Maharashtra Livestock : महाराष्ट्रातील पशुधन: संस्कृतीची संपन्न परंपरा

Livestock Diversity : महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण पशुधन ही केवळ आर्थिक संपत्ती नाही, तर सांस्कृतिक वारसाही आहे. कोकण गिड्ड्यापासून डांगी बैलांपर्यंत आणि उस्मानाबादी शेळ्यांपासून माडग्याळ मेंढ्यांपर्यंत, प्रत्येक प्राण्याला आपली विशिष्ट ओळख आणि स्थानिक महत्त्व आहे. भटके धनगर आणि इतर समुदायांनी या परंपरेचा वारसा पिढ्यान्‌पिढ्या जपला आहे.
Livestock
LivestockAgrowon
Published on
Updated on

विजय सांबरे

Animal Husbandry : वैविध्यपूर्ण पशुधन ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. शेतकऱ्यांपासून ते अगदी भटक्या समुदायांपर्यंत, या सर्वांनीच आपल्या गरजेनुसार विविध पाळीव प्राण्यांचे संगोपन केले आहे. शेतकऱ्यांनी नानविध गोवंश, म्हशी, शेळ्या, कोंबड्या, कुत्रे व मांजर पाळले. त्याच प्रमाणे मातीकाम करणाऱ्या बेलदार व कुंभारांनी गाढव हा बहुपयोगी प्राणी पाळला.

दगड काम करणाऱ्या वडार व इतर आदिवासी समाजाकडे डुक्कर हमखास दिसणार. धनगर हा समाज अनेक वर्षे आपली ‘लक्ष्मी’ घेऊन; म्हणजे मेंढ्या, बकऱ्या, गायी, कुत्रे, घोडे व कोंबड्या यांच्यासह भटक्या अवस्थेत जगताना आजही आढळतो. अशा या जनसमुदायांनी या महाराष्ट्र देशी पाळीव प्राण्यांचे जनुक जपण्याचे महत्कार्य केले आहे.

Livestock
Animal Husbandry : भारतातील विविध समुदायांच्या पारंपारिक पशुपालन संस्कृतीचे भव्य चित्र

महाराष्ट्राचा धांडोळा घेतला तर गोवंशाचे प्रमुख सात प्रकार आढळतात. त्यातील निवडक दुधाळ तर इतर फक्त शेतीच्या मशागतीसाठी, वाहतुकीसाठी व शर्यतीसाठी पाळले जातात. दक्षिण कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अति पावसाच्या भागात कोकण गिड्डा गोवंश पाळतात. गिड्डा म्हणजे कमी उंचीचे गाई अथवा बैल. उत्तर कोकण, उत्तर सह्याद्रीचा घाटमाथा ते अगदी गुजरात डांग परिसरातील आठपेक्षा अधिक जिल्ह्यांत डांगी गोवंश पाळला जातो.

डांगी बैल व गायींना त्यांच्या रंगसंगतीनुसार विविध नावे पण आहेत. बहाळ्या रंगाच्या बैलाला अधिक मागणी असते. दख्खनच्या पठारावरील कमी पावसाच्या प्रदेशात खिलार प्रसिद्ध आहे. शर्यतीत घोड्याबरोबर धावणारा खिलार गोऱ्हा आकर्षणाचा भाग असतो. स्थानिक परिसरानुसार व रंगसंगतीनुरूप त्याचे एकूण नऊ प्रकार आहेत.

लातूर, नांदेड परिसरात देवणी व लाल कंधारी हे गोवंश पाळले जातात. विदर्भातील गवळाऊ गोवंश हा वऱ्हाड प्रांताची शान आहे. गडचिरोली गोंदिया मधील आदिवासी कठाणी गोवंशाचे पालन करतात. मध्य प्रदेश सीमेवरील खानदेश व शेजारच्या जिल्ह्यात माळवी व निमाडी गायी-बैल प्रामुख्याने पाळतात. वरील गोवंश पाळणारे विविध समुदाय त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यानुसार भटके व स्थिरअशा दोन्हीही प्रकारचे पशुपालक आहेत. गुजरात व राजस्थानमधील भटके पशुपालक पिढ्यान् पिढ्या गाय, शेळ्या, मेंढ्या व उंट घेऊन महाराष्ट्रात जा ये करत असतात.

Livestock
Animal Husbandry : थंडीपासून संरक्षणासाठी व्यवस्थापनात बदल

पिढ्यान्‌पिढ्या सर्व जाती धर्माचे शेतकरी स्थानिक गोवंशाचे पालन करताना आजही दिसतात. अगदी ब्राह्मण समाजसुद्धा याला अपवाद नाही. अहिल्यानगर ऊर्फ अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर परिसरात देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांची एक पोटशाखा आहे, तिचे नाव आहे गोवर्धन ब्राह्मण. निवडक दहा-बारा गावांतील कुलकर्णी वतनदार असणारे हे लोक शेती व्यवसायाबरोबर गायी पाळायचे म्हणून ‘गोवर्धन ब्राह्मण’ हे नाव पडले.

अनेक वर्ष इतर ब्राह्मण समाज यांना कमी लेखायचा व ‘गोळख’ म्हणून हिणवायचा. दुसऱ्या बाजूला राज्यातील भटके व स्थिर पशुपालक प्रामुख्याने उस्मानाबादी, संगमनेरी, सुरती व कोकण कन्याळ जातीच्या शेळ्या तसेच दख्खनी व माडग्याळ जातीच्या मेंढ्या पाळतात. बाळूमामाची मेंढरे प्रसिद्ध आहेत.

त्याचे एकूण सतरा कळप विविध ठिकाणी आहेत. महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर हटकर-धनगर हा पारंपरिक पशुपालक समाज प्रसिद्ध आहे. दख्खनी मेंढ्या व गावठी शेळ्या हे लोक पाळतात. लहान कळप व कुटुंब कबिला घेऊन मूळ गावापासून दीडशे-दोनशे किलोमीटरपर्यंत दरवर्षी स्थलांतर करतात. शेळ्या-मेंढ्या सोबतच हे लोक मध्यम आकारचे घोडे पाळतात.

कदाचित हे घोडे मराठा सैन्य वापरायचे, ते भीमथडी तट्टू असावेत, असा अभ्यासकांचा दावा आहे. सोबत शिकारी जातिवंत कुत्रे व कोंबड्या पण असतात. एकूणच हा समाज सोबत नानविध ‘लक्ष्मी’ म्हणजेच पाळीव प्राणीरूपी संपत्ती घेऊन भटकत असतात. गुजरात-राजस्थानमध्ये भटक्या पशुपालकांना ‘मालधारी’ असे उगाचच नाही म्हणत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com