Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon

Monsoon 2024 : एल निनोचा प्रभाव ओसरतोय! पण यंदा मॉन्सूनमध्ये पाऊस कसा राहील?

सीपीसीनं १६ मॉडेलच्या आधारे जो अंदाज दिला, त्यामध्ये एप्रिल ते जून दरम्यान प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान ०.५ अंश सेल्सियसनं कमी होण्याची ७३ टक्के शक्यता वर्तवली आहे

यंदाच्याही मॉन्सूनवर एल-निनोचा प्रभाव पडू शकतो. भारतात मार्च ते मे दरम्यान सर्वाधिक उष्ण स्थिती राहील, असा अंदाज अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या क्लायमेट प्रीडिक्शन सेंटरनं वर्तवला होता. पण आता एल निनोचं सावट दूर होत असल्याचा अंदाज जगभरातील १६ हवामान संस्थांच्या मॉडेलचा आधार घेत या नोआ संस्थेनं दिला आहे. तर दुसरीकडे यंदाच्या मॉन्सून हंगामातील जून आणि जुलै महिन्यात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान अभ्यासकांकडून वर्तवला जात आहे. एल निनोचा कमी होत जाणारा प्रभाव आणि ला निनासाठी पोषक स्थिती निर्माण होण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे.

एल निनो आणि ला निना फरक काय ?

प्रशांत महासागरावर पृष्ठभागाचं सरासरी तापमान ०.५ अंश सेल्सियसनं वाढतं, त्यावेळी एल निनो स्थिती तयार होते. एल निनो स्थिती तयार झाली की, भारतातील मॉन्सून हंगामावर परिणाम होतो. त्यामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण होते, असं आजवरच्या आकडेवारीवरून दिसतं. २०२३ वर्ष एल निनोचं होतं. आता ला निनामध्ये काय होतं? तर प्रशांत महासागरच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमान ०.५ अंश सेल्सियसनं कमी होतं. त्यामुळे ला निनाच्या वर्षात भारतात चांगला पाऊस पडतो. पण एल निनोच्या वर्षात दुष्काळच पडतो, याबाबत शास्त्रज्ञात एकवाक्यता नाही.

सीपीसीनं १६ मॉडेलच्या आधारे जो अंदाज दिला, त्यामध्ये एप्रिल ते जून दरम्यान प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान ०.५ अंश सेल्सियसनं कमी होण्याची ७३ टक्के शक्यता वर्तवली आहे. यापूर्वी याच संस्थेनं एल निनो जूनपर्यंत सक्रिय राहण्याची ६२ टक्के शक्यता वर्तवली होती. पण आता त्यात बदल केला आहे. त्यामुळे या संस्थांचा अंदाज अंतिम समजण्याची गरज नाही, असं अभ्यासकांचं मत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग एप्रिलच्या मध्यात मॉन्सूनबद्दलचा पहिला अंदाज जाहीर करेल, त्यावेळी स्थिती अधिक स्पष्ट होईल. 

Monsoon Update
Sugarcane Farmer : ऊसतोड टोळ्यांकडून शेतकऱ्यांची उघड लुबाडणूक, साखर कारखानदारांची मिलीभगत?

कोरियन मॉडेलनुसार फेब्रुवारी ते जुलै महिन्यात हिंदी महासमुद्र अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, इंडोनेशियाच्या भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तसेच मार्च महिन्यात तामीळनाडू, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड भागात कमी पावसाची तर उर्वरित भारतात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मार्चपासून उन्हाळा अधिक तीव्र होतो. त्यामुळे देशातील तापमानही सरासरीपेक्षा ०.५ ते १ अंश सेल्सियसच्या दरम्यान राहू शकतं. पण मार्चमध्ये महाराष्ट्र वगळता उर्वरित भागात पावसाची शक्यता कोरियन मॉडेलमध्ये वर्तवलेली आहे. एप्रिल महिन्यात पाऊस कमीच राहील. या एप्रिल दरम्यान केरळ, पश्चिम मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यात पाऊस हजेरी लावू शकतो. एप्रिलमध्ये तापमानातही सरासरीपेक्षा १.५ अंश सेल्सियसनं वाढ नोंदवली जाऊ शकते. पण गुजरात, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, ओडीशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि मेघालयात तापमान कमी राहील असाही अंदाज कोरियन मॉडेलमध्ये वर्तवला आहे. 

मे महिना प्री मॉन्सूनचा महिना असतो. मे महिन्यात महाराष्ट्र, विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, ओडीशा, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज कोरियन मॉडेलमध्ये देण्यात आला आहे. तर राजस्थान, पश्चिम मध्यप्रदेश, गुजरात आणि ईशान्य भारतात कमी पावसाची शक्यता आहे. मॉन्सूनची सुरुवात मात्र चांगली असेल. संपूर्ण देशभरात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तसेच जुलै महिन्यात हीच स्थिती कायम राहू शकते. मुंबई आणि कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि तेलंगणात जास्त पावसाची शक्यता कोरियन मॉडेलमध्ये वर्तवली आहे. तर युरोपियन सेंटर फॉर मिडीयम रेंज वेदर फॉरकास्टच्या अंदाजानुसार मे ते जुलै दरम्यान संपूर्ण द्वीपकल्पीय भारतात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. त्याउलट कोरियन मॉडेलमध्ये दक्षिण भारतात जास्तीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आता युरोपियन आणि जपानच्या मॉडेलमध्ये काय अंदाज आहेत ते थोडक्यात समजून घेऊ. जपानच्या राष्ट्रीय हवामान अंदाजानुसार मार्च ते मे दरम्यान भारतात सरासरी पावसाचा अंदाज दिला आहे. तर युनाटेड किंगडमच्या हवामान अंदाजानुसार एप्रिल ते जून दरम्यान भारतातील बहुतेक भागात सरासरी ते सरासरीपेक्षा ४० ते ६० टक्के अधिक पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात सरासरीपेक्षा ६० ते ८० टक्के अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण आता अशी सगळी शक्यता विविध जागतिक हवामान संस्थांनी वर्तवली असली तरीही भारतीय हवामान एप्रिल महिन्यात मॉन्सूनचा पहिला अंदाज देईल त्यावेळीच मॉन्सूनची स्थिती आणि तापमानातील वाढ याचा अंदाज येईल.  थोडक्यात काय तर जगभरातील विविध संस्थांनी यंदाच्या तापमानाची स्थिती आणि मॉन्सूनच्या वितरणाबद्दल वेगवेगळे अंदाज दिले आहेत.

२०२३ जागतिक पातळीवर शेतकऱ्यांची कठोर परीक्षा घेणारं वर्ष ठरलं. भारतातील मॉन्सूननं तर शेतकरी पुरता हैराण झाला. कमी कालावधीत जास्त पावसानं उत्तर भारतात पिकांचा चिखल केला. तर दक्षिण भारतात पावसानं दडी मारल्यामुळं पिकांची माती झाली. कुठे पुर स्थिती तर कुठे दुष्काळाचं संकट ओढावलं. राज्यात तर खरीप हंगाम दुष्काळानं नासावलं. राज्यात सरासरीच्या ९७ टक्के पाऊस झाला. दुष्काळानं शेतकऱ्यांची परवड केली. पण यंदा एल निनोचा प्रभाव कमी होण्याचे संकेत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक म्हणावे लागतील. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com