
Beekeeping Business Success Story : बीड जिल्ह्यात डीघोळआंबा ( ता. अंबाजोगाई) येथे दीनदयाल शोध संस्थांतर्गंत कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) कार्यरत आहे. सन २०१८ ते २०२० या कालावधीत केंद्राच्या कार्यक्षेत्रातील केज, परळी, अंबाजोगाई तालुक्यात शेवगा क्षेत्रात वाढ झाली होती. परंतु अपुऱ्या परागीभवनामुळे फुलगळीची समस्या उद्भवली. समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्राच्या माध्यमातून तत्काळ उपाययोजना करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला.
गटचर्चा, कार्यशाळा, प्रक्षेत्र भेटी, प्रशिक्षणासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. त्यातूनच शेवगा पिकात परागीभवनासाठी मधमाशी पेट्यांचा वापर करण्याचा व पर्याय पुढे आला. देवळा (ता. अंबाजोगाई) येथील शेतकरी गट तसेच कृषी विज्ञान केंद्रांतर्गत अनेक शेतकरी त्या अनुषंगाने मधमाशी पालन प्रशिक्षणासाठी पुढे आले.
केंद्रीय मधमाशी प्रशिक्षण संस्था, पुणे यांना सोबत घेऊन कृषी विज्ञान केंद्राने २०२० मध्ये पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी केला. त्यानंतर खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून हनी मिशन योजनेंतर्गत मधमाशी पेटी व साहित्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यातून २० शेतकऱ्यांना प्रत्येकी १० याप्रमाणे २०० पेट्या संच प्राप्त झाला.
सामंजस्य करारातून दिशा
शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या भागात पेट्या जतन करण्याचा प्रयत्न केला. परंतु आवश्यक वातावरण व पुरेसे खाद्य उपलब्ध न झाल्यामुळे पेट्यांमधील मधमाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. पेट्या जगविण्याचा प्रश्न पुढे आल्यानंतर लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील अत्यंत अनुभवी, प्रगतशील व प्रसिद्ध मधमाशीपालक दिनकर पाटील यांचे मार्गदर्शन घेण्यात आले.
त्यानुसार आवश्यक खाद्य उपलब्ध असलेल्या अन्य राज्यांमध्ये जाऊन गरजेनुसार स्थलांतर करत मध संकलनाचे नियोजन केले गेले. त्यानुसार सुरुवातीला सुमारे वर्षभर गटातील शेतकरी त्या भागात पाठवून मध संकलनाचा प्रयत्न झाला.
परंतु शेती व्यवसाय सांभाळून गटातील शेतकऱ्यांना ते शक्य होत नव्हते. मग केव्हीकेच्या पुढाकारातून मधमाशी पालक श्री. पाटील यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. मधुमक्षिका पेट्या स्थलांतरित करून त्या जगविण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्यात ठरल्यानुसार वर्षाला ७०० किलो मध शेतकरी गटाला देण्याचे ठरले.
मधाची विक्री
गटाचे प्रमुख रवींद्र देवरवाडे व केव्हीकेचे विषय विशेषज्ञ डॉ. सुहास पंके म्हणाले की श्री. पाटील यांच्याकडून उपलब्ध होणारा मध केव्हीकेत येतो. तिथूनच त्याचे वितरण गटाला होते. ग्रामोदय नावाने तात्पुरत्या ब्रँडिंगसह पुणे, लातूर, बीड, केज, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणच्या ग्राहकांना मागणीनुसार विक्री होते.
ग्रामीण किसान शेतकरी गटामध्ये विविध गावांतील शेतकरी सहभागी आहेत. यात रवींद्र देवरवाडे यांच्याकडे १९ मधमाशी पेट्या, जयचंद बाबजे यांच्याकडे ९,ओम प्रकाश यादव ७, पुरुषोत्तम पांचाळ ७, गोविंद जाधव ८ ,नरसिंग यादव ५, शशिकांत झिरमाळे ५, जयशिंग चव्हाण २५, शरद चव्हाण ५, गहिनीनाथ गुजर ८, गोविंद मुळे ८, विलास यस्के ४, नरेंद्र वांजरखेडकर व शैलेश कुलकर्णी यांच्याकडे २० तर अन्य सात सदस्यांकडील १६ अशा सुमारे १५६ पेट्या आहेत.
पेट्यांच्या बदल्यात प्रति वर्षी मिळणाऱ्या मधाचा वापर गटातील शेतकरी आधी कुटुंबासाठी करतात. विक्री गटामार्फत ऑनलाइन व प्रत्यक्षही केली जाते. त्यातून गटाला सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न वर्षाकाठी प्राप्त होते.
कृषी विज्ञान केंद्राचे मधमाशी उद्यान
छत्रपती संभाजी नगर येथील गांधिली परिसरातील महात्मा गांधी मिशनचे कृषी विज्ञान केंद्र (एमजीएम) मधमाशीपालना विषयी शेतकऱ्यांमध्ये जागर करण्याचे कार्य करते आहे. कृषी विभाग- आत्मा यांच्या सहकार्यातून घेतलेल्या मधुमक्षिकांच्या वसाहतीच्या जपणुकीसाठी येथील कृषी विज्ञान केंद्राने मधमाशी उद्यान उभे केले आहे. या उद्यानाच्या अवतीभवती व कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात फुलांचा दरवळ अधिक राहावा याचीही खबरदारी घेतली आहे.
या उद्यानात ॲपिस मेलिफेरा जातीच्या सात, ॲपिस सेरेना इंडिका जातीच्या १६ तर ट्रायगोना जातीच्या सात वसाहती आहेत. अलीकडे केंद्राने चार व्यावसायिक व एक जिल्हास्तरीय कार्यशाळा मधुमक्षिका पालनाच्या जागरासाठी घेतली आहे. शिवाय १५ शेतकऱ्यांना व केंद्राच्या शास्त्रज्ञांना पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) पिंपळगाव येथे नॅशनल बी बोर्डच्या सहकार्यातून शास्त्रोक्त प्रशिक्षणात सहभागी केले आहे. प्रक्रिया केंद्र उभे करण्याचेही कृषी विज्ञान केंद्राचे प्रयत्न आहेत.
रवींद्र देवरवाडे
९८२३८०८८६७
अध्यक्ष, ग्रामीण किसान शेतकरी गट.देवळा ता. अंबाजोगाई
सुहास पंके
९९२३९९१५५१ विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, डिघोळआंबा
तुषार चव्हाण
७५०७७६६८८८
विषय विशेषज्ञ, एमजीएम कृषी विज्ञान केंद्र, गांधेली, जि. छत्रपती संभाजीनगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.