Water Conservation : जलसंधारणातून समृद्धीकडे वाटचाल

Water Resources Conservation : धर्माबाद तालुक्यातील समराळा (रेल्वे स्टेशन) येथील ग्रामस्थांनी व विशेषतः तरुणांनी तलाव व नाल्यांमधील झुडपे, गाळ काढण्याच्या कामांसाठी पुढाकार घेतला. नाला खोली-रुंदीकरणाची कामे लोकवर्गणी व श्रमदानातून झाली.
Water Conservation
Water ConservationAgrowon
Published on
Updated on

Rural Development : नांदेड जिल्ह्यात धर्माबाद तालुक्यातील समराळा (रेल्वे स्टेशन) गाव तेलंगणा राज्याच्या जवळआहे. त्यामुळे येथील अनेक शेतकरी भाताचे (धान) पीक घेतात. गावाची लोकसंख्या दीड हजारांच्या आसपास आहे. खरिपात धान, सोयाबीन, कापूस, तूर तर रब्बीत हरभरा, गहू, ज्वारी आदी पिके घेतली जातात. देशी गोधनाची संख्याही बऱ्यापैकी आहे. त्यामुळे शेतीला दुग्ध उत्पादनाचा आधार आहे.

समस्या सोडविण्यासाठी तरुणांचा पुढाकार

गावशिवारात पाझर तलाव आहे. त्याला मिळणारा नाला गावच्या हद्दीतूनच सुरू होतो. परंतु तलाव व नाला हे दोन्ही स्रोत झाडेझुडपे व गाळाने भरून गेले होते. त्यामुळे पाणीसाठा अत्यंत कमी झाला होता. परिणामी, परिसरातील सुमारे शंभर एकर क्षेत्र नापिकी किंवा त्याकडे चालले होते. धानासारखे पीक घेण्यास अडचणी येत होत्या.

या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी गावातील तरुण पुढे सरसावले. सन २००३ च्या सुमारास राज्यातील पाणीदार गावांना भेटी देण्याचे त्यांनी ठरवले. त्यानुसार अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी, पोपटराव पवार यांचे हिवरे बाजार, भास्करराव पेरे या गावांचा प्रत्यक्ष अभ्यास झाला.

नाला सरळीकरणाचे कार्य झालेल्या जालना जिल्ह्यातील दहीगव्हाण (ता. अंबड) या गावच्या भेटीतूनही प्रेरणा मिळाली. शेतकऱ्यांनी सूक्ष्मसिंचनाच्या वापरातून कपाशी उत्पादनात वाढ केल्याचे उदाहरणही तरुणांना भावले.

Water Conservation
Water Conservation : ‘जीआयएस’ प्रणाली कशी चालते?

ग्रामविकास समितीची स्थापना

गावची परिस्थिती बदलण्याचे स्वप्न बाळगलेल्या तरुणांनी २०१० मध्ये स्थापना केली. प्रत्येकाची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली. त्यानुसार संयोजक मलेश धुळेवार, जलसंपदा प्रमुख अविनाश जेरमोड, भूसंपदा किशन संगीटवार, जनसंपदा माधवराव हाळे, गोसंपदा दत्ता गाजेवार, ऊर्जासंपदा सुरेश संकुलवार, जीवसंपदा चिनन्ना अबुलकोड व वृक्ष संपदा दशलिंग मठपती अशी निवड झाली. त्यातून कामांना गती आली.

कामांना मिळाली चालना

५८ शेतकऱ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपये लोकवर्गणी संकलित करण्यात आली. त्यातून गावशिवारात २५ एकरांच्या परिसरात पसरलेला तलाव व नाल्यांमधील झुडपे काढण्यात आली. तलावाला येणारे कालवे मोकळे केले. या कामांमुळे तलावात पाणी जमा होऊ लागले. गावकऱ्यांचा उत्साह वाढला.

परंतु तलावात अजून गाळ साचलेला असल्याने पाणी जास्त काळ टिकत नव्हते. त्यामुळे २०१३ मध्येगाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी पुण्यातील एका ‘कार्पोरेट कंपनी’कडून ‘सीएसआर’ निधी मिळाला. ३० टक्के लोकवर्गणी व ७० टक्के निधी यातून सुमारे चार हजार ट्रॉली गाळ उपसण्यात आला. शेतकरी तो आपल्या शेतात वापरण्यासाठी घेऊन गेले. या कामातून तलावाच्या साठ्याची क्षमता वाढली.

नाल्याचे खोली-रुंदीकरण

पाझर तलावाला मिळणाऱ्या नाल्यातही मोठ्या प्रमाणात गाळ साचत होता. परिणामी, नाल्याचे पाणी तलावाऐवजी शेतात जात होते. त्यामुळे नाल्याच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांची सहमती घेण्यात आली.त्यातून चाळीस फूट रुंद आणि वीस फूट खोल असे सहा किलोमीटरपर्यंत नाल्याचे खोली- सरळीकरण करण्यात आले. त्यासाठी सहा लाख रुपये खर्च आला. त्यातही ७० टक्के ‘सीएसआर’ निधी व ३० टक्के लोकवर्गणी गोळा करण्यात आली. या कामाचा फायदा नाल्याकाठच्या दोन्हीबाजूंना असलेल्या किमान चाळीस शेतकऱ्यांना झाला.

Water Conservation
Water Conservation : मंत्र छोटा, तंत्र सोपे तरी त्याचे यश मोठे!

शेती पद्धतीत झाला बदल

जलसंधारणाच्या कामांमुळे सुमारे शंभर एकर पडीक जमीन लागवडीखाली आली. शेतकरी खरिपात धान व रब्बीत गहू घेऊ लागले. फळबागा वाढल्या. शेतकरी बारमाही भाजीपाला पिकांकडे वळले.कलिंगड उत्पादक तयार होऊ लागले.

कपाशीचे उत्पादन एकरी पाच क्विंटलवरून दहा तेबारा क्विंटलपर्यंत पोहोचले. गावातील प्रत्येक कुटुंबाकडे एक किंवा त्याहून अधिक देशी गायीदिसून येतात. गावात सुमारे १४० पर्यंत देशी गोधन, तर तीनशेपर्यंत मेंढ्या आहेत. शेण-गोमूत्राच्या वापरातून सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कला वाढला.

गाव विकासाची महत्त्वाची कामे

आरोग्य-स्वच्छता : गावात पूर्वी सांडपाणी साचून डासांचा त्रास व्हायचा. मात्र गावकऱ्यांनी ग्रामविकास समितीच्या माध्यमातून भूमिगत सिमेट पाइपचे काम केले. गावाच्या दोन्ही दिशेला सांडपाणी सोडल्यामुळे सभोवतालचे वातावरण स्वच्छ झाले. त्यातून गावाचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळाली. कचरा संकलनासाठी कचराकुंडीची व्यवस्था आहे.

दोन किलोमीटर रस्त्याचे काम : गावालगतच्या गायरान जमिनीकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे जनावरांना चारण्यासाठी जाता येत नव्हते. त्यामुळे गावकऱ्यांनी दोन लाख ८० हजार रुपये जमा करून सुमारे दोन किलोमीटररुंदीचा पक्का रस्ता तयार केला. त्यासाठी तलावातील मुरूम कामाला आला. या रस्त्यासाठीकाही शेतकऱ्यांनी जमिनीदेखील दिल्या.

पिण्याचे स्वच्छ पाणी : पाच रुपयांत वीस लिटर स्वच्छ पाणी असा चोवीस तास पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी ५० टक्के लोकवर्गणी, तर ५० टक्के आंध्र प्रदेशातील बालविकास संस्थेकडून निधी मिळाला. स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यात आले. दोन हजार वृक्षांची लागवड झाली. संरक्षण भिंत, ठिबक संच आदी कामे झाली. गावात स्वाध्याय परिवाराचा पगडा आहे. त्यातून बालसंस्कार केंद्र,सामूहिक अध्यात्म केंद्र चालते. ग्रामविकास समितीची बैठक दर महिन्याला होते.

अविनाश जेरमोड ९१५८४०३०९२

ग्रामविकास समिती सदस्य, समराळा, ता. धर्माबाद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com