
Nagpur News : उन्हाचा वाढता तडाखा त्यामुळे लिंबाला वाढती मागणी आणि तुलनेत आवक कमी यामुळे लिंबाचे दरात सातत्याने वाढ नोंदविण्यात आली आहे. सध्या लिंबाचे दर गेल्या आठवड्यातील ७००० ते ८००० रुपये क्विंटलवरून थेट ८००० ते ९००० रुपये क्विंटलवर पोहोचले आहेत. आंबिया बहरातील लिंबाची आवक झाल्यानंतरच दर काहीसे कमी होतील, अशी शक्यता उत्पादकांनी वर्तविली आहे.
लिंबू उत्पादक अंकुश झंझाट यांच्या माहितीनुसार, लिंबाचे आंबिया, मृग आणि हस्त असे तीन बहार घेतले जातात. त्यामुळे तीनही हंगामांतील लिंबाची आवक बाजारात होते. परिणामी, दर दबावात राहतात. मात्र हस्त बहर घेण्यासाठी सप्टेंबर महिन्यात बाग ताणावर सोडली जाते. परंतु याच कालावधीत मॉन्सूनोत्तर पाऊस बरसला. त्यामुळे बागेचा ताण तुटल्याने हस्त बहारातील फळांची उत्पादकताच झाली नाही.
त्याच्या परिणामी आता लिंबाच्या आंबिया बहरातील फळांची आवक होण्यासाठी एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. कळमना बाजार समितीत फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लिंबाची आवक ४० क्विंटल होती.
या वेळी वातावरणात गारवा असल्याने दर ३००० ते ३५०० रुपये क्विंटल असे होते. त्यानंतर आवक स्थिर असताना दर ३५०० ते ४५०० रुपयांवर पोहोचले. २७ फेब्रुवारी रोजी अचानक दरात तेजी अनुभवली गेली. या वेळी दर ७००० ते ७५०० रुपये झाले. दुसऱ्याच दिवशी ४००० ते ४५०० रुपयांपर्यंत ते घसरले.
रविवार (ता. २ मार्च) पासून तापमानात आणि लिंबाच्या दरात वाढ नोंदविली गेली. या वेळी दर ५००० ते ६००० रुपये क्विंटल झाले. ६००० ते ६२०० रुपयांचा दर त्यानंतरच्या काळात मिळाला. त्यापुढील काळात ५००० ते ८००० रुपयांचा उच्चांकी दर लिंबाला मिळाला. ८००० ते ८५०० रुपयांवर याचे दर पोहोचले.
त्यानंतर आता तर लिंबाच्या दरांनी मोठी झेप घेत ते थेट ८००० ते ९००० रुपये क्विंटलवर पोहोचले आहेत. सध्या लिंबाची आवक ५० क्विंटल इतकी अत्यल्प होत आहे. मागणीत वाढ झाल्यास या दरात आणखी तेजीची शक्यता वर्तविली जात आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पारा ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे लिंबाला मागणी वाढती असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.
अमरावतीत १० क्विंटलची आवक
अमरावती जिल्ह्यात लिंबाखालील क्षेत्र वाढते आहे. नांदगाव खंडेश्वर भागातील लिंबू देशाच्या विविध भागांत जातो. सध्या अमरावती बाजाराचा विचार करता या ठिकाणी लिंबू आवक अवघी दहा क्विंटल इतकी अत्यल्प होती. आवक कमी झाल्याने या बाजारात ही लिंबाचे दर तेजीत असल्याचे चित्र आहे. ७००० ते ८००० रुपये क्विंटलने या ठिकाणी लिंबाचे व्यवहार होत आहेत. गेल्या आठवड्यात हेच दर ६५०० ते ७००० रुपयांवर होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.