यामुळे खतांची वापर कार्यक्षमता वाढून अधिक व दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते.

हंगामापूर्वी मातीची तपासणी करून मातीत उपलब्ध अन्नद्रव्यांच्या प्रमाणात गरजेनुसार बदल करावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असल्यास आवश्‍यकतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. लागवडीपूर्वी उपलब्धतेनुसार व शेवटच्या पाळीपूर्वी कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे.

फर्टिगेशनसाठी विद्राव्य खतांचे गुणधर्म

विद्राव्य खते संपूर्णपणे पाण्यात विरघळणारी, आम्लधर्मी असावीत. विद्राव्य खते घन स्वरूपात उपलब्ध असावीत. यामुळे हाताळणी व वाहतूक करण्यासाठी सुलभ असतात.

विद्राव्य खते क्‍लोराइड्‌स व सोडिअमसारख्या हानिकारक मूलद्रव्यांपासून मुक्त असावीत.

पाण्यात विरघळल्यानंतर साका तयार होऊ नये. दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध असावीत.

फर्टिगेशनचे फायदे

कोणत्याही परिस्थितीत अचूक व समप्रमाणात खतांचा वापर शक्‍य होते. ठिबकच्या माध्यमातून खतमात्रा पाण्यासोबत झाडाच्या मुळांच्या कार्यक्षम कक्षेत पडत असल्यामुळे नेमके समान पाणी व खत मुळांच्या क्षेत्रात योग्य प्रमाणात वितरित होते.

अचूक आणि योग्य वेळी आवश्यकतेप्रमाणे खते आणि पाणी पिकांना उपलब्ध करून देणे सोयीचे होते.

खतांची मात्रा ही झाडाची गरज व हवामानातील परिस्थितीनुसार वेळेवर निश्‍चित करता येते.

पाण्याची कार्यक्षमता ४० ते ५० टक्के व खतांची कार्यक्षमता ६० ते ९५ टक्के इतकी वाढते. कारण ठिबक सिंचन पद्धतीने पिकास पाणी दिल्याने पिकांच्या कार्यक्षम मुळांच्या कक्षेत ओलावा निर्माण होऊन २४ तास जमिनी वाफसा स्थितीमध्ये राहण्यास मदत होते. त्यामुळे जमिनीतून वाहून निचऱ्याद्वारे खतांचा ऱ्हास होत नाही किंवा साठून राहत नाहीत.

पिकांच्या संवेदनशील अवस्थेनुसार आवश्‍यक तेवढी खतांची मात्रा एकूण वाढीच्या कालावधीत अनेक वेळा विभागून देता येते. त्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते.

पीक लवकर तयार होते व उत्पादनात २० ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होते. विद्राव्य खतांच्या वापरामुळे दर्जेदार व निर्यातक्षम उत्पादन मिळण्यास मदत होते. पिकाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होते.

हलक्‍या व कमी प्रतिच्या जमिनीतसुद्धा पीक घेता येते.

आम्लयुक्त विद्राव्य खतांमुळे ठिबक संचामध्ये आपोआपच रासायनिक प्रक्रिया होते. ठिबक तोट्या किंवा संच बंद पडत नाही.

विद्राव्य खतांमध्ये सोडियम व क्‍लोरिनचे प्रमाण अत्यल्प असते.

पारंपरिक पद्धतीने खते देताना जमीन तुडवली जाऊन ती घट्ट होते. तसेच मुळांची वाढ योग्य प्रमाणात होत नाही. ठिबक संचातून खते दिल्याने हे टाळणे शक्य होते.\

Banana Farming
Banana Farming : तरुण शेतकऱ्यांच्या एकोप्यातून केळी निर्यात

केळी लागवडीत विद्राव्य खतांचा वापर

खते देण्याची वेळ (दिवस) खतांचा प्रकार प्रति १००० झाडांसाठी खतमात्रा (किलो) एकूण खतमात्रा (किलो)

१) लागवडीच्या वेळी शेणखत/कंपोस्ट खत/लेंडीखत (टन) १० १०

 २) लागवडीनंतर ५ ते ६५ दिवस

(दर ४ दिवसांनी एकूण १६ हफ्ते) युरिया ५ ८०

१२:६१:०० २ ३२

सल्फेट ऑफ पोटॅश ५ ८०

 ३) लागवडीनंतर ६० दिवसांनी

(१ हफ्ता) झिंक सल्फेट ११ ११

फेरस सल्फेट ११ ११

बोरॅक्स ३.३ ३.३

सूक्ष्म अन्नद्रव्ये १० १०

 ४) लागवडीनंतर ६६ ते १३५ दिवस

(दर ४ दिवसांनी एकूण १७ हफ्ते) युरिया ६ १०२

१२:६१:०० २ ३४

सल्फेट ऑफ पोटॅश ५ ८५

मॅग्नेशिअम सल्फेट १.६५ २८.५

 ५) लागवडीनंतर १२० दिवसांनी एक हफ्ता झिंक सल्फेट ११ ११

फेरस सल्फेट ११ ११

बोरॅक्स ३.३ ३.३

सूक्ष्म अन्नद्रव्ये १० १०

 ५) लागवडीनंतर १३६ ते १६५ दिवस

(दर ४ दिवसांनी एकूण ८ हफ्ते) युरिया ६.५ ५२

सल्फेट ऑफ पोटॅश ६ ४८

 ६) लागवडीनंतर १६६ ते ३१५ दिवस

(दर ४ दिवसांनी एकूण ३७ हफ्ते) युरिया ३ १११

सल्फेट ऑफ पोटॅश ६ २२२

सतीश राठोड, ९१६८६१२४१०

(वरिष्ठ कृषी विद्यावेत्ता, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com