Climate Change : सावध ऐका हिमालयाच्या हाका...

आयआयटी, मंडी येथील शास्त्रज्ञ आणि विद्यार्थांनी वातावरण बदलाचा हिमाचल प्रदेशातील ग्रामीण लोकसंख्या, तेथील शेती आणि शेतकरी यांच्यावर काय परिणाम झाला आहे, याचा अभ्यास कसा करावा याचे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. पुरातन परिसर शास्त्र तंत्राचा (इथॅनोजिऑग्राफी) उपयोग भारतात प्रथमच झाला आहे. प्रत्येक राज्याने असा अभ्यास करण्याची गरज आहे.
Climate Change
Climate ChangeAgrowon
Published on
Updated on

हिमाचल प्रदेशावर (Himachal Pradesh) होणाऱ्या वातावरण बदलाचा (Climate Change) सविस्तर वैज्ञानिक अभ्यास २०१८ मध्ये मंडी येथील आयआयटी (IIT) संस्थेतील शास्त्रज्ञांनी पूर्ण केला. त्यांच्या काही महत्त्वाच्या निष्कर्षांमधील एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे वातावरणामध्ये झालेल्या बदलाची झळ ही शहरी भागापेक्षा ग्रामीण भागास जास्त बसत आहे.

२०१४ मध्ये न्यूझीलंडमधील वॉरसेस्टर पॉलिटेक्निक इन्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांनी वातावरण बदलाचा न्यूझीलंडमधील शेतकरी आणि दूध उत्पादनावर काय परिणाम होत आहे, याचा सविस्तर अभ्यास केला. याच अभ्यासाचा पुढचा भाग या पॉलिटेक्निकने आयआयटी, मंडीमधील शास्त्रज्ञांच्या सोबत केला. २०१८ मध्ये मंडी आणि परिसरामधील शेकडो गावांमध्ये जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.

विद्यार्थ्यांनी प्रत्येक गावाचे एक स्वतंत्र चित्र तयार केले. हाच अभ्यास नंतर आइसलॅन्डमध्ये सुद्धा त्याच मापदंडावर आधारित केला गेला. पुढे २०१९ मध्ये जपान मध्येही असाच अभ्यास झाला. विद्यार्थ्यांनी या चारही ठिकाणाचा वातावरण बदल आणि गावपातळीवर त्याचा होणारा परिणाम यावर एक अभ्यासपूर्ण लघुपट तयार केला आणि भविष्यात आपणासमोर काय वाढून ठेवले आहे हे सर्व जगाला दाखविले.

हिमालयातील बदलती स्थिती ः

हिमाचल प्रदेशातील ग्रामीण भाग, तेथील शेतकरी, त्यांच्या सफरचंदाच्या बागा, चहाचे मळे आज संकटात सापडले आहेत. या अहवालात हजारो शेतकऱ्यांच्या मुलाखती नोंदविलेल्या आहेत. पूर्वी परिस्थिती कशी होती आणि आता चित्र कसे बदलत आहे याचे प्रत्येकाने केलेले अनुभव कथन आहे. हिमाचल प्रदेश हा पश्‍चिम हिमालयाच्या पायथ्याशी आहे.

येथील ९० टक्के लोकसंख्या दुर्गम ग्रामीण भागात राहते, सर्वस्वी शेतीवर अवलंबून आहे. त्यांची शेती सुद्धा पावसावरच अवलंबून आहे. हाच पाऊस तेथील शेती आणि शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे. हिमाचलची परिसंस्था एवढी नाजूक आहे, की आज शेतात पेरलेले उद्या तेथे असेल का? याचीच शाश्‍वती नाही.

वातावरण बदलामुळे या राज्याच्या काही भागांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे शेकडो वर्षांपासूनचे पारंपरिक पाणी साठे अचानक आटू लागले आहेत. थोडक्यात, पुरातन परिसरातील (ॲनथ्रोपोजेनिक) हवामान बदलाचा परिणाम भूगर्भातील पाणीसाठ्यावर होत आहे. कुलू या पश्‍चिम हिमाचल भागात शेतकऱ्यांच्या हजारो एकरांवरील फळबागा या भूगर्भातील शाश्‍वत पाण्यावर आतापर्यंत अवलंबून होत्या, आता हे पाणी आटले आहे. पाऊससुद्धा जेवढा हवा तेवढा पडत नाही आणि केव्हाही पडतो.

Climate Change
Climate Change: कसा करायचा हवामान बदलाचा सामना ?

त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य प्रकारे शेती व्यवस्थापन करता येत नाही. या संकटाव्यतिरिक्त राज्यावर मागील एक दशकापासून कडे कोसळणे, ढगफुटी आणि बर्फ तलाव फुटणे ही संकटे वाढतच आहेत. दरडी कोसळल्यामुळे गावे नष्ट होतात, मनुष्य हानी होते आणि रस्ते वाहतुकीसाठी बंद होतात. आता तर अचानक कडे कोसळू लागल्यामुळे भूपृष्ठावरील अनेक लहान मोठ्या नद्या त्यांचे पात्र बदलू लागल्या आहेत.

या तीन समस्यांचा परिणामामुळे कुलू घाटीमधील सफरचंद बागांचे संपूर्ण गणितच बिघडले आहे. एक महिन्यापूर्वी या व्हॅलीत एक मोठी दरड मुख्य रस्त्यावरच कोसळली, आकाशात ढग फुटी झाली, त्यामुळे रस्ता मोकळा करणे कठीण झाले. सफरचंद वाहतूक करणारे शेकडो ट्रक रस्त्यातच अडकून पडल्याने कितीतरी लाखो रुपयांचे नुकसान झाले.

आज वातावरण बदलामुळे कुलू खोऱ्याची अर्थव्यवस्था

कोसळण्याच्या मार्गावर आहे. दरड कोसळण्याच्या भीतीमुळे सफरचंद उत्पादक शेतकरी आता उंचावर जाऊन बागांची बांधणी करत आहेत. अनेक जणांनी सफरचंद उत्पादन बंद करून नगदी पीक घेण्यास सुरुवात केली आहे. तरुण शेतकरी त्याच्या पारंपरिक फळ शेतीकडून पर्यटनाकडे वळू लागला आहे.

Climate Change
Climate Change:हवामान बदलामुळेच गहू उत्पादन घटले?

पण नद्यांना येणारे पूर, पूल कोसळणे, दरडी कोसळून रस्ते बंद यामुळे हिमाचलचे पर्यटनसुद्धा नकारात्मक होत आहे. संशोधन सांगते, की वातावरण बदलामुळे पारंपरिक संसाधनाचे हिमाचलमध्ये मोठे नुकसान होत आहे, शेतकऱ्यांना हे समजत आहे, मात्र यामागच्या विज्ञानाचे त्यांना आकलन होत नाही. आता शासनाने प्रत्येक गावांना भेट देऊन शेतकऱ्यांना मदत आणि आत्मविश्‍वास देत असतानाच या मागचे विज्ञानही सांगण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

शेतकऱ्यांशी साधला संवाद ः

हिमाचल प्रदेश राज्य शासनाचा नागरिक विज्ञान सहयोग विभाग या क्षेत्रात काम करत आहे. हिमाचल प्रदेशामध्ये वातावरण बदलाचा झालेल्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी आयआयटीमधील शास्त्रज्ञांनी प्रथमच इन्थोजिओग्राफी या शास्त्राचा वापर केला आहे. या शास्त्रामध्ये पूर्वी परिस्थिती कशी होती, आता कशी आहे आणि भविष्यात काय होईल ? असे आपणास वाटते यावर प्रश्‍न विचारून त्याची लिखित उत्तरे, व्हिडिओ शेतकऱ्यांकडून घेतले गेले. यावरून वातावरण बदलावर लोकसहभाग आणि विज्ञानाच्या सहकार्याने भविष्यात कशी मात करता येऊ शकेल याची दिशा ठरवली जाते.

Climate Change
Climate Change : वातावरण बदलाच्या लढ्यात ‘देवभूमी’ बनतेय ‘वीरभूमी’

या संशोधनात वृद्ध लोकांचा सहभाग जास्त आहे. पूर्वीची शेती, पारंपरिक पिके, बाराही महिने वाहणाऱ्या नद्या, बर्फ वर्षाव, भूगर्भातील पाणी साठे, लोकांचे राहणीमान, स्थलांतर यावर लोकांचे विचार नोंदले जातात, पूर्वी पाण्याचे साठे कोठे होते? याचा नकाशा तयार केला जातो, आटलेल्या नद्या, ओढे, तलाव, विहिरी यांचाही शोध सुरू होतो. या सर्वांना पुन्हा कसे जिवंत करून मुख्य प्रवाहात आणता येईल यावर लोकसहभागातून काम सुरू होते. शास्त्रज्ञ म्हणतात, की आजही येथील ग्रामीण भागात वातावरण बदल म्हणजे काय हेच लोकांना माहीत नाही. शास्त्रज्ञांनी लोकांना भेटून त्यांच्या गोष्टी ऐकून त्यांची नोंद घेतली.

१) ‘बागी’ गावच्या शाळेतील मुख्याध्यापिका म्हणतात, की लहानपणी माझ्या गावात हजारो आंब्याची झाडे होती, उन्हाळ्यात झाडाखाली फळांचा सडा पडलेला असे, आज तेथे एकही आंब्याचे झाड नाही. वृक्ष नष्ट होणे हे वातावरण बदलाचे मुख्य कारण आहे असे त्यांना वाटते.

२) चाणसारी आणि सुदा गावामधील शेतकरी पूर्वी कोरडा, सराय्या, राजमा या धान्याची शेती करत. बर्फ वितळला की त्यांच्या या तीन पारंपरिक पिकांना भरपूर पाणी मिळत असे, आता शेतकऱ्यांनी ही पिके घेण्याचे बंद केले आहे, कारण येथे बर्फच पडत नाही. लोकांनी शेती बंद केल्यामुळे जमिनीवरील हरित थर कमी झाला असून उष्णता वाढू लागली, हे शास्त्रज्ञांनी त्यांच्या लक्षात आणून दिले.

३) पूर्वी सुदा या गावात ५० वर्षांपूर्वी हिवाळ्यात दीड ते दोन फूट बर्फ असे. आज तेथे बर्फच नाही. येथील शेतकरी म्हणतात, की पूर्वी रोपे उगवली आणि त्यावर बर्फ पडला की रोपाला अनेक फांद्या फुटत आणि आम्हाला भरपूर उत्पादन मिळे, आता बर्फच पडत नाही त्यामुळे रोपे सरळ उंच वाढतात आणि उत्पादन कमी मिळते.

४) चाणसारी गावात अनेक सफरचंद उत्पादक आहेत. पण मागील दोन- तीन दशकांपासून त्यांचे फळ उत्पादन कमी होत आहे. कारण पूर्वी हिवाळा नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंतच होता, आता तो जेमतेम फेब्रुवारी पर्यंतच असतो. वातावरण गरम होऊ लागल्यामुळे सफरचंद बागा आता जास्त उंचीच्या क्षेत्रात लागवडीखाली येत आहेत. कुलू व्हॅलीमधील सफरचंद बागा उंचीवर जाणे आणि त्याची जागा डाळिंब, संत्री, पीच, आंबा यांनी घेतल्यामुळे येथील शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडलेला आहे. कारण सफरचंद उत्पादन हा त्याच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे.

५) पालमपूरच्या चहा बोर्डाच्या अहवालानुसार तापमानात वाढ होत असल्यामुळे चहा उत्पादनात वेगाने घट होत आहे. चहावर लाल कोळी किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तापमान वाढीमुळे चहाला फुले लागत आहेत. हे नवीनच संकट आहे.

अभ्यासाचे नवीन तंत्रज्ञान विकसित ः

१) आयआयटी, मंडी येथील शास्त्रज्ञ आणि विद्यार्थांनी वातावरण बदलाचा ग्रामीण लोकसंख्या, तेथील शेती आणि शेतकरी यांच्यावर काय परिणाम झाला आहे, याचा अभ्यास कसा करावा याचे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. या इथॅनोजिऑग्राफी तंत्रज्ञाचा उपयोग भारतात प्रथमच झाला आहे.

वेदना समजून घेतल्याशिवाय उपचार पद्धती निश्‍चित करता येत नाही, या वैद्यकीय तत्त्वावर आधारित हा अभ्यास आहे. पूर्वी सर्व कसे सुरळीत होते आणि आता गेल्या चार-पाच दशकांत चित्र कसे बदलले आहे याच्या शेकडो कहाण्या, चित्रफिती, जागेचे फोटो या अभ्यासात आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे सर्व फोटो माहितीसह इन्स्टाग्रामवर टाकले गेले आहेत, जेणेकरून या प्रतिकृतीचा जगभरात तेथील भौगोलिक परिस्थितीवर असाच परिणाम झाला आहे का, याचा अभ्यास व्हावा.

२) कुलू घाटीमधील एका गावामधील शिक्षिकेला शाळेमधील मुलांची संख्या प्रतिवर्षी कमी होत आहे हे लक्षात आले होते, मात्र त्यास वातावरण बदल कसे जबाबदार आहे हे समजल्यावर तिला धक्काच बसला. ही छानशी गोष्ट या अहवालात छायाचित्रासह आहे. थोडक्यात, वातावरण बदलाच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यापूर्वी जे या समस्येचे बळी आहेत त्या गरीब ग्रामीण भागामधील सर्व स्तरांमधील लोकांना मुळात ही समस्या काय आहे? हे त्यांना त्यांच्या शब्दांत समजावून देता आले पाहिजे, हाच या अहवालाचा खरा केंद्र बिंदू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com