
डॉ. संतोष वानखेडे, डॉ. किरण मालशे, डॉ. मकरंद जोशी
Bud Rot Management: मागील मे महिन्यामध्ये झालेला अति मुसळधार पाऊस, त्यासोबतच सोसाट्याचा वारा आणि अधूनमधून उघडीप त्यातच वाढलेली आर्द्रता आणि कमी झालेले तापमान अशी हवामान स्थिती होती. माडाच्या कोंबावर गेंड्या भुंगा किंवा सोंड्या भुंगा किडीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या जखमा, लागवड करताना जमिनीत पुरले गेलेले नारळाबरोबर रोपाचे खोड, सोसाट्याचा वाऱ्यामुळे सुईचा तडकलेला भाग इत्यादी कारणांमुळे कोंब किंवा सुई मोडून पडलेल्या तसेच वाकलेल्या दिसून येत आहेत.
या ठिकाणी झालेल्या जखमांमधून कोंब कुजव्या या रोगाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. हा रोग फायटोप्थोरा पाल्मीव्होरा या बुरशीमुळे होतो. हा रोग भारताच्या बहुतांश पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवर आढळून येतो. रोपवाटिकेतील रोपांपासून मोठ्या माडांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. साधारणपणे लहान वयाचे माड (२० वर्षांपर्यंतचे) या रोगास जास्त प्रमाणात बळी पडतात. वेळीच योग्य उपाययोजना न केल्यास रोगाच्या प्रादुर्भाव माड मरण्याची शक्यता जास्त असते.
कारणे
हवेतील आर्द्रता ९४ टक्क्यांवर आणि तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस असेल तर रोगाची वाढ झपाट्याने होते. कोकणात जून ते सप्टेंबरमधील पावसामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण (९८ ते १०० टक्के) वाढते. हे वातावरण रोगकारक बुरशीच्या वाढीस कारणीभूत ठरते.
बागेत पाणी साचून राहणे किंवा पाणथळ जागेतील लागवड रोगासाठी अत्यंत पोषक असते. डोंगर खोऱ्यामध्ये रोगाचे प्रमाण अधिक असते.
गेंड्या भुंगा किंवा सोंड्या भुंगा या किडींच्या उपद्रवामुळे नारळाच्या कोंबाला जखमा होतात. या जखमांतून रोगकारक बुरशीचा शिरकाव होऊन रोगाची लागण होते.
रोगाची लागण
लहान माड
लहान रोपांची नवीन लागवड करताना नारळाबरोबर रोपाचे खोड जमिनीत पुरले गेले असेल, तर रोपांच्या कोंबात पाण्याबरोबर मातीचे सूक्ष्म कण पानांच्या बगलेतून जातात. या मातीच्या कणांबरोबर बुरशीचे कण असतात. वाऱ्यामुळे सुईची हालचाल होते. त्यामुळे मातीचे कण रोपाच्या सुईवर घासले जातात. त्यामुळे कोंबाला जखमा होऊन बुरशीचे बीजाणू शिरकाव करतात. परिणामी बुरशीची वाढ होऊन कोंब कुजायला सुरवात होते.
मोठे झाड
पावसाळ्यात सोसाट्याचे वारे सुटल्यानंतर माडाच्या सुईचा वरील भाग वाऱ्याबरोबर हलत असतो. सुईचा खालील भाग तितकासा हलत नसतो. या दोन भागांमध्ये असलेला भाग या दरम्यान बऱ्याचदा तडकतो. तडकलेल्या भागातून पावसाचे पाणी आत जाते. फायटोप्थोरा ही बुरशी नारळाच्या या भागात सुप्तावस्थेत असते. पावसाळ्यात पोषक हवामान स्थिती तयार झाल्यावर रोगाच्या बुरशीची वाढ तडकलेल्या भागात झपाट्याने होऊन कुजण्याची क्रिया सुरू होते. हळूहळू बुरशीमुळे कुजण्याची क्रिया कोंबापर्यंत जाऊन कोंब कुजतो.
उपाययोजना
लहान माड
नवीन रोप लागवड करताना रोपाचा कोंब जमिनीच्या पृष्ठभागावर राहील याची दक्षता घ्यावी. लागवड केल्यानंतर रोपाभोवतीच्या मातीत ट्रायकोडर्मा हर्जियानम १०० ग्रॅम प्रति रोप या प्रमाणात मातीत मिसळावे.
वाऱ्यामुळे रोप हलू नये म्हणून रोपाच्या उंचीचा अंदाज घेऊन दोन काठ्या दक्षिण व उत्तर बाजूला ४५ सेंमी अंतरावर रोवाव्यात. तिसरी काठी रोपाच्या पूर्वेला दोन्ही काठ्यांवर आडवी बांधावी.
नदीकिनारच्या लागवडीतील रोपे काही वेळा पुराच्या पाण्यात बुडतात. त्यामुळे रोपाच्या कोंबात गाळ साचतो. अशावेळी पुराचे पाणी ओसरल्यानंतर रोपांचे कोंब पंपाच्या साह्याने पाण्याचा फवारा मारून धुवावेत. पानाच्या बेचक्यातील गाळ साफ करावा. त्यावर बोर्डो मिश्रणाची (१ टक्का) फवारणी करावी.
मोठे माड
मोठ्या माडांवर पावसाळा सुरू झाल्यानंतर उघडीप मिळाली, की लगेच १ टक्का बोर्डो मिश्रणाची किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून कोंबाच्या गाभ्यावर फवारणी करावी. हे बुरशीनाशक सुईच्या खालच्या भागापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने फवारणी करावी. दुसरी फवारणी १२ ते १५ दिवसांच्या अंतराने करावी.
जुलै ते सप्टेंबर या महिन्यात बागेतील माडांची नियमित पाहणी करावी. रोगाची लक्षणे आढळल्यास सुईचा भाग कुजलेल्या देठाजवळ कापावा. कुजलेला संपूर्ण भाग काढून झालेली जखम कापडाने पुसून घ्यावी. त्यानंतर बोर्डो पेस्ट किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावण करून ते ओतावे.
द्रावण ओतल्यानंतर ते पावसाच्या पाण्याने वाहून जाऊ नये यासाठी प्लॅस्टिकद्वारे हा भाग गुंडाळून बांधावा. बऱ्याच वेळा कोंब कुजून गेल्यानंतर खालच्या झावळा अगर पेंडी बरेच महिने हिरव्या राहतात. त्यामुळे तो माड जिवंत आहे असे वाटते. परंतु असे माड पावसाळ्यापूर्वी तोडून नष्ट करावेत. अन्यथा, पावसाळ्यात त्या कुजलेल्या कोंबात जंतू वाढतात व ते बागेत पसरतात. त्यामुळे असे माड तोडून नष्ट करणे गरजेचे असते.
कोंब कुज रोगाचा प्रादुर्भाव कायम आढळून येणाऱ्या बागेत पावसाळ्याच्या सुरुवातीस प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. त्यासाठी १ टक्का बोर्डो मिश्रणाची किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
नारळाच्या ठेंगू जाती विशेषत: चौघाट ऑरेंज डॉर्फ आणि मलायन यलो डॉर्फ या रोगाला जास्त संवेदनशील आहेत. बोर्डो मिश्रणाच्या फवारणीमुळे या नारळावर तपकिरी ठिपके पडतात व पुढे फळगळ होते. त्यामुळे या जातींवर रोगाची लागण होऊ नये यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीस मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) ५ ग्रॅम प्रमाणे प्लॅस्टिक पिशवीत घेऊन पिशवीला छिद्रे पाडावीत. अशा दोन पिशव्या सुऱ्याजवळ झावळीला बांधाव्यात.
ठेंगू जातीच्या नारळामध्ये रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्यास मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) ५ ग्रॅम प्रति ३०० मिलि पाण्यात मिसळून कोंबामध्ये किंवा सुईमध्ये ओतावे. त्यात पावसाचे पाणी जाऊ नये म्हणून प्लॅस्टिक कापड गुंडाळावे.
जैविक व्यवस्थापनामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरीडी ५ ग्रॅम टाल्क फॉर्म्यूलेशन प्रति लिटर पाण्यात घेऊन सुई किंवा कोंबामध्ये ओतावे. यासोबतच जमिनीमधून रोगाचा होणारा प्रसार टाळण्यासाठी बॅसिलस सबटिलिस आणि ट्रायकोडर्मा व्हिरीडी प्रत्येकी ५० ग्रॅम टाल्क फॉर्म्यूलेशन अधिक शेणखत १० किलो प्रति माड याप्रमाणे ६ महिन्यांच्या अंतराने एकदा वापर करावा.
(टीप : लेखातील रसायनांच्या शिफारशी सेंट्रल प्लानटेशन क्रॉप्स् रिसर्च इन्स्टिट्यूट (CPCRI), कासारगोड, केरळ या संस्थेच्या आहेत.)
रोगाची लक्षणे
सर्व वयोगटातील माडांचे कोंब या रोगास अतिसंवेदनशील असतात. हा रोग २० वर्षांखालील माडांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो. रोगाच्या प्रादुर्भावामुळे १५ ते २० वर्षांच्या दरम्यान असलेल्या माड मरण्याचे प्रमाण जास्त आढळून येते.
झाडाच्या मध्यवर्ती कोंबावर (सुईवर) रोगाची लक्षणे सुरू होतात.
रोगाच्या प्रादुर्भावामध्ये लहान रोपाचे नुकतेच उमलत असलेले पान मलूल दिसते. असे पान बाहेरील बाजूवर हलक्या हाताने दुमडून पाहिल्यास पान नरम पडलेले दिसते.
सुई किंवा कोंब पानाच्या अंतर्गत उती कुजतात आणि दुर्गंधी उत्सर्जित करतात. कोंबाच्या देठाकडील भाग मृत झाल्यामुळे मध्यवर्ती कोंब किंवा सुई किंचित खेचल्यावर सहज निघते.
संक्रमणाच्या प्रगत अवस्थेत पाने जास्त प्रमाणात प्रादुर्भावित होतात. रोगाच्या जास्त तीव्रतेमध्ये पान हलक्या हातांनी ओढून पाहिल्यास ते उपटून येते. या पानाच्या देठाला कुजकट वास येतो.
मोठ्या माडांवर प्रादुर्भाव झाल्यास नुकतेच उमलून आलेले पान (सुरा) कोमेजते व लुळे पडून गळून पडते.
- डॉ. संतोष वानखेडे, ९७६५५४१३२२
(प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.