Rabi Season
Rabi SeasonAgrowon

Rabi Crops : जमिनीत कमी ओलावा; रब्बी संकटात

Rabi Crops Season : मॉन्सून ओढ दिल्याने राज्यातील २४ जिल्ह्यांमधील खरिपाला फटका बसला. त्यात अपुरा पाणीसाठा, तीव्र ‘ऑक्टोबर हीट’मुळे रब्बी हंगाम संकटात सापडला आहे.

Pune News : मॉन्सून वेळेत न बरसल्यामुळे २४ जिल्ह्यांमधील खरिपाला फटका बसला. त्यात अपुरा पाणीसाठा, तीव्र ‘ऑक्टोबर हीट’मुळे जमिनीतील ओलावा वेगाने घटत आहे. त्यामुळे खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच जमिनी कोरड्या पडू लागल्या आहेत.

जलाशयांमधील कमी पाणीसाठ्यांमुळे संरक्षित सिंचनाच्या समस्या वाढल्या आहेत. परिणामी, राज्याचा रब्बी हंगाम संकटात सापडला आहे. विशेषतः मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यातील रब्बीची स्थिती बिकट राहणार आहे.  

अपेक्षित न पडलेला पाऊस, जलसाठ्यांची दयनीय अवस्था, उपशावर असलेल्या विहिरी, बोरवेल आणि ओलावा नसलेल्या जमिनी यामुळे मराठवाड्यातील यंदाच्या रब्बीची वाट अवघडच आहे. एखादा अवकाळी पाऊस न झाल्यास रब्बी पिकाच्या पेरणीसोबतच मराठवाड्यातील फळबागांवर संकटाची कुऱ्हाड पुन्हा एकदा कोसळणार आहे.

Rabi Season
Rabi Season : खानदेशातील रब्बी संकटात; अनेक प्रकल्पांत अल्प पाणीसाठा

सोलापूर जिल्ह्यात खरीप वाया गेला. त्यात ओलाव्याअभावी जमिनी आताच कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे रब्बीतील पेरण्यांचे भवितव्यही अधांतरीच आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुरेशा पावसाअभावी जमिनीत ओलावा नाही. रब्बीसाठी ओलावा महत्त्वाचा ठरतो.

त्यामुळे या जिल्ह्यांमधील हंगामावर आतापासूनच प्रश्‍नचिन्ह लागले आहे. मराठवाड्यात परभणी व हिंगोली जिल्ह्यांमध्ये यंदा ४.६७ लाख हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट आहे. परंतु या दोन्ही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अनुक्रमे २६५ व ७४ मिलिमीटर कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढलेली नाही. भूपृष्ठावरील सिंचन स्रोतांनाही पुरेसे पाणी नाही.

दुसरीकडे वाढते तापमान जमिनीतील ओलावा नाहीसा करते आहे. तापमान आतापासूनच ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होतो आहे. परिणामी, यंदा गहू, हरभरा क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात आता कमी पाण्यात येणाऱ्या रब्बी ज्वारीचा पेरा करण्याशिवाय पर्याय नसून हे पीकदेखील कितपत हाती लागते, याविषयी शंका आहे.

‘रब्बी’च्या पूर्वतयारीसाठी पुण्यात मंगळवारी (ता.१७) बैठक होईल. खरिपात पावसाने दगा दिला. संभाव्य चाराटंचाईला सामोरे जाण्यासाठी मका आणि ज्वारीचे उत्पादन वाढविण्याचे धोरण आहे. पुरेसा खत, बियाणे साठा आहे. रब्बी हंगामासमोर संकट असले तरी सिंचन सुविधांमुळे सरासरी उत्पादन गाठण्यात यश येईल.
- धनंजय मुंडे, कृषिमंत्री.

 अपेक्षित न पडलेला पाऊस, जलसाठ्यांची दयनीय अवस्था, उपशावर असलेल्या विहिरी, बोरवेल आणि ओलावा नसलेल्या जमिनी यामुळे मराठवाड्यातील यंदाच्या रब्बीची वाट अवघडच आहे. अजूनही शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची कृपा होण्याची अपेक्षा आहे.

परंतु ती अपेक्षापूर्ती न झाल्यास रब्बी पिकाच्या पेरणीसोबतच मराठवाड्यातील फळबागांवर संकटाची कुऱ्हाड पुन्हा एकदा कोसळणार आहे. सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यानंतर भरवशाचा मानला जाणारा रब्बी हंगाम अल्प पाऊस आणि जमिनीतील कमी ओलाव्यामुळे हाती सापडण्याची आशा मावळली आहे.

Rabi Season
Rabi Season : खरिपानंतर ‘रब्बी’ची आशा मावळली ; सोलापूरात पाणीपातळीही एक मीटरने घटली

 अमरावती विभागात पावसाची तूट

अमरावती विभागात पुरेशा पावसाअभावी रब्बी क्षेत्रवाढीसाठी पोषक वातावरण नसल्याची स्थिती आहे. “पुरेशा ओलाव्याअभावी यंदा खरीप पिकांच्या काढणीला यंदा उशीर होईल. ओलावा नसल्याने जिरायती क्षेत्रात रब्बीचा पेरा अपेक्षित होईल, अशी स्थिती सध्या तरी दिसत नाही,” अशी माहिती जाणकार देत आहेत.

विदर्भात गव्हाचे क्षेत्र घटणार

बुलडाण्याच्या लोणार भागातील शेतकरी प्रफुल्ल सुलताने यांनी सांगितले, की विदर्भात ‘पडेल हस्त; तर शेतकरी मस्त’ अशी म्हण प्रचलित आहे. यंदा ‘हस्त’ पूर्ण कोरडे गेला आहे. हस्त कोरडे गेल्यास शेतकऱ्यांच्या रब्बीतील समस्या वाढलेल्या असतात. दरम्यान, अकोल्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये यंदा पुरेसा पाऊस नाही.

त्यामुळे संरक्षित पाण्याअभावी गहू लागवडीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रब्बीबाबत साशंकता वाढली आहे. परंतु येत्या काही दिवसांत एक-दोन अवकाळी पाऊस झाल्यास चित्र पालटू शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी हरभऱ्याचा पेरा वाढविला होता.

कमी पाण्यात येणारे नगदी पीक म्हणून शेतकरी हरभऱ्याकडे बघतो आहे व हाच कल यंदाही राहील. सोयाबीनची काढणी लांबणीवर पडत आहे. त्यामुळे हरभऱ्याचा पेरादेखील दसऱ्याच्या आधी वेग घेण्याची शक्यता कमी असून, तोपर्यंत जमिनीत ओलावा राहील का, हा देखील प्रश्‍न आहे.

Rabi Season
Rabi Season : रब्बी क्षेत्र पाच लाख हेक्टरने वाढविण्याचे ‘कृषी’चे उद्दिष्ट

गहू ५० हजार हेक्टरने घटणार

कृषी विभागाच्या उद्दिष्टात यंदा राज्यातील हरभरा क्षेत्रात वाढ करण्यात आलेली नाही. पुरेशा पावसाअभावी रब्बीतील हरभऱ्याचा पेरा गेल्या हंगामाइतका म्हणजेच ३० लाख हेक्टर इतका होण्याची शक्यता सध्या दिसत नाही.

गव्हाचा पेरादेखील ५० हजार हेक्टरने घटण्याचा अंदाज आहे. सरकारी उद्दिष्टात रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात यंदा ४-५ लाख हेक्टरने वाढ गृहीत धरण्यात आली आहे. कारण अनेक टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांकडे रब्बीत ज्वारीचे चारा पीक सोडून इतर पिके घेण्यासाठी अनुकूल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

...या जिल्ह्यांत प्रतिकूल स्थिती

कृषी विभागाचे रब्बी नियोजन पाहिल्यास यंदा पेरा वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु राज्यात तशी परिस्थिती नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, धाराशिव, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशीम, नागपूर, चंद्रपूर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, पुणे, नगर या जिल्ह्यांतील अनेक मंडलांमध्ये खरीप हंगाम वाया गेलेला आहे. तेथे शासनाने अधिकृतपणे  ‘मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती’ जाहीर केली आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगामाला पोषक वातावरण नसल्याचे आतापासूनच स्पष्ट होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com