
Chhatrapati Sambhajinagar News: सहसा घरातून एखाद्या कामाला विरोध झाला की लोक ते काम सोडून देतात. परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील टाकळी माळी येथील गणेश विनायक बुरकूल हे मधमाशी पालक याला अपवाद ठरले. मधुमक्षिकापालनाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर घरातून विरोध झाला तरी त्यांनी मधुमक्षिकापालनच करण्याचा निर्धार केला. त्यावरच ते थांबले नाहीत तर एक तपापेक्षा अधिक काळापासून त्यांनी त्यात सातत्य ठेवले.
प्रशिक्षणातून सुरुवात
गणेश बुरकूल यांनी २०१० मध्ये महाबळेश्वर येथे खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून मधुमक्षिकापालनाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर खादी ग्रामोद्योगाकडून ८० टक्के अनुदानावर घेतलेल्या दहा मधमाशी वसाहती घेऊन त्यांनी कामास सुरुवात केली. जमले तर करू अन्यथा अनुदान घेऊन सोडून देऊ, असे सुरुवातीला त्यांच्या मनात होते. निसर्गात मधमाश्यांचे परागीकरणात असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात आल्याने श्री. बुरकूल यांनी २०११ पासून सुरू केलेल्या या व्यवसायात सातत्य ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांना या व्यवसायासाठी घरातून विरोध झाला. परंतु विरोधाला न जुमानता मधामाशीपालन व मध विक्री या व्यवसायात सातत्य ठेवले.
यंदा ४५० वसाहती भाड्याने
सुरुवात १० मधमाशी वसाहतीपासून करणाऱ्या श्री. बुरकूल यांनी यंदा ४५० मधमाशी वसाहती शेतकऱ्यांना परागीकरणासाठी भाड्याने दिल्या आहेत. याशिवाय थेट शेतकऱ्यांना मधमाशी वसाहती विक्री करण्याचे कामही ते करतात. तीन वर्षांत त्यांनी सुमारे ३,६५० मधुमक्षिका वसाहती थेट शेतकऱ्यांना विकल्या आहेत. ज्यामध्ये यंदा विकलेल्या २,४०० मधमाशी वसाहतींचा समावेश आहे. शेतकऱ्यांना व स्वतःला इतर शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर देण्यासाठी लागणाऱ्या मधुमक्षिकांच्या वसाहती साधारणपणे ते स्थलांतर करणाऱ्या मधुमक्षिका पालकांकडून राजस्थानातून आणतात.
एक वसाहत सुमारे ५५०० रुपयांना विकतात, तर महिनाभरासाठी भाडेतत्त्वाने दिल्या जाणाऱ्या मधुमक्षिका वसाहतीसाठी एका वसाहतीला ३,००० ते ३,५०० रुपयांपर्यंतच भाडे ते आकारतात. भाडेतत्त्वावर दिल्या जाणाऱ्या मधमाशी वसाहती ते जगविण्यासाठी जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत विविध ठिकाणी ठेवतात. बुरकूल यांनी मध विक्रीला शेवटची पसंती दिली आहे. शेतकऱ्याला त्याच्या मागणीनुसार मधमाशी वसाहती उपलब्ध करणे. त्याबरोबरच भाडेतत्त्वावर देण्यासाठी मधमाशी वसाहती उपलब्ध ठेवणे याला त्यांची प्रथम पसंती आहे.
‘ऋषीमध’ ब्रँड नावाने विक्री
वर्षभरात १,५०० किलोपर्यंत मध उत्पादनाची ते विक्री करतात. ‘ऋषीमध’ नावाचा ब्रँड त्यांनी विक्रीसाठी तयार केला आहे. २५० ग्रॅमपासून एक किलोपर्यंतचे पॅकिंग ते करतात. सुमारे ३०० ग्राहक त्यांच्याशी जोडले गेले आहेत. ७ ते २५ किलोपर्यंत प्रत्येक ग्राहक कमीअधिक प्रमाणात मध खरेदी करतो. सुमारे ६५० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळतो. जांभळाचा ५० ते ६० किलो मध दरवर्षी तयार होतो. त्याला सुमारे १,२०० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळाल्याचे श्री. बुरकूल सांगतात.
गणेश बुरकूल ९९७०८७३६६२
प्रशिक्षण, प्रदर्शन आणि पुरस्कार
जालना, संभाजीनगर जिल्ह्यांत शेती शाळेच्या माध्यमातून २०० वर शेतकऱ्यांना प्रशिक्षण
‘रामेती’च्या माध्यमातून मराठवाड्यातील कृषी सहायक व अधिकाऱ्यांच्या
सुमारे २० बॅचला ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रशिक्षण
पाल (जि. जळगाव) व कन्हय्यानगर (जि. जालना) येथील वन विभागाच्या प्रशिक्षण संस्थेत वन अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची संधी
विविध ठिकाणी प्रदर्शनातून मधाची विक्री
महाबळेश्वर मध संचालनालयाकडून मधुमित्र पुरस्कार
पिंपळगाव बसवंत येथील संस्थेकडून २०२१ चा मधुक्रांती पुरस्कार
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.