Cotton Picking Rate : कापसाचे अपेक्षित उत्पादन होण्याची आशा कमी; वेचणीचे दरही वाढले

Cotton Market : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तिन्ही कापूस उत्पादक जिल्ह्यांत कापसाचे उत्पादन अपेक्षित होण्याची आशा यंदा कमी आहे. शिवाय मजुरांचा प्रश्न गंभीर बनल्याने वेचणीचे दरही वाढले आहेत.
Cotton
CottonAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तिन्ही कापूस उत्पादक जिल्ह्यांत कापसाचे उत्पादन अपेक्षित होण्याची आशा यंदा कमी आहे. शिवाय मजुरांचा प्रश्न गंभीर बनल्याने वेचणीचे दरही वाढले आहेत. त्यामुळे कापूस उत्पादकांच्या पदरात यंदा काय पडेल हा प्रश्न आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ९४ हजार ७७१ पासून प्रत्यक्षात ३ लाख ६२ हजार ४२० हेक्टर अर्थात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९१ टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड झाली. जिल्ह्यात काही ठिकाणी कापसाची वेचणी सुरू झाली आहे. ऑक्टोबरमध्ये आलेल्या पावसाने वेचणी झालेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले.

Cotton
Cotton Picking : खानदेशात कापूस वेचणी मजुरीदर स्थिर

जालना जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र तीन लाख नऊ हजार ५९ हेक्टर असून प्रत्यक्षात दोन लाख ९१ हजार ६७६ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. लागवड सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९४ टक्के आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही ऑक्टोबरमध्ये आलेल्या पावसाने फुटलेला कापूस भिजवण्याचे काम केले. बीड जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र तीन लाख ५५ हजार ४९३ हेक्टर असून प्रत्यक्षात दोन लाख ६३ हजार ९०७ हेक्टरवरच कपाशीची लागवड झाली.

ती लागवड सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ७४ टक्केच आहे. एकीकडे क्षेत्र घटले असतानाच कापसाची उत्पादनही जवळपास ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घटण्याचा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. सुरुवातीला मजुरीचे दर प्रति किलो वेचणीला दहा रुपये इतके होते. आता त्या दरात वाढ होऊन १२ ते १३ रुपये पर्यंत प्रति किलो कापूस वेचणीला द्यावे लागत आहेत. दुसरीकडे मजुरांचा प्रश्न मोठा आहे.

Cotton
Cotton Picking : कापूस पिकात वेचणी सुरू; मजुरी दर परवडेना

कापूस वेचणीला जड जात असल्याने मजुरीचे दर वाढले आहेत, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले. आताच्या घडीला बाजारात विक्रीसाठी येणारा बहुतांश कापूस आधारभूत किमतीने खरेदीच्या निकषात बसत नसल्याने खासगी बाजारात त्याचे दरही दबावात आहेत. साधारणतः ६ हजार ५०० ते ६ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विक्रीला येणाऱ्या कापसाला दर मिळत, असल्याची माहिती शेतकरी व बाजाराच्या सूत्रांनी दिली.

यंदा दोन एकर कपाशी लागवड केली. त्यातून साडेतीन क्विंटल कापूस घरात आला. १२ ते १३ रुपये प्रति किलो वेचणीला मोजावे लागत आहेत. बाहेरगावावरून मजूर शेतात आणण्यासाठी वाहन खर्च येतो आहे. बाजारात ६५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतो आहे. मागच्या पावसाने कापसाची बरीच बोंडे सडली आहेत.
राजेंद्र अटकळ, शेवगळ, जि. जालना
पहिल्या वेचणीला दहा रुपये प्रति किलो घेतलेला दर आता १२ ते १३ रुपये प्रति किलोवर गेला आहे. मागच्या पावसानंतर कपाशी लाल पडली. सात क्विंटल कापूस तीन एकरांतून घरात आला. आता एकरी एक क्विंटलच्या पुढे निघेल अशी आशा नाही.
संभाजी सोळंके, नागापूर, जि. बीड.
पावसाने कापसाच्या वाती केल्या. बारा रुपये प्रति किलो मोजणीला द्यावे लागत आहे. १२ क्विंटलपर्यंत एकरी होणारे उत्पादन यंदा सात आठ क्विंटलच्या पुढे जाईल असे वाटत नाही. जे मजूर दिवसाला ७०-८० किलो कापूस वेचायचे ते आता ४० किलोच्या पुढे कापूस वेचत नाहीत. सणासुदीत मजुरांची वानवा असल्याने कापूस वेचायचा बाकी आहे.
सोमनाथ नागवे, खामखेडा, जि. जालना.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com