Maharashtra Education Survey: ‘परख’चे सर्व्हेक्षण आशादायी

PARAKH Education Survey: नुकतेच ‘परख’चे राष्ट्रीय शैक्षणिक सर्व्हेक्षण जाहीर झालेले आहे. या सर्व्हेक्षणातून पुढे आलेल्या काही बाबी निश्‍तितच आशादायी आहेत. असे असले तरी शिक्षण धोरणात सुधारणा आवश्यक आहेत.
Parakh 2024
Parakh 2024Agrowon
Published on
Updated on

National Education Policy: राष्ट्रीय शिक्षण धोरण - २०२० नुसार परख (परफॉर्मन्स असेसमेंट, रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजेच - पीएआरएकेएच - परख) या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत ४ डिसेंबर २०२४ रोजी देशपातळीवर केलेल्या ‘परख राष्ट्रीय सर्व्हेक्षण-२०२४’ (कार्यक्षमता मूल्यांकन, पुनरवलोकन आणि समग्र विकासासाठी ज्ञानाचे विश्‍लेषण)मध्ये महाराष्ट्राने देशात आठवा क्रमांक पटकाविला आहे. यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, २०२१ च्या तुलनेत ही वाढ तीन टक्क्यांनी अधिक आहे.

सर्व्हेक्षणाच्या संपादणुकीत इयत्ता तिसरीसाठी राष्ट्रीय पातळीवरील सर्व राज्यांमध्ये पंजाब आघाडीवर आहे. महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे. इयत्ता सहावीसाठी महाराष्ट्राचा सातवा क्रमांक, तर नववीसाठी दहावा क्रमांक आहे. विशेष म्हणजे, देशपातळीवरील सर्वोत्तम संपादणुकीत जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर जिल्हा इयत्ता तिसरीसाठी २६ व्या क्रमांकावर असून, इयत्ता सहावीसाठी १० व्या क्रमांकावर आणि इयत्ता नववीसाठी १४ व्या क्रमांकावर आहे.

इयत्ता तिसरीत भाषा विषयात महाराष्ट्राची सरासरी ६९ टक्के असून ती राष्ट्रीय सरासरीपेक्षा पाच टक्क्यांनी जास्त आहे. गणित विषयात राज्याची सरासरी ६४ टक्के आहे आणि राष्ट्रीय सरासरी ६० टक्के आहे. यातही महाराष्ट्र पुढे दिसत आहे. इयत्ता सहावीत भाषा, गणित आणि परिसर अभ्यास विषयांमध्ये राज्याची सरासरी ही राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. इयत्ता नववीच्या सामाजिक शास्त्र या विषयामध्ये राष्ट्रीय टक्केवारी ४० टक्के आहे, तर महाराष्ट्राची टक्केवारी ४३ टक्के आहे. त्यामुळे या अहवालाने महाराष्ट्राचे शैक्षणिक आरोग्य सुधारत असल्याचे दिसून येत आहे.

Parakh 2024
Primary Education Policy : प्राथमिक शिक्षणातल्या भाषेचा वाद

अन्यथा अनेकदा शिक्षणक्षेत्राची वेळोवेळी शैक्षणिक तपासणी करण्यात येऊन जे अहवाल जाहीर केले जातात, त्यामध्ये गुणवत्तेचा आलेख सातत्याने खाली- वर होत असतो; त्यावर प्रतिक्रिया उमटत असतात. पण या वेळी विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतांमध्ये वाढ झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रासह शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांमध्ये निश्‍चितच समाधान दिसत आहे. प्रसिद्धिमाध्यमातही या अहवालावर सकारात्मक चर्चा होत आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण सर्व्हेक्षणात इयत्ता तिसरी, सहावी आणि नववीतील विद्यार्थ्यांच्या भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास या विषयांमधील संपादणूक क्षमता तपासण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान, रचनावाद, अनुभवांनी समृद्ध अध्यापन आणि अध्ययनाच्या तयारी बरोबरच वर्गनिहाय विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा अपेक्षित बदल घडून येण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आकलन आणि उपयोजनानुसार कौशल्ये विकसित होत जातात.

त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये होणारे अध्ययन वृद्धीचे बदल कितपत झाले? याकरिता अशी सर्व्हेक्षणे महत्त्वाची मानली जातात. शहरी भागातील ५१ टक्के मुलांचा समावेश आणि ग्रामीण भागातील ४९ टक्के मुलांचा समावेश या सर्व्हेक्षणामध्ये होता. तुलनात्मकदृष्ट्या इथेही शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचा आढावा घेतल्यानंतर लक्षात येते, की फक्त दोन टक्क्यांनी ग्रामीण भागातील मुले शहरी भागातील मुलांपेक्षा मागे आहेत.

ग्रामीण भागातील शाळांचा विचार करता शहरी भागातील शाळांच्या तुलनेत दोन टक्क्यांची वाढ ही तशी नगण्य आहे. म्हणजे ग्रामीण भागातही आता मुलांच्या शैक्षणिक क्षमतांच्या संपादणुकीत शिक्षकांचे प्रयत्न सातत्याने होत असल्याचे दिसून येत आहे.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विद्यार्थ्यांच्या केलेल्या मूल्यांकनामध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा महाराष्ट्राची सरासरी ही वरचढ आहे. केंद्र सरकारच्या शाळांमध्ये इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी वरील उल्लेखीत सर्व विषयांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. तर इयत्ता तिसरी व सहावीमध्ये विद्यार्थी पिछाडीवर होते. ग्रामीण भागातील तिसरीच्या विद्यार्थ्यांनी भाषा आणि गणित विषयात चांगली कामगिरी केली. तर शहरी भागातील इयत्ता सहावी व नववीतील विद्यार्थ्यांनी चांगले निकाल दिले.

Parakh 2024
Mothertoungue Education: मातृभाषा : सहज शिक्षणाचे माध्यम

राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण २०२१ व परख राष्ट्रीय सर्व्हेक्षण २०२४ यांची तुलना केली असता विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतांची वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसून येते. सांगायचे झाल्यास, २०२१ मध्ये इयत्ता तिसरीच्या भाषा विषयाची विद्यार्थी संपादणूक क्षमतांची टक्केवारी ६७ टक्के होती. तर २०२४ मध्ये ६९ टक्केवारी आहे. यावेळी दोन टक्क्यांची वाढ दिसून येते. २०२१ मध्ये इयत्ता तिसरीच्या गणित विषयाची टक्केवारी ६१ टक्के होती आणि आता ती २०२४ मध्ये ६४ टक्के आहे. याही ठिकाणी तीन टक्क्यांची वाढ झालेली आहे.

२०२१ मध्ये इयत्ता सहावीच्या भाषा विषयाची टक्केवारी ५९ टक्के होती, ती २०२४ मध्ये ६२ टक्के आहे.२०२१ मध्ये इयत्ता सहावीच्या गणित विषयाची टक्केवारी ४५ टक्के होती आणि २०२४ मध्ये ५१ टक्के आहे. या वेळी गणित विषयात सहा टक्के वाढ झाल्याचे दिसते. २०२१ मध्ये इयत्ता सहावीच्या सामान्य विज्ञान विषयाची टक्केवारी ५१ टक्के होती आणि २०२४ मध्ये ५५ टक्केवारी आहे. या विषयात चार टक्क्यांची वाढ झालेली आहे. २०२१मध्ये इयत्ता नववी भाषा विषयाची टक्केवारी ५७ टक्के होती आणि २०२४ मध्ये ५९ टक्केवारी आहे.

२०२१ मध्ये इयत्ता नववी गणित विषयाची टक्केवारी ४० टक्के एवढी होती आणि २०२४ मध्ये ३८ टक्केवारी आलेली आहे. यावेळी इथे मात्र दोन टक्क्यांची घट झालेली दिसते. तर २०२१ मध्ये इयत्ता नववीच्या सामान्य विज्ञान विषयाची टक्केवारी ३९ टक्के होती आणि २०२४ मध्ये ४२ टक्केवारी आलेली आहे. यावेळी तीन टक्क्यांची वाढ या सामान्य विज्ञान विषयात झालेली आहे. एकूण आपण वरील आकडेवारीची तुलनात्मक बाब बघितली तर, सरासरी तीन टक्क्यांची वाढ झालेली दिसून येते. मात्र इयत्ता नववीच्या गणित विषयाची ४० टक्के पूर्वीची विद्यार्थ्यांची संपादणूक क्षमता या वेळी ३८ टक्के एवढी आहे.

कमी झालेले दोन टक्के आणि त्यात भर घालण्यासाठी गणिताची तयारी आणखी जोमाने करावी लागणार आहे. या सर्व्हेक्षणात जिल्ह्यांचा संपादणूक क्रम देखील लावण्यात आलेला आहे. इयत्ता तिसरी, सहावी आणि नववीच्या संपादणूक श्रेणीमध्ये तीनही विषयांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची कामगिरी सर्वोत्तम ठरलेली आहे, आपण सुरुवातीलाच कोल्हापूर जिल्ह्याच्या प्राप्त क्रमांकांचा आढावा घेतलेला आहे. इयत्ता तिसरीमध्ये कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर आणि जळगाव या जिल्ह्यांची कामगिरी उत्तम आहे. लातूर, नागपूर, गडचिरोली, मुंबई उपनगर आणि पालघर हे जिल्हे तुलनात्मकदृष्ट्या कमी कामगिरी करणारे ठरले आहेत. हे कमी आणि अधिक कामगिरीचे प्रमाण त्या ठिकाणच्या परिस्थितीवर आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेवर अवलंबून असते.

शिक्षण धोरणात सुधारणा आवश्यक

शिक्षणातील विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतांची तफावत भरून काढण्यासाठी धोरण सुधारणा आणि अतिरिक्त शैक्षणिक साह्य देणे महत्त्वाचे आहे, या निष्कर्षाच्या आधारे बहुस्तरीय धोरणात्मक योजना आखण्यात येतात आणि त्या आखण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेत वाढ करण्यासाठी परख संस्थेला राष्ट्रीय मूल्यांकनासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्याचे काम दिले गेले आहे.

: ७७७५८४१४२४

(लेखक रानमेवा शेती साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com