Devni Cattle : रुबाबदार देवणी गोवंश

Dairy Farming : दूध आणि शेतीकाम या दुहेरी हेतूने मराठवाड्यातील परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळणारा गोवंश म्हणजे देवणी.
Devni Cattle
Devni CattleAgrowon
Published on
Updated on

डॉ. प्रवीण बनकर

Livestock Farming : दूध आणि शेतीकाम या दुहेरी हेतूने मराठवाड्यातील परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळणारा गोवंश म्हणजे देवणी. महाराष्ट्रात उदगीर येथे तर आंध्रप्रदेशात गुड्गरीपल्ली आणि कर्नाटक राज्यात बिदर येथील शासकीय प्रक्षेत्रावर देवणी गोवंशाचे संवर्धन सुरू आहे.

उंचापुरा, रुबाबदार राजबिंडा खोंड

आपल्या गोठ्याच्या दावणीला असावा ही कदाचित प्रत्येक शेतकरी बांधवाची सुप्त इच्छा. असा देखणा बैल जर पंचक्रोशीत शंकर पट, बैलगाडा शर्यत किंवा सण समारंभात मालकाचा रुबाब वाढवतो. महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील पशुपालकाची अस्मितादर्श ओळख निर्माण केलेली आहे ती देवणी गोवंशाने. दूध आणि शेतीकाम या दुहेरी हेतूने मराठवाड्यातील परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळणारा गोवंश म्हणजे देवणी. लातूर जिल्ह्यातील ‘देवणी‘ या गावावरून देवणी हे नाव गोवंशाला प्रचलित झाले आहे.

Devni Cattle
Cattle Farming : ‘हिरकणी’ झाली हो...

देवणी गायींची मूळ व्युत्पत्ती गीर गोवंशापासून झाली आहे. गुजरातमधील मालधारी, अहिर, चरण, भरवदास, रबडी अशा समाजाचे गोपालक चाऱ्याच्या शोधात गुजरात मधून दक्षिण भारतात स्थलांतर करीत होते. यावेळी गीर गोवंशाचे कळप मराठवाड्यात येत असत. त्यावेळी गीर गोवंशाचा मराठवाड्यातील स्थानिक गोवंशासह संकर होत असे.

निजाम काळात बैलाच्या शर्यतीसाठी उत्तमोत्तम जनावरांची जोपासना होत गीर आणि स्थानिक गायींपासून देवणी जात विकसित झाली आहे. देवणीचे वळू राष्ट्रीय पशू सौंदर्य स्पर्धेत अनेकदा विजयी झाले आहेत. महाराष्ट्रात उदगीर येथे तर आंध्रप्रदेशात गुड्गरीपल्ली आणि कर्नाटक राज्यात बिदर येथील शासकीय प्रक्षेत्रावर देवणी गोवंशाचे संवर्धन सुरू आहे. देवणी गोवंशाची रुबाबदार, चपळ जनावरे मराठवाड्यात स्थानिक बाजारपेठेत किंवा पशुपालकांच्या गोठ्यात हमखास दिसतात.

Devni Cattle
Cattle Conservation : गीर गोवंशाचे संवर्धन

पशुधनाची ओळख

मराठवाड्यात सुरती, डोंगरपट्टी, डोंगरी, अशा नावाने लोकप्रिय देवणी ही महाराष्ट्राची शान आहे. माफक उंची, मध्यम बांधा, बांधेसूद शरीरयष्टी असलेल्या देवणी गोवंश रंगाने पांढरा असून काळ्या-तांबड्या रंगांच्या ठिपक्यांवरून देवणीच्या उपजाती आढळतात.

सर्व शरीर पांढरेशुभ्र आणि तोंड काळ्या रंगांचे अशी ‘वान्नेरा' उपजात, संपूर्ण पांढरा रंग व क्वचित पोटाकडील भाग काळसर किंवा ठिपके असणारी ‘बालंक्या' उपजात आणि त्याचप्रमाणे पांढऱ्या कातडीवर अनेक अनियमित काळ्या किंवा तांबड्या रंगाचे डाग (पट्टे) असणारी ‘शेवरा' ही उपजात देवणी गोवंशात पाहायला मिळते.

दिसण्याच्या बाबतीत देवणी अतिशय उमदा व सुंदर जातिवंत गोवंश आहे. मोठे फुगीर कपाळ, लोंबते कान जे किंचित टोकावर दुमडलेले असतात. मध्यम आकाराचे बोथट टोकांची समान अंतरावरील शिंगे, मोठे चमकदार डोळे, कास मध्यम आकाराची,मजबूत मान, लोंबते पोळे आणि शेपटी देवणीच्या व्यक्तिमत्वाला सुबकता आणते. स्वभावाने ही जनावरे शांत व संयमी असतात. सरासरी ९४० किलोग्रॅम दूध एका वेतात देवणी गाय देते.

देशी गोवंशाची शास्त्रीय ओळख

भारतासारख्या संपन्न देशात शेकडो वर्षांपासून निसर्गाने विविध गुणांची पखरण करत भौगोलिक विविधता आणि हवामान यांच्या साक्षीने स्थानिक पशुधन निपजले आहे. विविध पशुपालकांनी त्यांचा चांगला सांभाळ केला आहे, म्हणूनच आपल्याला आज पशुधनाची विविधता दिसून येत आहे. देशी गोवंशाची ओळख असणे ही पशुसंवर्धनाची पहिली पायरी आहे. भारतातील वैविध्यतेने नटलेल्या पशुधनाचा परिचय ‘आपलं पशूधन' या लेखमालेतून दर मंगळवारी घेणार आहोत.

- डॉ प्रवीण बनकर, ९९६०९८६४२९,

(सहयोगी प्राध्यापक, स्ना.प.प.संस्था, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com