Dr. Anand Nadkarni : ‘निर्मितीक्षम’ इच्छाशक्ती

Creative Will Power : केवळ इच्छेतून घडणारा कल्पनाविलास न राहता, काही निर्माण करायला उद्युक्त करते. अशी इच्छाशक्ती म्हणजे निर्मितीक्षम इच्छाशक्ती
Will Power
Will PowerAgrowon

डॉ. आनंद नाडकर्णी

Human Psychology : मागील आठवड्यात आपण इच्छाशक्ती कशी मिळवायची, जागृत करायची आणि टिकवायची याबद्दल बोललो. या साऱ्या गोष्टींचं जितंजागतं उदाहरण म्हणजे क्रिकेट वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरीत जाऊन धडाकलेली टीम इंडिया. भारताने वर्ल्डकप जिंकावा अशी इच्छा तमाम भारतीयांची. मात्र ही इच्छाशक्ती सातत्याने टिकून राहणे आणि कृतीमध्ये परिवर्तित होणे याची जबाबदारी आपल्या खेळणाऱ्या टीमची. एकदिलाने खेळणारी ‘टीम ब्लू’ सगळे सामने जिंकून आज होणाऱ्या अंतिम सामन्यापर्यंत येऊन पोहोचली आहे.

योग्य उद्दिष्टांकडे नेणारी इच्छाशक्ती आणि त्याला कौशल्यांची जोड देऊन ईप्सित साध्य करायचे तर त्या इच्छाशक्तीला इंधन पुरवत राहायला हवं. हे इंधन हवं उपयुक्त भावनांचे. आपण सुरुवातीच्या भागात पाहिलेच आहे, विचारांना भावनांची ठिणगी मिळाली की कृती किंवा वर्तन घडते. त्यामुळे इच्छाशक्ती टिकून राहण्यात आणि त्याचे कृतीमध्ये रूपांतर व्हायला त्या व्यक्तीची भावनिक बैठक कशी आहे हे फार महत्त्वाचे. उद्दिष्टाकडे वाटचाल करत असताना, जेव्हा पिछेहाट होते, अपयश येतं, नकारात्मक भावनांचा सामना करावा लागतो, तेव्हा इच्छाशक्तीचा खरा कस लागतो.

आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या उज्ज्वल इतिहासात अशी अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात. लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी लिहिलेले गीतारहस्य आणि इतर लिखाण आपल्याला ठाऊक आहे. त्या तुरुंगात अतिशय प्रतिकूल हवामान आणि इतर परिस्थिती होती. लिखाण करायला पेन वापरण्यावर बंदी होती, सर्व काम पेन्सिलने उतरवावे लागे. वाचन साहित्य स्वखर्चाने मागवून देखील, जेलरच्या मर्जीने हाती पडे. अशा खडतर परिस्थितीत उत्तम बौद्धिक काम आणि लिखाण करून पारंपरिक ज्ञान, आधुनिक तत्त्वज्ञान यांची सांगड घालून सर्वांसाठी कर्मयोगाचे विवेचन करणारा ग्रंथ त्यांनी लिहिला! अशा परिस्थितीत आपल्या ध्येयाशी अढळ राहायला, लोकमान्यांना काय उपयोगी पडले असेल? तर कणाकणाने कमावलेली इच्छाशक्ती. परिस्थिती कितीही खडतर असेल, प्रतिकूल असेल तरी आपली बुद्धी आणि विचार करण्याचे स्वातंत्र्य यावर कोणी बंधन आणू शकत नाही.

महात्मा गांधी सुरुवातीला पाश्‍चिमात्य लोकांच्या राहणीमानाचे अनुकरण करत होते, त्या आयुष्यात रमू पाहत होते. मात्र आपल्या विचार-भावना आणि वर्तनाकडे त्यांनी साक्षीभावाने पाहिले, परखड परीक्षण केले. आपले ध्येय ओळखून त्याप्रमाणे स्वत:त बदल करून आणला तो इच्छाशक्तीच्या जोरावरच. अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या वीर सावरकरांना त्यांच्या कोठडीतून फाशीवर जाताना स्वातंत्र्यसैनिक दिसावेत आणि त्यांचे मनोबल खच्ची व्हावे अशी कोठडी मुद्दाम दिली गेली होती. पशुवत वागणूक आणि हालअपेष्टा होत्याच! पण आपल्या अदम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्याही परिस्थितीत आपली कल्पकता आणि निर्मितीक्षमता त्यांनी जागृत ठेवली आणि ‘कमला’सारखे महाकाव्य रचले!

Will Power
Rice Export : तांदळाच्या निर्यातीवर २० टक्‍के शुल्क ; पूर्व विदर्भातील ‘राइस मिल’ उद्योग संकटात

अगदी इतिहासातच कशाला, आपल्या आजूबाजूला आजच्या काळातही अशी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आणि निर्मितीक्षम इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी फुलवलेले त्यांचे कार्य दिसते.

स्वागत थोरात अंध लोकांसाठी नाटक लिहिणे, दिग्दर्शित करणे आणि इतर बऱ्याच अॅक्टिव्हिटी करतात. स्वत: अंध नसलेले थोरात या गोष्टीकडे कसे वळले? अंध व्यक्तींच्या जीवनावर आधारित एक डॉक्युमेंटरी बनवत असताना त्याची पटकथा लिहिण्याच्या निमित्ताने अंध व्यक्ती, त्यांच्या संस्था याच्या संपर्कात ते पहिल्यांदा आले. मात्र पाहिलेल्या, ऐकलेल्या माहितीने त्यांचे समाधान होत नव्हते. प्रत्यक्ष अनुभव घ्यावा या विचाराने त्यांनी आपले डोळे बांधून घेऊन, अंध असण्याचा आणि अंध व्यक्ती म्हणून जगण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. आज अंध मित्रांसाठी काम करताना त्यांच्याकडे इच्छाशक्तीचा अखंड ऊर्जास्रोत आहे.

अजून एक उदाहरण राजस्थानमधील रुमादेवी यांचे. पारंपरिक शैलीतील नक्षीकाम करणाऱ्या त्या एक सामान्य स्त्री. मात्र अशा आपल्यासारख्या असंख्य स्त्रियांना मोठी ओळख मिळावी, अधिक प्रमाणात व्यासपीठ मिळावं हे जेव्हा त्यांना वाटलं, त्यानंतर त्यांनी महिलांची सहकारी संघटना बांधली. आज त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून, ही पारंपरिक शैली जगभर पोहोचली आणि वाखाणली गेली आहे!

या व्यक्तींचा प्रवास बघितला तर एक लक्षात येईल. आपल्या प्रगतीच्या प्रवासासोबत घडत जाणारा आपल्यातल्या इच्छाशक्तीचा एक प्रवास असतो. या प्रवासातला पहिला टप्पा म्हणजे व्यक्तीला तीव्रपणे वाटत असतं की मी जिंकलो पाहिजे, इतरांना हरवलं पाहिजे. माझं कर्तृत्व जगाला दाखवायला हवं. या टप्प्यात, इच्छाशक्तीच्या जोरावर भौतिक यश म्हणजे संपत्ती, कीर्ती, सुखसोयी मिळवायच्या हे उद्दिष्ट असते.

यातली उद्दिष्टे साध्य व्हायला लागली, की आपल्या भौतिक यशाकडे आपण कसे पाहणार? स्वामी की उपभोगशून्य स्वामी? स्वामी म्हणजे मी कमावलेल्या या सर्व सुखसुविधांचे स्वामित्व माझे, मी ते उपभोगणार! उपभोगशून्य स्वामी म्हणजे विश्‍वस्त. उपभोग घ्यावे असे भौतिक यश मिळवले आहे, पण त्यात मी गुंतून पडणार नाही. स्वार्थाला परमार्थ जोडून घेईन, या भौतिक सुखांकडे ती राखणारा विश्‍वस्त असे बघेन.

इथे आपली इच्छाशक्ती आपण पुढच्या लेव्हलला न्यायला हवी! आपल्या भौतिक विकासासोबत, आपला भावनिक आणि बौद्धिक विकास होतो आहे का? आपल्यासोबतीने इतरांचा विकास साधण्यासाठी आपण काय करणार आहोत? इच्छाशक्तीचा दर्जा उंचावून स्वत:सोबत इतरांना घेऊन पुढे जाणे, माझ्या विकासाबरोबरीने इतरांचा विकास साधणे हे ध्येय असायला हवे!

इच्छाशक्ती या नव्या टप्प्यावर गेली की त्या व्यक्तीची ध्येयावर अढळ निष्ठा निर्माण होते, यश-अपयश याकडे साक्षीभावाने बघून ती व्यक्ती सतत कार्यमग्न राहते.

इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावणाऱ्या थॉमस अल्वा एडीसनने बल्बमधील तार (फिलामेंट) बनवताना शेकडो पदार्थ वापरून पाहिले. त्याचे असंख्य प्रयोग अयशस्वी झाले. पण त्याची या शोधाबद्दलची निष्ठा आणि इच्छाशक्ती इतकी जबर होती, की दर फसलेल्या प्रयत्नानंतर तो म्हणे – इलेक्ट्रिक बल्ब कसा बनवू नये याची मला अजून एक पद्धत मला मिळाली!

Will Power
Soyabean Rate : सोयाबीनला येणार झळाळी; निर्यातीमुळे राहणार तेजी

स्वत:मध्ये काही बदल घडवायचा तर खालील गोष्टी महत्त्वाच्या –

बदल करायची इच्छा हवी. मला जे बदल घडवून आणायचे आहेत, त्या बदलाचे मला वाटणारे महत्त्व ० ते १० च्या मापनपट्टीवर नक्की किती आहे ते ठरवू या. इच्छेचा स्कोअर किती आहे? हा बदल माझ्यासाठी किती महत्त्वाचा? हे रोज स्वत:ला विचारू, सांगत राहू. हे महत्त्व ८, ९ किंवा १० एवढे असेल तर आपली इच्छाशक्ती टिकून आहे आणि प्रबळ आहे!

‘हा बदल घडवून आणेन’ यासाठीचा आत्मविश्‍वास किती आहे? हा आत्मविश्‍वास देखील ८, ९ किंवा १० असेल, तर मग सातत्यपूर्ण कृती होत राहणार, बदल घडणार. आत्मविश्‍वासाचा किती स्कोअर आहे? आपल्या क्षमता ओळखणे, आवश्यक तिथे त्या क्षमता वाढवणे, काही सबबी सलत असतील तर त्या दूर करणे.

बदल प्रत्यक्षात उतरवायची उत्सुकता हवी, पुढे मागे न बघता बदल करायला आता मी सज्ज व्हायला हवे.

अशा पद्धतीने प्रयत्न करताना यश मिळायची शक्यता नक्कीच वाढते. मात्र प्रयत्नात कधी अपयशही येईल. त्या वेळी स्वत:ला काय सांगता येईल? आजचे अपयश म्हणजे तात्पुरती पिछेहाट आहे, प्रयत्नरत राहिलो तर ध्येयाकडे वाटचाल होईलच. (रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल!) यश मिळेल तेव्हादेखील त्याने हुरळून न जाता, वास्तवाचे भान, ध्येयाचे भान मी ठेवेन.

अशा पद्धतीने इच्छाशक्ती जागवली, जगवली, त्याच्या जोडीला आत्मविश्‍वास आणि उत्सुकता असली, की ती मला ध्येयाकडे घेऊन जाते. केवळ इच्छेतून घडणारा कल्पनाविलास न राहता, काही निर्माण करायला उद्युक्त करते. अशी इच्छाशक्ती म्हणजे निर्मितीक्षम इच्छाशक्ती (Productive motivation)!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com