
बाळासाहेब पाटील
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अवघे चार दिवस उरले असताना पुण्यातील स्वारगेट स्थानकावर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला आणि राज्यात संतापाची लाट उसळली. बीडचा बिहार झाला असे म्हणून नका, अशी कळकळीची विनंती काही राजकीय नेते म्हणत होते ते बहुधा यासाठी असावे, की बीडची नव्हे तर पुण्याची तिकडे वेगाने वाटचाल होत आहे. येरवड्यातून सुटलेले आरोपी भरदिवसा कुणालाही तुडवू शकतात, गजबजलेल्या बस स्थानकासारख्या परिसरात बलात्कार करू शकतात, मग बीडचे नाव बदनाम कशाला, असाच त्यांचा रोकडा सवाल असावा!
या बलात्कार प्रकरणाचे प्रतिध्वनी मुंबईत आणि त्यातही मंत्रालयात उमटले नाहीत तरच आश्चर्य! पण विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाने विरोधकांचा घसा इतका बसला आहे, की त्यांचा आवाज सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. किंबहुना, तो ऐकायचाच नाही, असा चंग त्यांनी बांधला आहे. गेल्या १० वर्षांत बीड जिल्ह्यातील अराजकाला कोण कारणीभूत, असा सवाल कुणी करत नाही. तर पुण्याचे नेतृत्व करणारे अजित पवारही काहीच करत नाहीत. कोथरूड मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी चंद्रकांत पाटील तोंडी लावण्यापुरते पुण्याची भाषा बोलतात आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्यानंतर पुणे पोलिसांना उसने अवसान आणून इशारा देतात. वरील तीनही नेत्यांमध्ये पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याविरोधात ब्र काढायची हिंमत नाही.
शिवशाही बंद करा
बलात्कार प्रकरणातील तरुणी रात्री बस स्थानकावर का आली? ती आरोपीच्या बोलण्याला भुलली कशी? बलात्कार होत असताना ती ओरडली का नाही? असे किळसवाणे प्रश्न सत्ताधारी वेगळ्या अंगाने विचारत आहेत. दुखणे बळावले असून, त्याला शस्त्रक्रियेची गरज आहे मलमपट्टीची नाही, हे कुणालाच उमजत नाही. किंबहुना, महाराष्ट्रातील शहरोशहरी आणि गावोगावी असलेल्या गुंडापुंडांनी महाराष्ट्र इतका वेगाने पळवायला सुरू केला आहे, की तो आता थांबणार नाही असेच वाटू लागले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीवेळी महसूल खात्याशी संबंधित काम होत नसल्याने एका नागरिकाने सातव्या मजल्यावरून जाळीवर उडी मारली.
या घटनेचे चित्रीकरण करत असताना पोलिसांनी पत्रकारांना जी अरेरावी केली ती एक झलक होती. उडी मारणाऱ्या व्यक्तीला जाळीवरून खाली घेत त्याला इतक्या वेगाने बाहेर नेले की त्याने उडी का मारली, याचा मागमूसही कुणाला लागू दिला नाही. पोलिसांनी धक्काबुक्की केली म्हणून पत्रकारांनी काही काळ निदर्शने केली, पण त्याकडे बघायला सत्ताधाऱ्यांना वेळ नाही. बलात्कार प्रकरणानंतर राज्यातील परिवहन व्यवस्था किती उद्ध्वस्थ झाली आहे, याचे विदारक रूप जनतेसमोर आले आहे. एसटीला हव्या त्या पद्धतीने पिळून काढल्यानंतर आता प्रताप सरनाईक यांच्याकडे सूत्रे आली आहेत. शिवशाही नावाने सुरू केलेल्या बसेसमुळे एसटी महामंडळ सध्या पुरते बदनाम आहे.
शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेनेकडे गेल्या १० वर्षांत परिवहन विभाग आहे. शिवशाही ही बसही शिवसेनेच्या नेत्यांच्या सुपीक डोक्यातून आली. त्यामुळे बिनडोक कारभाराचा नमुना कसा असायला हवा, याचे उत्तर उदाहरण म्हणजे शिवशाही बस! राज्य सरकारला चाड असेल तर किमान ही बस भंगारात घालून यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदनाम होणार नाही, असा निर्णय घेऊन टाकावा.
एसटीचे कर्मचारी, अधिकारी यांना प्रवाशांशी काहीही देणेघेणे नाही. फलाटावर बस लागते ही अंधश्रद्धा आहे. प्रवाशांची गैरसोय हेच ब्रीदवाक्य घेऊन एसटीचा कारभार सुरू आहे. बस स्थानकातील कंट्रोलरला कोणती बस कधी येणार माहीत नसते. त्यामुळे ती माहिती प्रवाशांना देण्याचा प्रश्नच उरत नाही. एसटीचे ॲप हा हास्यास्पद प्रकार आहे. महामंडळाच्या नव्याने आलेल्या गाड्या अवघ्या सहा महिन्यांत भंगारात जातील, अशा झाल्या आहेत. या गाड्या दुरुस्तीसाठी बंद पडल्यानंतरच गॅरेजमध्ये जातात.
हिरकणी ही मागील वर्षी ताफ्यात आलेली बस अतिशय उत्कृष्ट वाहन. मात्र सध्या या बसचे दरवाजे रस्सीने बांधावे लागतात. चालकाशेजारचा दरवाजा दोरीने बांधून ठेवावा लागतो. हे महामंडळाच्या कारभाराचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. महामंडळाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी परिवहनमंत्री कर्नाटक आणि गुजरातच्या परिवहन व्यवस्थेची पाहणी करायला गेले. मात्र त्याचे दृश्य स्वरूप काहीच दिसत नाही. अर्थात, सरनाईक हे गंभीर प्रवृत्तीचे आहेत आणि भरत गोगावले यांच्यासारखे उठवळ घोषणा करणाऱ्यातले नाहीत. त्यामुळे यापुढे काय होते तेच पाहणे महाराष्ट्रवासीयांच्या नशिबी आहे.
आगीची धग तर लागणारच!
यंदाच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची अब्रू वाचली ती तारा भवाळकर यांनी केलेल्या दोन भाषणांनी! भवाळकर यांनी वेळ, काळ आणि परिस्थितीचे अचूक विश्लेषण करत भाषिक आणि साहित्यिक अंगाने अलीकडील काळातील दुर्मीळ आणि उच्च साहित्य मूल्य असलेले भाषण केले. भवाळकर यांच्या भाषणाची चर्चा सुरू असताना एका मुलाखतीत नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीस दिल्यानंतर एक पद मिळते, असा व्यवहाराचा फंडा सांगून धमाल उडवून दिली.
साहित्यिकाने, संमेलनाध्यक्षाने कसे बोलावे, याचा वस्तुपाठ घालून दिलेल्या भवाळकर यांनी व्यवस्थेतील फटींवर बोट ठेवत योग्य तो संदेश दिला होता. त्याची चर्चा होणे अपेक्षित होते, ती होत असताना गोऱ्हे यांनी संमेलनाच्या मांडवात हा आरोप केल्याने वादळ उठले. स्वागताध्यक्ष असलेल्या शरद पवार यांनी मूर्खपणा असे संबोधत गोऱ्हेंना फटकारले. समाजमाध्यमांपासून ते अगदी राजकीय नेत्यांपर्यंत गोऱ्हे यांच्यावर टीका झाली. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या गुडबुकमध्ये जायचे, तर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची असा शिंदे सेनेतील पहिला नियम आहे की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. आणि ते खरेही ठरले. अंधेरीतील आमदार मुरजी पटेल यांच्या आभार सभेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गोऱ्हे यांचे कौतुक केले हेही नसे थोडके!
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.