
Pune News : राज्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
राज्य बँकेतर्फे प्रशासक विद्याधर अनास्कर आणि व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे यांनी शहा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह स्वीकारले. राज्य सहकारी बँकेने भांडवल पर्याप्तता व इतर सर्वच आर्थिक आघाड्यांवर रिझर्व्ह बँकेचे आदर्श प्रमाण व राष्ट्रीय सरासरी मानांकनापेक्षा सरस कामगिरी केली आहे.
दिल्ली येथील भारत मंडपमच्या सभागृहात नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (नॅफस्कॉब) रौप्यमहोत्सवानिमित्त मंगळवारी आयोजित कार्यक्रमात देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या राज्य सहकारी बँका, जिल्हा सहकारी बँका आणि विविध कार्यकारी संस्थांमधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना शहा यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या वेळी व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व कृष्णपाल गुजर, ‘एनसीयूआय’चे अध्यक्ष दिलीप संघानी, ‘नॅफस्कॉब’चे अध्यक्ष रवींद्रन राव आणि केंद्रीय सहकार खात्याचे मुख्य सचिव आशिषकुमार भूतानी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही संपूर्ण भारतात सर्वांत जास्त उलाढाल, नेटवर्थ व निव्वळ नफा कमावणारी बँक आहे. ३१ मार्च २०२४ अखेर राज्य बँकेची उलाढाल सात हजार २६५ कोटी, स्व-निधी सात हजार १२१ कोटी रुपये, नक्त नफा ६१५ कोटी, नेटवर्थ चार हजार ६१८ रुपये कोटी आहे.
याप्रसंगी शहा म्हणाले, सहकारी आर्थिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी ‘सहकारांतर्गत सहकार’ हे सहकाराचे मूलभूत तत्त्व राबविण्याची गरज आहे. सहकाराच्या या तत्त्वानुसार सर्व प्राथमिक सहकारी संस्थांनी आपल्या ठेवी संबंधित जिल्हा बँकांमध्ये व सर्व जिल्हा बँकांनी आपल्या ठेवी संबंधित राज्याच्या शिखर बँकेतच ठेवाव्यात. या संदर्भात गुजरातमधील दोन जिल्ह्यांचे उदाहरण देताना या तत्त्वाचे पालन केल्याने तेथील जिल्हा, राज्य बँकेच्या ठेवींमध्ये २० टक्क्यांची वाढ झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.