
Nashik Onion Rate : राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यात पुढील २ ते ३ महिन्यात कांदा विकिरण केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने कांदा विकिरण केंद्र स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या केंद्रांचा फायदा होईल, असा दावा जाणकार करत आहेत.
इकॉनॉमिक्स टाईम्सच्या रिपोर्टनुसार, राज्य सरकार कांदा पिकासाठी विकिरण केंद्र स्थापन करणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने धोरण निश्चित केलं आहे. महाराष्ट्रात ३५ टक्के कांदा उत्पादित होतो. परंतु कांदा दरातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांची जोखीम वाढते. त्यामुळे राज्य सरकार कांदा उत्पादकांची जोखीम कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कांदा निर्यातबंदीने महायुतीच्या उमेदवारांना इंगा दाखवला. लोकसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालानंतर महायुती सरकारने कांदा विकिरण केंद्र स्थापन करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतरच राज्यातील महायुती सरकारने विकिरण केंद्र स्थापनेचा विचार सुरू केल्याचं अभ्यासक सांगतात.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर डिसेंबर २०२३ मध्ये रातोरात बंदी घातली. त्यामुळे कांदा पट्ट्यातील शेतकऱ्यांमध्ये महायुती सरकारमध्ये रोष निर्माण झाला. त्यामुळे कांदा पट्ट्यातील नाशिक, पुणे, अहमदनगर आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यानंतर कांदा निर्यात बंदीचा निर्णय निवडणुकीच्या मैदानात महायुतीच्या अंगलट आल्याचं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कबूल केलं होतं. तसेच कांद्याची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी विकिरण केंद्र स्थापन करणार असल्याचं जाहीर केलं होतं.
कांद्याला दर काय मिळत आहे?
सध्या राज्यातील प्रमुख कांदा बाजारात उन्हाळा कांदा आवक सुरू आहे. उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल ७०० ते १ हजार १०० रुपयांचा दर मिळत आहे. परंतु या दरातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. तर दुसरीकडे भाव कमी असल्याने चाळीत ठेवलेला कांदा मागील दोन आठवड्यातील मुसळधार पावसामुळे भिजला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला, असं शेतकरी सांगतात.
कांदा विकिरण काय?
कांदा नाशवंत पीक आहे. त्यामुळे कांद्याची टिकवण क्षमता काही महिनेच असते. परिणामी शेतकरी कांदा काढणीनंतर विक्रीसाठी घाई करतात. बाजारात भाव कमी असेल तरी शेतकरी कांदा विक्री करतात. साठवण आणि विकिरण सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर मात्र शेतकऱ्यांची माल रोखून धरण्याची क्षमता वाढीस लागते. विकिरण प्रक्रियेमुळे कांद्याची टिकवण क्षमता सुधारते. त्यामुळे शेतकऱ्यांची विक्रीची जोखीम काहीशी कमी होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.