Livestock Campaign : राज्यातील पशुधनाचा मागोवा ...

Indian Livestock : भारतीय पशुधन संपदेत, केवळ अवर्णीत म्हणून दुर्लक्षित राहिलेल्या देशी पशुधन आणि त्यांची उपयुक्तता यांची नोंद घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्र शासनाच्या शून्य अवर्णीत पशुधन अभियानांतर्गत देशी पशुधन आणि त्यांची उपयुक्तता यांचा अभ्यास सुरू आहेत.
Livestock
LivestockAgrowon
Published on
Updated on

डॉ. प्रवीण बनकर

भाग : १

Livestock Update : पशुपालन क्षेत्र मानवाच्या नागरीकरणाच्या इतिहासाइतकेच प्राचीन आहे. पशुपालन हे कृषी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. म्हणूनच देशभरात विविध भागांत स्थानिक पशुसंपदा लोकजीवनाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा विविध पातळ्यांवर आपले अस्तित्व राखून असल्याचे दिसते. जागतिक स्तरावर होणारा वातावरणीय बदल, वाढत्या लोकसंख्येची अन्नसुरक्षा, नैसर्गिक समतोलता आणि कोरोना विषाणूसारख्या अकल्पित संकटांवर मात करण्यासाठी सक्षम पर्याय शोधताना स्थानिक रोगप्रतिकारक्षम आणि बहुपयोगी देशी वनस्पती आणि प्राणी संपदेबाबत वैज्ञानिक सजगता अधिक सुस्पष्ट होत आहे. भारतीय पशुधन संपदेत, केवळ अवर्णीत (नॉन डिस्क्रिप्ट) म्हणून दुर्लक्षित राहिलेल्या देशी पशुधन आणि त्यांची उपयुक्तता यांचा मागोवा घेण्याचे प्रयत्न केंद्र शासनाच्या म्हणजे शून्य अवर्णीत पशुधन अभियानांतर्गत (मिशन झीरो नॉन डिस्क्रिप्ट) सुरू आहेत. स्थानिक नोंदणीकृत पशुधनाच्या जातींव्यतिरिक्त मोठ्या संख्येने उपलब्ध आणि वंचित असलेले देशी पशुधन समूह शास्त्रोक्त पातळीवर अभ्यासून, त्यांना नोंदीकृत म्हणजेच वर्णीत पशुधनाच्या कक्षेत सामावून घेण्यासाठी केंद्रीय संशोधन संस्था, कृषी व पशुवैद्यकीय विद्यापीठ, पशुसंवर्धन विभाग आणि बिगरशासकीय संस्था आदींनी पुढाकार घेतला आहे. एखाद्या अवर्णीत पशुधनाचे सद्यःस्थितीत असलेले अस्तित्व शोधताना त्यांचे ऐतिहासिक संदर्भ उगम आणि विकास शोधण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरतात. यासाठी शतकापूर्वी (ब्रिटिशकालीन दस्तऐवजाच्या आधारे) तत्कालीन महाराष्ट्राचे पशुधन कसे होते याचा मागोवा महत्त्वाचा ठरतो.

इतिहासाच्या कालखंडात विविध टप्प्यांवर तत्कालीन कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राने कळत-नकळत आपला ठसा उमटवलेला आहे. वैदिक काळात दुधाळ गोधनाची, दूध सेवनाची प्रशंसा केली जात असल्याचे संदर्भ ऋग्वेदात आहेत. दुधासाठी गाय आणि शेती मशागती व वाहतुकीसाठी बैल, असे पशुपालन उदयाला आले असून गोधनाच्या संख्येवरून शेतकरी आणि राजाची श्रीमंती ठरायची. अजूनही पूर्णपणे उलगडा न झालेल्या हडप्पा, मोहेंजोदारो सभ्यतेत जसे देशी गाय, बैलाचे ठसे नाण्यांवर, मृत्तिकापात्रांवर दिसून येतात. तसेच आजच्या एकविसाव्या शतकात कृत्रिम प्रज्ञेच्या काळात, शेतीव्यवस्थेस पूरक किंवा सक्षम पर्याय म्हणून पशुधनाचा विचार अग्रक्रमाने होतो आहे.

Livestock
Livestock Census : तांत्रिक अडचणींमुळे पशुगणना लांबणीवर

भौगोलिक विविधता आणि पशुधन :

पशुधन संकल्पना समजून घेताना, प्रादेशिक-भौगोलिक स्थिती, पशुधनाचे सद्यःस्थिती आणि योगदान, जनुकीय वैविध्यता आणि पशुपालक जातीजमाती इत्यादी आयाम अभ्यासणे उपयुक्त ठरते. महाराष्ट्र हे भारतातील अग्रगण्य राज्यांपैकी एक असून दीर्घकाळापासून वैविध्यपूर्ण पशुधन विपुल संख्येने आहे.

भौगोलिकदृष्ट्या, क्षेत्रफळानुसार राजस्थान आणि मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र तिसरे सर्वांत मोठे राज्य असून सर्वाधिक लोकसंख्या असलेले (११२ दशलक्ष) दुसरे राज्य आहे. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी (७२० किमीचा विस्तीर्ण समुद्र किनारा), सह्याद्री किंवा पश्चिम घाट (जैविक हॉटस्पॉट)आणि दख्खनचे पठार, असे तीन ठळक नैसर्गिक विभाग आहेत.

महाराष्ट्राच्या सीमा लगतच्या सहा राज्यांना (गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा) आणि २ केंद्रशासित प्रदेश (दादरा आणि नगर हवेली) यांच्याशी जोडलेल्या आहेत.

साधारणतः ज्या प्रदेशात सुपीकता असते तिथे उदरनिर्वाहासाठी शेती प्रमुख व्यवसाय म्हणून पुढे येतो तर इतर पूरक जोडधंदे दुय्यम स्थानी असतात. मात्र जिथे शेतीसाठी पोषक वातावरण व संधी नसतात तिथे उपजीविकेसाठी पशुपालन क्षेत्र केंद्रस्थानी असल्याचे दिसून आले आहे. अशावेळी वर्षानुवर्षे शेतकरी आणि पशुपालक आपले लक्ष उपयुक्त गुणांसाठी उत्तमोत्तम पशुधनाच्या निवडीवर एकवटतात आणि त्यातून चांगल्या वंशाची निपजूक होते. उदा. गुजरात आणि राजस्थान मधील जंगली आणि वाळवंटी प्रदेशात शेती करणे शक्य नसल्याने, तेथील मालधारी, काठियावाडी, राबडी, राठी आदी पशुपालकांनी गीर, साहिवाल, लाल सिंधी, थारपारकर सारख्या दुधाळ गोवंशाची जोपासना केली आहे.

दोन राज्यांच्या सीमालगतचा भूप्रदेश अनेकदा सामाईक चराई क्षेत्र असल्याने एखादे पशुधन दोन राज्यांत पाहायला मिळते. उदा. महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमेवरील डांग टेकड्यात निपजलेले डांगी गोवंश किंवा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर नांदणारे कृष्णाखोरी गोवंश. कोकण प्रदेशात स्थानिक शेतकरी रोजगारासाठी पशुपालन क्षेत्रापेक्षा मत्स्य व्यवसायावर अधिक निर्भर असून देखील, तेथील दमट वातावरणात तग धरणारा कोकण कपिला गोवंश, कोकण कन्याळ शेळ्या आपले अस्तित्व राखून आहेत.

पशुपालन हा तसा पारंपरिक व्यवसाय असल्याने अनेक पशुपालक जाती-जमाती विशिष्ट पशुधनाचा सांभाळ करताना दिसतात. एखाद्या भूप्रदेशात पाण्याची उपलब्धता, नदीचे सुपीक खोरे आणि त्यायोगे असलेले चराऊ कुरणे, जंगलक्षेत्र, पर्जन्यमान, मातीचे प्रकार इत्यादी अनेक घटकांवर पशुपालकांची स्थिरता अवलंबून असते. चारा आणि पाण्याच्या शोधात आपल्या पशुधनाचे स्थलांतर हा पशुपालकांचा जीवनाचा नित्याचाच भाग बनलेला असतो.

राज्यात उष्णकटिबंधीय मॉन्सून हवामान असून एकीकडे कडक उन्हाळा (४० ते ४८ अंश सेल्सिअस); पावसाळा आणि हिवाळा अशा विभिन्न वातावरणाने दुष्काळ, पूरस्थिती, रोगराई अशी नैसर्गिक संकटे संभवतात. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राची जंगलव्याप्त भूमी (२०.१३ टक्के),विषम हवामान तसेच कृष्णा, भीमा, गोदावरी, तापी-पूर्णा आणि वर्धा-वैनगंगा यांसारख्या नद्यांच्या खोऱ्यात, पठाराच्या आंतरप्रवाहाने प्रभावित मातीचा प्रकार, वनस्पती यानुसार सहा हवामानाधारित कृषी क्षेत्रे तयार झाले आहेत. शेतीपद्धती, कुटुंबपद्धती आणि वातावरणातील बदलांमुळे चाऱ्याची समस्या, पशुसंगोपनास आवश्यक मनुष्यबळ, आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक समस्या उभ्या राहतात. या साऱ्यांचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आणि पर्यायाने पशुपालनावर ठळक परिणाम होत असतो.

Livestock
Livestock Census : अचूक पशुगणना, निश्‍चित धोरण

पशुधनाची सद्यःस्थिती :

शेतीवर आधारित अर्थव्यवस्था असलेल्या राज्याची सद्यःस्थिती लक्षात घेता, सुमारे २५ टक्के लोकसंख्या शेतकरी आहे आणि २७ टक्के लोकसंख्या ही शेतमजूर म्हणून गुंतलेली आहे.

राज्यात देशाच्या ७ टक्के पशुधन असून, एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या १२.९ टक्के वाटा असल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून लक्षात येते.

महाराष्ट्रात वर्णीत पशुधन समृद्धता आणि विविधता आहे उदा. गोवंश (डांगी, गवळाऊ, कठाणी, खिल्लार, कोकण कपिला, देवणी, लाल कंधारी); म्हैस (नागपुरी, पंढरपुरी, मराठवाडी, पूर्णाथडी); शेळी (उस्मानाबादी, संगमनेरी, बेरारी, कोकण कन्याळ); मेंढी (दख्खनी); घोडा (भीमथडी) इत्यादी.

मान्यताप्राप्त (वर्णीत) जातीच्या एकाच प्रदेशातील पशुधनात भिन्न घटकांमुळे निपजलेली जनुकीय विविधता उपजाती म्हणून देखील पाहायला मिळते. उदा. भिन्न रंगसंगतीमुळे देवणी गोवंश शेवेरा, बालंक्या आणि वानेरा अशा नावांनी संबोधला जातो. असाच काहीसा प्रकार डांगी (बहाळा, पारा, काळा बहाळा, मणेरी, लाल बहाळा); खिल्लार (आटपाडी, म्हसवड, नकली, कोसा, ब्राह्मणी, डफळ्या, धनगरी, पंढरपुरी, हरण्या); नागपुरी म्हशी (एलिचपुरी, शाही, चांदा) किंवा दख्खनी मेंढी (लोणंद, सोलापुरी, कोल्हापुरी, संगमनेरी) मध्ये पाहायला मिळतो.

पशुधनाची विविध संबोधने, त्यांच्या बाह्यरूपावरून (रंगसंगती,गुणधर्म, शारीरिक आकार, ठेवण इ.) किंवा भौगोलिक प्रदेशावरून (गाव, नदी, पहाड इ.) किंवा संबंधित पशुपालक समाज यांच्यावरून ठरतात. अनेकदा ही संबोधने शास्त्रीयदृष्ट्या जनुकीय पातळीवर तपासून पाहिल्यावर विभक्त पशुसमूह/ जात असल्याचे निदर्शनास येते. म्हणून वर्णीत पशुधनाच्या विविध उपजाती किंवा संबोधने यांचा माग काढणे गरजेचे ठरते.

ब्रिटिशकाळात सुरू झालेली पशुगणना तशी दर पाच वर्षांनी होते. पशुगणनेवरून पशुधनाची सद्यःस्थिती, संख्येतील चढ-उतार आणि पशुपालकांची सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे आकलन होते. आजवर २० पशुगणना झालेल्या असून यावर्षी २१ वी पशुगणना देशभर होत आहे. २०१९ साली घेण्यात आलेल्या २० व्या पशुगणनेनुसार, भारतात सुमारे ३०३.७६ दशलक्ष गोवंश (गुरे, म्हैस, मिथुन आणि याक), ७४.२६ दशलक्ष मेंढ्या, १४८.८८ दशलक्ष शेळ्या, ९.०६ दशलक्ष डुकरे आणि सुमारे ८५१.८१ दशलक्ष कुक्कुट आहेत. मागील पशुगणनेनुसार, महाराष्ट्रात पशुधनात ८.१० टक्क्यांनी घट झाल्याचे लक्षात आले आहे. गोवंशात १०.०७ टक्क्यांनी घट तर म्हशींच्या संख्येत अल्पशी (०.१७ टक्के) वाढ दिसून येते.

१९ व्या शतकात ब्रिटिश राज्यकर्त्यांनी पशुधनाच्या विविध बाबींचे पद्धतशीरपणे दस्तऐवजीकरण करून गॅझेटियर रूपाने संपादित केलेले आहे. वर्ष १८७४ ते १९२४ दरम्यानच्या ब्रिटिश गॅझेटियर्स आणि समकालीन साहित्याच्या आधारे,पशुधनाच्या जातींचे शतकापूर्वीचा मागोवा घेण्यास उपयुक्त ठरले आहेत.

डॉ. प्रवीण बनकर, ९९६०९८६४२९

(सहाय्यक प्राध्यापक, पशुअनुवंशिकी व पैदासशास्त्र विभाग, स्ना.प.प.संस्था, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com